स्तिमित करणारा भंडारदरा

91

>> आशुतोष बापट

सह्याद्रीचे काळेकभिन्न कडे, त्यावरून कोसळणारे प्रपात आणि सर्वत्र हिरव्या रंगाची पखरण असे उत्साही वातावरण असणारा भंडारदरा परिसर. भटकंतीचं क्रत जोपासायचं तर या भागाला भेट द्यायलाच हवी.

धो-धो कोसळणाऱ्या आषाढसरी संपून ऊन-पावसाचा श्रावण महिना सुरू झालाय. श्रावणात आता पावसाची झड कमी होते आणि ‘क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ असे सुंदर वातावरण असते. व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांची रेलचेल असलेल्या श्रावणात भटकंतीचे व्रत आवर्जून जोपासले पाहिजे. त्यासाठी अनेक ठिकाणे आपली वाट पाहत असतात. भंडारदरा हे त्यातलेच एक रमणीय ठिकाण. नुसते भंडारदराच नव्हे, तर तो सगळाच परिसर मनसोक्त हिंडावा असा आहे.

नगर जिह्याच्या उत्तरेला असलेल्या अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधलेले हे धरण. एक समृद्ध जलाशय आणि त्याच्या आजूबाजूचा सारा देखणा परिसर भटकायला अगदी मस्त आहे. भंडारदरा जलाशय, तिथेच असलेला रंधा धबधबा ही ठिकाणे ऐन पावसाळय़ात मुद्दाम बघावीत अशी आहेत. ब्रिटिशकालीन बांधलेले हे धरण आणि त्याचा विस्तीर्ण जलाशय फार रमणीय आहे. इथेच पुढे प्रवरा नदी उंचावरून खोल दरीत उडी घेते आणि त्यामुळे निर्माण झालेला सुप्रसिद्ध रंधा धबधबा आहे. पावसाळय़ात रंधा आकाराने खूपच फुगलेला असतो. इथे एक काळजी मात्र आवर्जून घेतली पाहिजे. इथे पाण्यात एक बेट आहे आणि अतिउत्साही पर्यटक उगाच धाडस म्हणून त्या बेटावर जातात. वर डोंगरात अचानक पावसाचा जोर वाढला तर नदीचा प्रवाह अकस्मात वाढत जातो आणि हे बेट हळूहळू पाण्याखाली जाऊ लागते. अनेकदा असे जिवावर बेतणारे प्रसंग इथे घडले आहेत आणि सर्व शासकीय यंत्रणांनी पराकोटीचे प्रयत्न करून पर्यटकांना वाचवले आहे. या बेटावर जाणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. आपले सोबती, कुटुंबीय या सर्वांच्याच जिवाला घोर लावणारा हा प्रकार आहे. निसर्गाचा निखळ आनंद घेताना हे प्रकार लक्षात ठेवून टाळले पाहिजेत.

काहीतरी  आचरटपणा करायचा आणि तो मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करायचा या नादापायी इथे अनेक अपघात झालेले आहेत. आपल्या पर्यटनाला असे गालबोट लागू नये याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. निसर्ग इथे भरभरून देतो आहे. त्याचे निव्वळ निरीक्षण केले तरीसुद्धा भरपूर आनंद मिळतो, उत्साह मिळतो, एक नवीन ऊर्जा मिळते. भंडारदरा इथे एमटीडीसीचे विश्रामगृह अत्यंत मोक्याच्या जागेवर आणि राहायला उत्तम आहे. मात्र त्याचे आरक्षण करावे लागते. तसेच अजूनही काही हॉटेल्स आता इथे राहण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच ग्रामीण चवीच्या जेवणाचा आस्वाद घेता येतो.

ट्रेकिंगची सवय असेल तर जवळच असलेला किल्ले रतनगड बघावा. रतनवाडी या पायथ्याच्या गावातून किल्ल्यावर जायला दीड तास पुरतो. देखणा असा रतनगड किल्ल्याला असलेले नेढे म्हणजे डोंगराला असलेले प्रचंड नैसर्गिक छिद्र आणि किल्ल्याशेजारचा खुटा म्हणजेच सुळक्यामुळे उठून दिसतो. शिडीची वाट, गवताळ पठार, तिथे असलेली टाकी, राणीचा हुडा या नावाने ओळखला जाणारा बुरुज, कोकण दरवाजा, साम्रद दरवाजा हे सगळं अतिशय सुंदर आहे. इतिहासकाळात या दुर्गम, बेलाग किल्ल्याला मोठं महत्त्व होतं. राजूर, अलंग हे घाटमाथ्यावरचे आणि सोकुली, वाडी आणि जुरूस्त्राशी हे कोकणातले महाल रतनगडाच्या अधिपत्याखाली होते. रतनगडाच्या पायथ्याशी प्रवरेच्या काठी एक प्राचीन शिल्पसमृद्ध शिवालय आहे-अमृतेश्वर मंदिर. हे मंदिर अतिशय देखणे आहे. संगमेश्वरप्रमाणेच या मंदिराच्या मुखमंडपातील दगडी झुंबर पाहण्याजोगे आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत हे इथले खास वैशिष्टय़. बाजूलाच असलेली भव्य पुष्करणी परिसराची अजून शोभा वाढवते. रतनगडाच्या पार्श्वभूमीवर हे भूमिज शैलीतील विविध शिल्पांनी नटलेले अमृतेश्वर मंदिर रतनगडाच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसते.

पूर्वी रतनवाडी इथे येण्यासाठी शेंडी गावापासून भंडारदरा धरणाच्या जलाशयातून होडीमधून यावे लागे. आता इथपर्यंत उत्तम गाडीरस्ता झाला आहे. हाच रस्ता आता पुढे साम्रद या गावावरून घाटघरपर्यंत जातो. ऐन पावसाळय़ात या रस्त्यावरून जाताना दिसणारा आसमंत अतिशय मोहक असतो. सह्याद्रीचे काळेकभिन्न कडे, त्यावरून कोसळणारे प्रपात आणि सर्वत्र हिरव्या रंगाची पखरण असे सगळे उत्साही वातावरण असते. घाटघरला गेले की, तिथून दिसणारा कोकण कडा आणि घाटघरचा विद्युत प्रकल्प तसेच अलंग-मदन-कुलंग या दुर्गत्रयींचे अगदी जवळून होणारे दर्शन आपल्याला स्तिमित करते. अलंग-मदन-कुलंगचा ट्रेक हा सह्याद्रीमधील सर्वात धाडसी आणि म्हणूनच अत्यंत प्रिय असा समजला जाणारा ट्रेक आहे. घाटघरवरून रस्ता थेट भंडारदरा इथे येतो. हातात दिवस असतील तर पुढे अकोले इथली मंदिरे, टाहाकारी इथले शिल्पसमृद्ध मंदिर ही ठिकाणे पाहता येतील. अतिशय रमणीय परिसर पाहिल्याचे समाधान इथे आल्यावर नक्कीच मिळते. पवित्र अशा श्रावण महिन्यात भटकायचे हे व्रत एकदा घेतले की, वर्षभर ते आपोआप सुरू राहते. वेगळय़ा परिसरात केलेली आपली भटकंती समृद्ध आणि स्मरणीय होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या