हिदुस्थानी बॅडमिटनचे जनक

>> द्वारकानाथ संझगिरी

नंदू नाटेकर गेले. बॅडमिंटनमधले पुंदनलाल सैगल हरपले. मी असं का म्हणतो ते सांगतो. माझ्या वडिलांच्या पिढीने लता ऐकली, रफी, तलत, मुकेश ऐकले. पण त्यांच्यासाठी सैगल पहिला, मग इतर… बॅडमिंटनमध्येसुद्धा आजची पिढी गोपीचंदवर लुब्ध आहे. माझी पिढी प्रकाश पादुकोणची दिवानी होती. माझ्या आधीच्या पिढीचा हीरो होता नंदू नाटेकर.

तो पहिला बॅडमिंटनपटू ज्याने हिंदुस्थानी बॅडमिंटन जागतिक नकाशावर नेले. 1950चं दशक त्यांचं होतं. एका टप्प्यावर ते जगात चौथ्या क्रमांकावर होते. त्यांची खासियत होती त्यांचा तो कलात्मक आणि मुलायम स्पर्श असलेलं बॅडमिंटन. त्यांचं मनगट हे क्रिकेटपटू विश्वनाथच्या मनगटासारखं होतं. कसंही वळायचं. त्या वळणाऱया मनगटाप्रमाणे समोरचा प्रतिस्पर्धी पळायचा. क्रौर्य, ताकत, जोरकस स्मॅश यांना त्यांच्या खेळात फारशी जागा नव्हती. त्यांचा बॅकहँड हा निबंधाचा विषय होता.

खरंतर ते उत्तम टेनिसपटू झाले असते. त्यांनी दोघांमध्ये बॅडमिंटनला वरलं म्हणून बॅडमिंटन समृद्ध झालं. पण या सर्वांपलीकडे ते माणूस म्हणून फार फार मोठे होते. मैदानावरच्या आणि बाहेरच्या सज्जन, निरलस स्वभावाच्या खेळाडूंची यादी करायची झाली तर त्यात त्यांचं नावं खूप वर असेल. मी त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारल्या आहेत, पण एकही प्रसंग आठवत नाही की ते कुणाबद्दल वाईट बोलले आहेत.

बऱयाचदा मला कळायचं नाही की त्यांचं प्रेम गाण्यावर जास्त की बॅडमिंटन या खेळावर. काही वर्षांपूर्वी त्यांच्या गौरवासाठी मी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात बॅडमिंटनपेक्षा संगीत अधिक होतं. मुख्य म्हणजे वयाने 80 हा आकडा ओलांडल्यावर ते गाणं शिकून रियाझ वगैरे करत. त्या कार्यक्रमात ते गायले होते. साहित्यावरसुद्धा त्यांचं तितकंच प्रेम होतं.

मस्त समृद्ध आयुष्य जगून ते आपल्या जगातून अधिक चांगल्या जगात गेले. तिथे त्यांना त्यांची फार लवकर ताटातूट झालेली बायको उल्का भेटली असेल. त्यांचे खास मित्र माधव आपटे भेटले असतील. त्यांनी भीमसेन जोशींकडे गायनाचा हट्ट धरला असेल. कदाचित ब्रम्हदेवाला सांगितलं असेल, ‘‘पुन्हा माणूस म्हणून जन्म देणार असाल तर खेळाडूबरोबर मोठा गायक व्हायची इच्छा पूर्ण करा!’’ अशी माणसं त्या गुणासह पुन्हा पुन्हा पृथ्वीवर हवीत.

आपली प्रतिक्रिया द्या