
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
बांगलादेश मुक्तीचा 50 वर्षांपूर्वीचा रक्तरंजित इतिहास त्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आम्हा सर्वांच्या नजरेसमोर आजही जशाचा तसा आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान स्थापनेच्या अमृत महोत्सवाकडे जात आहे. बांगलादेश सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. 23 मार्च 1971 रोजी टिक्काखान या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱयाने ‘सर्च लाइट ऑपरेशन’ सुरू करून मार्च ते मे या तीन महिन्यांत तेथे मृत्यूचे ‘तांडव’ घडविले. या देशाच्या निर्मितीचे ‘ते’ रक्तरंजित महिने आजही अंगावर काटे आणतात.
वि साव्या शतकाच्या मध्यास हिंदुस्थानी उपखंडात मोठी उलथापालथ होऊन हिंदुस्थानचा नकाशा पार बदलला. रहिमत अली या लंडनमधील मुस्लिम तरुणाने प्रथम द्विराष्ट्रवादाचा उच्चार केला. प्रथम दस्तुरखुद्द कायदे आझम जिना यांनी त्याची ‘वेडगळ कल्पना’ म्हणून हेटाळणी केली, परंतु त्यांचे नेतृत्व नाकारण्यात आले. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली. जिना लंडनला गेले, वकिली करत संपन्न जीवन जगत होते. नेतृत्वहीन होत असलेल्या मुस्लिम लीगने त्यांना नेतृत्वासाठी हाक देताच तिला साद देत बॅरिस्टर जीना हिंदुस्थानात आले. 1940 साली लाहोरला ‘पाकिस्तान’ या शब्दाचा उद्घोष करत मुस्लिम लीगने वेगळी चूल मांडली. हिंदुस्थानची ‘फाळणी’ हाच त्याचा दुर्दैवी मतलब. देशाला आत्मकेंद्रित हेकेखोर नेतृत्व लाभल्यामुळे हिंदुस्थान व पाकिस्तान अशी फाळणी झाली. मुस्लिमबहुल पूर्वेचा व पश्चिमेचा भाग, जमीन ही ‘पाकिस्तान’ म्हणून जन्माला आली, नकाशावर स्थित झाली.
पाकिस्तानचे फिल्ड मार्शल अयुब खान नेहमी म्हणत, ‘पूर्व पाकिस्तानच्या’ स्वातंत्र्य व समृद्धीची वाट पश्चिम पाकिस्तानातून जाते. ‘पूर्व पाकिस्तानची जनता मूलतः शांतीप्रिय, त्यांची संस्कृतीही पश्चिम पाकपेक्षा पूर्णतः भिन्न होती. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी पूर्व पाकला सतत ‘सावत्र’ वागणूक दिली. म्हणून 71 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुजीबूर रहेमान यांनी स्वायत्ततेची हाक देताच पूर्व पाकमधील 165 पैकी 163 जागा जिंकून ‘आवामी लीग’ हा त्यांचा पक्ष सत्तेच्या सोपानावर चढला. 163 जागा जिंकल्यामुळे झुल्फीकार अली भुट्टो यांचे स्वप्न धुळीस मिळाले. जनरल याहय़ा खान यांचे डावपेच फसले. लष्कराची सत्तेवरची पकड ढिली होणार म्हणून पश्चिम पाकिस्तानी राजकीय नेते व लष्कर, नाराज झाले. भरीस भर म्हणून पूर्व पाकिस्तानी जनतेने ‘एल्गार’ केला – पाकिस्तानचा भावी पंतप्रधान हा ‘बंगालीच’ होणार, अन्यथा आम्ही दुसरा टोकाचा विचार करू’ द्विराष्ट्रवाद मांडून धर्माधिष्ठत ‘पाकिस्तानची मागणी करणाऱया कायदे आझम जीना यांचा हा पराभव होता. पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडे मुस्लिम समुदाय असताना वेगळा ‘सुभा’ बंगाली जनता मागत होती.
1 मार्च 1971 या दिवशी जनरल याहय़ा खान यांनी राष्ट्रीय सभेला (National Assembly) बेमुदत स्थगिती (Sine die) दिली आणि मेजर जनरल याकूब खान यांना पूर्व पाकिस्तानचे राज्यपाल नेमले. शेख मुजीबूर रहेमान यांनी पश्चिमी पाकिस्तानी राज्यकर्ते व लष्कर यांचे ‘मनसुबे ओळखून 4 मार्चला ‘सविनय कायदेभंग’ चळवळ जाहीर करताच त्याला बंगाली जनतेने मनःपूर्वक प्रतिसाद दिला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद इतका प्रखर व परिणामकारक होता. मेजर जनरल याकूब राजीनामा देताच लेफ्टनंट जनरल टिक्काखान हे पूर्व विभागाचे सर्वेसर्वा म्हणून इस्टर्न लष्करी कमांडमध्ये 7 मार्चला अवतरले. ही पुढील ‘रक्तरंजित’ महिन्याची सुरुवात होती.
