बँकिंगचा बदलता चेहरा

472
प्रातिनिधीक फोटो

>> देविदास तुळजापूरकर

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेटस् यांनी १९९४ साली एका भाषणात नमूद केले होते. ‘येणाऱया काळात बँकिंग असेल, पण बँका असणार नाहीत.’ हाच तो काळ होता ज्या काळापासून बँकिंगमधील तंत्रज्ञानाविषयक बदलांनी वित्तीय क्षेत्र पूर्ण ढवळून निघाले आहे. बँकिंगचा चेहरामोहरा बदलला आहे. बँकिंगमधील उत्पादन-सेवा यात बदल घडून आले आहेत तसेच बँकिंगमधील व्यवहाराची प्रक्रिया बदललेली आहे.

हिंदुस्थानात १९ जुलै १९६९ मध्ये १४ मोठय़ा खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, तर १९८० मध्ये आणखी सहा यामुळे जवळजवळ ८९ टक्के बँकिंग सार्वजनिक क्षेत्रात आले होते. या कालखंडात बँकिंगची संख्यात्मक वाढ खूपच मोठय़ा प्रमाणावर झाली होती. यानंतरचा टप्पा म्हणून बँकिंगमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यातून १९८३ मध्ये ऍडव्हान्सड लेजर पोस्टिंग मशीन्स आल्या. १९८५ मध्ये त्याची वाढती १९८७ तसेच १९८९ मध्ये लोकल एरिया नेटवर्क आले. म्हणजे एकाच शाखेतील या अॅडव्हान्स लेजर मशीन्स एकमेकांशी जोडण्यात आल्या हाच तो काळ होता ज्या काळात एटीएम मशीन्स बसवण्यास सुरुवात झाली. बँकेच्या शाखेत काऊंटरवर ग्राहक गेला की त्याला प्रत्येक काऊंटरवर हवी ती सेवा मिळेल व रांगेत उभे राहून एका निर्धारित रकमेपर्यंत पैसे त्वरित मिळण्याची सोय उपलब्ध झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि त्यांच्या शाखेत असलेल्या खात्यांना असलेल्या मनुष्यबळासह माणूस ते आधुनिक मशीन्स म्हणजे कॉम्प्युटर असा प्रवास करायला लावणे सोपे नव्हते!

१९९१ साली हिंदुस्थानने नवीन आर्थिक धोरण आणि त्या अनुषंगाने नवीन बँकिंगविषयक धोरण स्वीकारले ज्याचे एक सूत्र होते खासगीकरण. पण हिंदुस्थानी राजकारणाच्या मर्यादा लक्षात घेता हे सहज शक्य नव्हते. म्हणूनच की काय १९९३-९४ साली पहिल्या टप्प्यानंतर दोन हजाराच्या दशकात दुसऱया टप्प्यात खासगी बँकांना परवाने दिले गेले ज्यांनी आपल्या कामाची सुरुवात या आधुनिक तंत्रज्ञानासह केली. त्यांची चकाचक काऊंटर्स, त्यावर काम करणारे तरुण कर्मचारी, आधुनिक मशीन्स सगळी पाटीच कोरी होती. या बँका ग्राहकांना खुणावत होत्या. त्याच सुमारास नवीन बँकिंगविषयक धोरणाचा भाग म्हणून उदारीकरण-शिथिलीकरण आले. बँकातील ठेवी तसेच कर्जावरील व्याजदरातदेखील शिथिलीकरण आले. ज्याचा फायदा घेत झालेला फायदा घेत या नवीन खासगी बँकांनी पुरेपूर फायदा घेतला व तो आपल्या ग्राहकांना ठेवीवर जास्त व्याज दर देऊन तर कर्जावर कमी व्याजदर आकारून पोहचवला. यामुळे या नवीन खाजगी बँकांच्या व्यवसायात जादुई वाढ होत गेली.

एकूण परिस्थितीचा हा रेटा लक्षात घेता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीदेखील आपल्याला अद्ययावत ठेवण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञान वाइड एरिया नेटवर्क म्हणजेच कोअर बँकिंग सोल्युशन स्वीकारले. तसेच एटीएमच्या जाळय़ातदेखील मोठय़ा प्रमाणात वाढ केली. ज्यामुळे हवे तेथे बँकिंग ( Anywhere Banking) तसेच हव्या त्यावेळी बँकिंग (Anytime Banking) शक्य झाले. यामुळे दोन हजारच्या दशकात या नवीन खासगी बँकांच्या स्पर्धेतदेखील या बँका टिकाव धरून राहू शकल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ही कोटय़वधी खाती आणि त्यातील प्रचंड व्यवहार याला या बँका पेलू शकल्या.

