
>> सुभाषचंद्र सुराणा
भगवान महावीरांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे. या त्रिसूत्रीद्वारे जीवनाची वाटचाल करून सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्ती व सिद्धी मिळू शकते असे भगवान महावीरांनी स्वतःच्या कृतीद्वारे दाखवून दिले आहे. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. समता, क्षमा आणि संयम या त्रिसूत्रीचा उपयोग करून जीवन सुखी करण्याचा मार्ग स्वीकारा असे पर्युषण पर्व शिकविते.
हिंदुस्थानात अनेक सण, उत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरे केले जातात. मुळातच आपला देश हा उत्सवप्रिय आहे. देशभरातून जैन श्वेतांबर आणि दिगंबर धर्मीयांचा पर्युषण पर्व हा सण सबंध देशात मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला गेला. या काळात जैन धर्मीयांच्या श्वेतांबर स्थानकवासी तेरा पंथीय समाजामध्ये हे पर्व साजरे केले जाते. तथापि दिगंबर धर्मवासी दहा दिवस पर्युषण पर्वकाळ पाळतात. म्हणून त्या समाजामध्ये तो दशलक्षणी पर्व म्हणून साजरा केला जातो. शेवटचा दिवस हा महत्त्वाचा दिवस असतो व तो दिवस अनेक श्वेतांबर जैन बांधव, विशेषतः जपतप किंवा उपवास करून साजरा करतात. त्या अखेरच्या दिवशी सर्वांची क्षमायाचना करून गत वर्षात सर्व प्राणिमात्र, मानवासह आप्तजनांची क्षमायाचना मागून पर्वाची सांगता करतात. तशीच याहीवर्षी पर्युषण पर्वाची सांगता झाली.
भगवान महावीर हे जैन धर्मीयांचे चोविसावे तीर्थंकर असून त्यांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी समता आणि शांतीचा संदेश देऊन अहिंसा आणि अपरिग्रह या सूत्रांचा सर्वांनी स्वीकार करावा म्हणून आत्मविकासासाठी अनेक प्रवचने दिली. जैन धर्मीयांचा ‘आगम’ धर्मग्रंथ असून त्यामध्ये 45 प्रकरणे असून त्यापैकी ‘कल्पसूत्र’ हे महत्त्वाचे प्रकरण आहे. कल्पसूत्र आणि निवडक धर्मग्रंथांचे वाचन या काळात करतात. जैन धर्माचे गुरुवर्य मंदिरातून व जैन स्थानकातून या ग्रंथाचे वाचन व प्रवचन करतात. दररोज प्रवचन, विविध प्रकारच्या पूजा, भक्तिभावाने पर्यूषण पर्वाचे विधिविधानपूर्वक नित्यनेमाने पालन केले जाते.
पर्युषण पर्व हे आत्मकल्याणाचे पर्व म्हणून ओळखले जाते. या काळात जैन बांधव आत्मशुद्धी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. आत्मकल्याणासाठी जैन धर्माच्या परंपरेनुसार धार्मिक विधीच्या जपतप, उपवास, दया इत्यादी तपश्चर्या, तीर्थकरांच्या पूजा, वंदना इत्यादी क्रियेद्वारे तो स्वतःच्या आत्मकल्याणासाठी प्रयत्नशील होतो. त्यासाठी पर्युषण पर्व त्याला प्रेरणा देत राहून आत्मबळाच्या जोरावर मासखमनसारखी कठीण तपस्या करण्याचे सामर्थ्य लाभते. आत्मशांतीचे तपोबल वाढविण्यासाठी प्रेरक शक्ती देण्याचे महान कार्य हे पर्युषण पर्व काळ, लौकिक अर्थाने घडवून आणत असते. म्हणून आत्मावलोकन करून आत्मशुद्धीद्वारे पुण्याई मिळविण्यासाठी आत्मविकासाच्याद्वारे मोक्षप्राप्तीच्या मार्गावर श्रावक, श्राविका वाटचाल करू शकतात. पर्युषण पर्वाला लोकोत्तर पर्व, आत्मशांती पर्व, कषाय परिहारपर्व, क्षमापर्व, समग्य आत्मवादी आत्मावलोकन पर्व इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते.