आपले लष्करी सहकारी काय विचार करताहेत, त्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी जनरल याहय़ा खान पूर्व पाकिस्तानच्या दौऱयावर आले. वंगबंधू शेख मुजीबूर रहेमान यांच्याशी वाटाघाटी करण्याचे कारण देत ते ढाक्यात पोहोचले. त्यांनी वाटाघाटीचे नाटक करत वंगबंधूंशी वाटाघाटी, चर्चा केली, पण ते सर्व निष्फळ ठरले, कारण टिक्काखान व इतर उच्च पदस्थ व मरहूम झुल्फीकार अली भुट्टो यांचा बंगाली नागरिक पंतप्रधान होण्यास प्रखर विरोध होता. लष्कराला सत्ता आपल्या हातात पूर्णपणे अबाधित ठेवायची होती, हाच त्यामागचा उद्देश होता. वंगबंधू शेख मुजीबूर रहेमान हे आपल्या मागण्या शिथिल करण्यास तयारही झाले होते. पूर्व-पश्चिम विभागांना स्वायत्तता देऊन दोन पंतप्रधान करा असे वंगबंधूने सुचवले. भुट्टो व मग्रूर लष्करशहांना हे मंजूर नव्हते. जनरल याहय़ा खान यांनी राष्ट्रीय सभा (National Assembly) जवळजवळ 22 मार्च 71 या दिवशी मोडकळीस काढली. या त्यांच्या घोषणेमुळे पूर्व बंगाल पेटून उठला, कारण बंगाली जनतेला अभिप्रेत असलेली सत्ता पश्चिम पाकिस्तानने नाकारली म्हणून 23 मार्च 71 हा ‘पाकिस्तान दिन’ प्रतिकार व निषेध दिन अशी घोषणा वंगबंधूंनी केली. संपूर्ण पूर्व पाकिस्तान रस्त्यावर उतरला. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजाची होळी व बांगलादेश ध्वज फडकवत क्रुद्ध झालेली जनता आक्रोश करत सैरभैर धावत सुटली. 25 मार्च या तारखेला वंगबंधूंनी स्वातंत्र्याचा उद्घोष करत पाकिस्तानी सैन्याला चोख उत्तर देण्यास बंगाली जनतेला आव्हान केले.
वंगबंधूंना कैद करून पाकिस्तानमध्ये कारावासात डांबण्यात आले आणि 26 मार्च 71 ला बांगलादेशमध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले. एका दिवसात पाकी फौजांनी 50 हजार बंगाली लोकांना कंठस्नान घातले. लहान मुले, स्त्र्ाया, वृद्ध कोणीही या सामुदायिक हत्येत पाकी सैन्याने सोडले नाही. बांगलादेशात जनरल टिक्का खान यांनी लष्करी राजवट जाहीर करून नागरिकांचे सर्व हक्क, अधिकार रद्दबातल ठरवून संपूर्ण बांगलादेश (east Pakistan) तुरुंग करून टाकला. जिवाच्या आकांताने बंगाली जनता सैरभैर होऊन वाट मिळेल तिकडे पळू लागली. तीन महिन्यांच्या काळात दहा लाखांच्यापेक्षा जास्त बंगाली जनता सीमा पार करून हिंदुस्थानात आश्रयाला आली. यामुळे हिंदुस्थानला आर्थिक दडपणाशिवाय अनेक सामाजिक जटील समस्यांना तोंड द्यावे लागले.
खरे तर 1971 चे हे युद्ध हिंदुस्थान-पाक संग्राम नव्हता, तर हे युद्ध म्हणजे बांगलादेश मुक्तिसंग्राम होता. दहा लाखांहून बंगाली निर्वासित हिंदुस्थानी सीमा ओलांडून हिंदुस्थानात ‘घुसली.’ मग या संकटावर मात करण्यासाठी ‘हिंदुस्थान कटिबद्ध’ झाला. डिसेंबर 1971 मध्ये हिंदुस्थानी पूर्व कमांडला आदेश मिळाला. संभाव्य संकटाकरिता तयार राहण्याची तयारी सुरू करण्याचे आदेश मिळाले. मे महिन्याच्या शेवटी या घटना घडत गेल्या. मार्च ते मे काळातील या नरसंहाराचे वर्णन ‘रक्तरंजित संदेश’ (Blood relegram) म्हणून प्रसिद्ध आहे. अमेरिकन राजदूत ब्लड आर्चर के या ढाक्यातील वरिष्ठ अधिकाऱयाने आपल्या संदेशात या नरसंहाराबद्दल प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांना कळवले. शीतयुद्धाच्या या काळात अमेरिका पाकिस्तानकडे झुकली असल्याने व्हाईट हाऊसने ती ‘बासनात’ बांधून टाकली. या नरसंहाराचे विक्राळ स्वरूप दहा हजार शब्दांत पाकिस्तानच्याच पत्रकार अन्टोनी मस्कारेन्हस यांनी शब्दबद्ध करून इंग्लंडच्या ‘सण्डे टाइम्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले. तेव्हा जगाला हे कळले.































