हाच तो काळ होता ज्या काळात एकूण सर्व आर्थिक व्यवहारात-जनजीवनात बँकिंग अपरिहार्य बनले. एकीकडे सुरुवातीचा आर्थिक समावेशकतेचा पुढाकार आणि नंतरचा जन-धनचा पुढाकार यामुळे मोठय़ा प्रमाणात सामान्यजन बँकिंगच्या वर्तुळात ओढले गेले तर दुसरीकडे या धोरणांचा परिणाम म्हणून समाजात नव श्रीमंतवर्ग-नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला. ज्याच्या आर्थिक गरजा आणि त्यातील बँकिंगची अपरिहार्यता वाढली होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून जर हे आधुनिक तंत्रज्ञान आले नसते तर कल्पनाच न केलेली बरी? एकतर कितीही मनुष्यबळ वाढवले असते तरी हे तेच तेच कंटाळवाणे काम पेलता आले नसते तसे बँक ग्राहकांच्या अपेक्षेप्रति या बँकांना सेवा देता आली नसती आणि परिणामस्वरूप या बदलात सार्वजनिक क्षेत्रातील बँक संदर्भहीन झाल्या असत्या. थोडक्यात, त्यांचे पोस्ट खाते झाले असते. यात बँकिंग उद्योगातील संघटनांनी या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अशादायी भूमिका घेतली. तसेच काऊंटरवर काम करणाऱया कर्मचाऱयांना कौशल्य देऊन अधिक जबाबदारीची भूमिका दिली म्हणूनच हे शक्य झाले. काळानुरूप संघटना बदलल्या त्यांनी आपल्या सभासदांची भूमिका पुनर्व्याख्यित केली. त्यासाठी त्यांची मनोभूमिका तयार केली म्हणूनच हे शक्य झाले. पण तरीदेखील १९९२ ते २०१७ या २५ वर्षांत या बँकांचा एकूण बँकिंग व्यवसायातील वाटा २० टक्के घटला आहे, पण या बदलांना संघटनांनी झिडकारले असते तर… कल्पनाच न केलेली बरी.

२००८ च्या वैश्विक संकटानंतर जगभरातून या नवीन धोरणांना म्हणजे वैश्विकीकरण खासगीकरण-उदारीकरण या धोरणांना थोडी ओहोटी आली होती. कारण या धोरणामुळे जगभरातील बँकिंग अर्थकारण अडचणीत आले होते, पण त्यावेळी हिंदुस्थानातील बँकिंग मात्र वाचू शकले होते. कारण हिंदुस्थानातील बँकिंग सार्वजनिक क्षेत्राच्या अधीन होते.

आता हे बदल आणखी वेगाने पुढे जात आहेत. बँकांतून सुरुवातीला पेमेंटची पद्धत फक्त चेक आणि ड्राफ्टवर अवलंबून होती. बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी प्रत्यक्ष बँकेतच यावे लागत होते, पण आता याला बँकिंग व्यवस्थेतच खूप काही पर्याय निर्माण झाले आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गोल्ड कार्ड, स्मार्ट कार्ड आले. नेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंग आले. यात वेगवेगळे ऍप्स आले ज्याद्वारे बँकिंग व्यवहार करता येणे शक्य झाले. या काळात एकीकडे मोबाईल तंत्रज्ञानात प्रगती हाती गेली. माहिती आणि दळणवळणाच्या माध्यमात तंत्रज्ञाने मोठी क्रांती घडवून आणली आणि बँकिंग व्यवहाराचे परिमाणच बदलले. मोबाईल आणि हाताच्या बोटावर बँकिंग आले. यामुळे मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटस्चे विधान आता खरे होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात आता तर भर पडत आहे यंत्रमानवाची. ज्यामुळे माणसेच संदर्भहीन होतील असे भाकीत वर्तवले जात आहे, पण…

पण जमिनी वास्तव खूप वेगळे आहे. बव्हंशी गावातून नियमित वीज नाही. टेलिफोनची कनेक्टिव्हिटी नाही. यंत्रात बिघाड झाला तर दुरुस्त करण्यासाठी कुशल मनुष्यबळ नाही तसेच आर्थिक साक्षरता नाही म्हणजेच एकूण संरचनेत सुधारणा झाली तरच आदर्श परिस्थिती निर्माण होऊ शकेल तसेच या आधुनिक तंत्रज्ञानात केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याचे काम? यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीदेखील विविध सेवांसाठी खासगी बँकांच्या स्पर्धेत सेवा शुल्क आकाराला सुरुवात केली आहे. ज्यामुळे वित्तीय समावेशकता किंवा जन-धनमध्ये बँकिंग वर्तुळात ओढली गेलेली माणसे पुन्हा बँकिंगच्या वर्तुळाबाहेर फेकली जात आहेत.

याशिवाय या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकांतील घोटाळय़ांची संख्या वाढली आहे. एटीएम, बँकिंग, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ऍप बेस्ड बँकिंगमध्ये काही ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरणाऱयांच्या निरक्षरतेमुळे किंवा अर्धवट ज्ञानामुळे तर काही हे घोटाळे घडवून आणणाऱया जवळील चाणक्षतेमुळे सामान्यजन कोटय़वधी रुपयांना लुटले जात आहेत. यासाठी तंत्रज्ञानातील सुरक्षिततेवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे तसे आर्थिक साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार याचीदेखील आवश्यकता आहे. तपास यंत्रणेत अद्ययावतता येण्याची आवश्यकता आहे तरच हे आधुनिक तंत्रज्ञान बँक ग्राहकांसाठी वरदान सिद्ध ठरणार आहे, अन्यथा ते शाप ठरण्याची शक्यता आहे.

[email protected]
(लेखक ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेरडेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या