आभाळमाया : विश्वातील पहिले वहिले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैश्विक, [email protected]

सुमारे तेरा अब्ज सत्तर कोटी वर्षांपूर्वी आपल्या विश्वाची निर्मिती झाली असं वैज्ञानिक म्हणतात. विश्वनिर्मितीचा ‘बिग बॅन्ग’ सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे. ‘बिंदूवत्’ असलेल्या (?) विश्वाचं ‘महाप्रसारण’ ज्या क्षणी सुरू झालं तो ‘बिग बॅन्ग’चा क्षण त्यानंतर ‘क्षण’ संकल्पना उणी ठरावी इतक्या अल्प वेळात विश्व वेगाने प्रसरण पावू लागलं. स्टीव्हन वाहनबर्ग यांचं ‘फर्स्ट थ्री मिनिटस्’ हे पुस्तक वाचलं तर त्याची यथार्थ कल्पना येईल. ‘बिग बॅन्ग’च्या वेळीच टाइम किंवा ‘काळ’ अस्तित्वात आला. एका प्राथमिक ऊर्जाबिंदूतून प्रसरण पानवलेल्या या विराट विश्वाचा काल म्हणजे आपण ‘पाहू’ शकतो त्या ऑब्झर्वेबल विश्वाचा व्याप अवघा चार टक्के आहे. त्यात ग्रह-तारे, अब्जावधी तारे असलेल्या कोटय़वधी दीर्घिका (गॅलॅक्सी) या सगळय़ाचा समावेश आहे. उरलेल्या त्र्याहत्तर टक्के डार्क एनर्जी आणि तेवीस टक्के डार्क मॅटरचा अभ्यास सुरू आहे.

विश्वाच्या निर्मितीच्या काळातील आरंभीच्या ‘हायड्रोजन’चा शोध घेण्याचा प्रयत्न रेडिओ दुर्बिणी करीत असतात. काही तेजस्वी सुपरनोव्हें (अतिनवतारे) आपल्याला विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील ‘कॉस्मॉलॉजी’ समजण्यास मदत करतात. अशा तेजोमेदांचं वय अब्जावधी वर्षांचं असतं. आपलं विश्व हे स्थिर (स्टॅटिक) आहे या न्यूटनच्या संकल्पनेला आइनस्टाईन यांनी छेद दिला. विश्व प्रसरण  पावतंय हे त्यांच्या गणिती सिद्धांतांतून दिसत होतं, परंतु ‘स्थिर विधां’च्या संकल्पनेबाहेर त्यांना पडता आलं नाही आणि ‘कॉस्मॉलॉजिक कॉन्स्टन्ट’ची कल्पना मांडून त्यांनी विश्व स्थिर असल्याचं म्हटलं. पुढे एड्विन हबल यांनी विश्व प्रसरण पावत असल्याचं सांगितलं आणि आइनस्टाइनच्या एक मोठा शोध (माहित असूनही) हुकला.

अशा या विश्वाचा धांडोळा घेण्याचं काम विविध उपकरणांनी होत असतं. रेडिओ, गॅमा-रे दुर्बिणींप्रमाणेच अवकाशात पाठवलेला फोटो घेणाऱ्या ऑप्टिकल दुर्बिणींचाही त्यात समावेश आहे. एड्विन हबल यांच्याच नावाने अवकाशात गेलेल्या दुर्बिणीने गेल्या पाव शतकाहून अधिक काळात अवकाशाचेही हजारो फोटो काढून आपल्याकडे पाठवलेत. त्यातील ‘हबल डीप फिल्ड’चा फोटो आपल्याला विश्वातील अनेक दीर्घिकांचा समुच्चय दाखवतो.

आता मात्र ‘हायपेटियन’ नावाच्या एका ‘लार्जेस्ट स्ट्रक्चर’चा शोध लागला आहे. या ‘सुपर क्लस्टर’चा काळ मात्र वैज्ञानिकांना आश्चर्यात  टाकणारा आहे. अशा विराट आकाराची ‘वैश्विक रचना’ सध्या अस्तित्वात असलेल्या विश्वात होऊ शकते या संकल्पनेला या महा-क्लस्टरच्या शोधाने धक्का लागला. हे ‘हायपेटियन’ म्हणजे विश्वनिर्मितीच्या क्षणानंतर म्हणजे ‘बिग बॅन्ग’नंतर ‘फक्त’ दोन अब्ज वर्षांनी हे क्लस्टर निर्माण झालंय. याचा अर्थ ते सुमारे अकरा ते बारा अब्ज वर्षे वयाचं आहे.

या ‘हायपेटियन’चे सात घट्ट घनतेचे विभाग असून ते अनेक दीर्घिकांच्या मजबूत ‘धाग्यां’नी बांधलेले आहेत. आपण जी ‘सुपर क्लस्टर’ न्याहाळतो किंवा अभ्यासतो त्यापेक्षा ‘हायपेटियन’ काहीसे निराळे असण्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलंय. आपण ‘ओळखत’ असलेल्या सुपर स्ट्रक्चरमधील वस्तुमान केंद्रीत (कॉन्सटेटेड) दिसतं तर ‘हायपेटियन’मधलं वस्तुमान दुरवरच्या विभागात समप्रमाणात विखुरलेलं वा पसरलेलं आढळतं.

यामधला खूप तांत्रिक भाग वगळला तरी ‘आपल्या विश्वाच्या’ निर्मितीकाळाच्या जवळ जाऊन आपण ज्या विश्वाचे अविभाज्य घटक आहोत त्याची निर्मिती आणि रचना कशी विकसित होत गेली याचा शोध घेणं उद्याच्या ‘वैश्विक’ प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. गेल्या शतकभरात या साऱ्या संशोधनाला विलक्षण गती आलीय. आइनस्टाईन यांनी 1916 मध्ये भाकित केलेल्या ‘गुरुत्वीय लहरीं’चा प्रत्यय शंभर वर्षांनी देणारी ‘लायगो’सारखी उपकरणं आपली वैज्ञानिक जाणीव अधिकाधिक सखोल करीत आहेत. उद्याच्या पिढय़ांना आपका जगा यांचं नव्हे तर वैश्विक भान येणं गरजेचं आहे. अशा तरुणाईसाठी संशोधनातील हे महत्त्वाचे टप्पे मार्गदर्शक ठरतात. ‘काळ अनंत आहे आणि पृथ्वी अफाट आहे’ असं एकेकाळी म्हटलं गेलं. आता तीच पृथ्वी विराट विश्वात एखाद्या सूक्ष्म गोलकाएवढी भासेल आणि अवकाश व काळ यांची निर्मिती तसंच मर्यादा यांचं गणित बरंच काही शिकवून जाईल. कॉस्मॉलॉजी किंवा विश्वरचनाशास्त्र सोप्या शब्दांत मांडता आलं तर ते विज्ञानशाखेचे विद्यार्थी नसणाऱ्यांनाही समजू शकतं. आपल्या जाणीवांची क्षितिजं मात्र त्यासाठी ‘विश्वाकार’ व्हायला हवीत.