पर्युषण पर्वाची आराधना करण्यासाठी भगवान महावीरांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे. या त्रिसूत्रीद्वारे जीवनाची वाटचाल करून सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास मनुष्यप्राणी स्वभावस्थ व आत्मस्थ बनवून मोक्षप्राप्ती व सिद्धी मिळू शकते असे भगवान महावीरांनी स्वतःच्या कृतीद्वारे दाखवून दिले आहे.
पर्युषण पर्वाचा संदेश आहे की, भूतकाळातील, वर्तमानकाळातील राग, द्वेष, तंटे इत्यादी अप्रिय घटना विसरून जाऊन ‘क्षमा वीरस्य भूषणम्’चा स्वीकार करावा. क्षमा करा, क्षमा मागा, क्षमा अंतःकरणपूर्वक मागून बंधुत्व, प्रेमभाव निर्माण करा. अकडकर मत रहो, झुक जावो, झुकने से बडा लाभ है’ या तीन सूत्रांचा जीवनात वापर करा.
आगम वाणीचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करा. माझी सर्व प्राणिमात्रापासून सर्व लहानथोर मनुष्यप्राण्यावर मैत्री आहे, प्रेमभाव आहे. कोणाशीही वैर नाही. मी सर्व जीवांची क्षमा मागतो. सर्वांनी मला क्षमा करावी अशी संयमपूर्वक प्रार्थना करावी. हाच सुखी जीवनाचा एकमेव मार्ग आहे.
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. समता, क्षमा आणि संयम या त्रिसूत्रीचा उपयोग करून जीवन सुखी करण्याचा मार्ग स्वीकारा असे पर्युषण पर्व शिकविते.
‘जियो, जीने दो’ व ‘अहिंसा परमो धर्मः’ असे मर्म जैन धर्मातील 24 तीर्थंकारांनी हजारो वर्षांपासून लाखो मानवांना उपदेश करीत मनुष्यधर्माचे महत्त्व इथपर्यंत पोहोचवले आहे. दादा गुरू श्री मणिधारी जीनचंद्र सुरी जी म. सा. यांनी आपल्या श्रावकांना उपदेश करीत असताना म्हटले आहे की, जी व्यक्ती दुसऱयांना दुःख देऊन सुखी होण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती राक्षस आहे. जी व्यक्ती दुसऱयांना सुखी करून स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्ती इन्सान आहे. तसेच व्यक्ती स्वतः अनेक दुःख, यातना सहन करून दुसऱयांना सुखी करण्यासाठी झटत असते तोच भगवान आहे. भगवान बुद्धांनी जसा ‘धम्मम शरणम गच्छामि’ असा उपदेश दिला, त्याचप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्रांनी मानवी मर्यादेचे मार्गदर्शन करून मर्यादापुरुषोत्तम हा गुण स्वतः अवलंबून मगच दुसऱयांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने धर्मरक्षणासाठी पुरुषार्थ व कर्मयोगाच्याद्वारे भगवद्गीतेद्वारे मानवी मूल्यांचे श्रेष्ठत्व कशात आहे हे समजावून दिले. भगवान महावीरांनी वैर, राग, द्वेष, लोभ यांचा त्याग करून जपतप व दयाद्वारे संयम, समता व सम्यकत्व या तीन तत्त्वांचे अनुकरण करून मनुष्य मोक्षप्राप्ती करून तीर्थंकर बनू शकतो. यशस्वी जीवन व आत्मकल्याणाचा मार्ग कोणता आहे हे सप्रमाण दाखवून दिले आहे.
पर्युषण पर्वामध्ये सर्वात मोठा दिवस म्हणजे संवत्सरी पर्व. या दिवशी क्षमायाचना करून सर्व जीवाची 84 क्षमायाचना संवत्सरी प्रतिक्रमण करून सर्व श्रावक, श्राविका एकमेकांची क्षमायाचना करून एकमेकांची माफी मागतात. तसेच ‘मिच्छामि दुक्कडम’ म्हणत या पर्वाचे समापन मोठय़ा भक्तिभावाने खुल्या अंतःकरणपूर्वक करतात आणि आत्मकल्याणाच्या मार्गाने वाटचाल करू लागतात. हेच पर्युषण पर्वाचे मौलिक महत्त्व आहे.






























































