मुद्दा – निसर्गाच्या सान्निध्यातील निवास

871

>> गौरव सहानी

हिंदुस्थानचे जलदगतीने शहरीकरण होत आहे. अहवालांमधील आकडेवारीनुसार 2025 वर्षापर्यंत हिंदुस्थानची सुमारे 40 टक्के लोकसंख्या शहरांतून राहत असेल. याला देशभरातील वेगवान एकत्रीकरणाची जोड मिळाल्यास शहरी ग्राहकाचे दैनंदिन आयुष्य सुरळीत ठेवण्याची गरज मोठय़ा प्रमाणावर भासेल असे दिसत आहे. आपली शहरे अस्ताव्यस्त, तणावग्रस्त आणि जटील आहेत असे शहर नियोजनकार ओरडून सांगत आहेतच. अशा परिस्थितीत शहरी आयुष्याच्या कल्पना नव्याने मांडणे ही डिझायनर्स व विकासकांची जबाबदारी आहे.

नैसर्गिक वातावरणात वेळ घालवण्याचे मानसशास्त्राrय फायदे खूप आहेत. कदाचित म्हणूनच अनेकांना दूर कुठेतरी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवावा असे वाटत आहे. रोचक बाब म्हणजे नैसर्गिक वातावरण असलेल्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य खूप चांगले असते. व्यायाम आणि समतोल आहारामुळे आरोग्याला लाभ होतात याची जाणीव आपल्यापैकी अनेकांना असते, पण आपण आपली 80 टक्क्यांहून अधिक आयुष्ये ज्या इमारतींत घालवतो त्यांचे काय?

हे लक्षात घेऊन काही मोजके विकासक आता रहिवाशांना निसर्गाशी जोडून घेण्यात मदत करणाऱ्या प्रकल्पांची आखणी करत आहेत. निसर्गाशी आपले बंध आनुवंशिकतेने कसे जोडलेले असतात यावर हॉर्वर्डमधील प्राध्यापक एडवर्ड ओ विल्सन यांचे पुस्तक ‘बायोफिलिया’ बरेच काही सांगते. एक संकल्पना म्हणून प्रकाश आणि वायुविजन (हवा खेळती ठेवण्याच्या) या नैसर्गिक घटकांच्या एकात्मीकरणाच्या माध्यमातून सौहार्दपूर्ण पर्यावरणाची निर्मिती करून मानवी आयुष्य व निसर्ग जोडण्याचा प्रयत्न यात केला जातो.

बायोफिलियाचा स्वीकार करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड पर्णसंभार असलेली जागा किंवा भव्य हिरवाई असण्याची गरज नाही. नैसर्गिक तसेच दुहेरी पैलूंनी युक्त असे वायुविजन, नैसर्गिक प्रकाश योजना आणि कोणताही अडथळा नसलेले नैसर्गिक भूप्रदेश यांसारख्या घटकांच्या मदतीने शांत वातावरण निर्माण करणारी कोणतीही जागा आपले विश्व बदलून टाकू शकते. शाश्वत रचनेबद्दलच्या आपल्या मर्यादा ओलांडून डिझायनर्स काहीतरी नवे करून बघत आहेत आणि शहरी रहिवाशांचे शरीर व मन ताजेतवाने करणाऱ्या जागा बांधत आहेत हे आता आपल्याला बघायला मिळेल.

एक डिझाइन म्हणून ही संकल्पना समुदायाच्या किंवा इमारतीच्या स्तरावर अमलात आणली जाऊ शकते. योग्य प्रमाणात अमलात आणली गेली तर ही संकल्पना आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याची ठरू शकते. शहरी ग्राहकांसाठी बायोफिलिक डिझाइन्सवर भर देताना डिझायनर्स व विकासकांनी लक्षात घ्यावेत असे काही मुद्दे खाली दिले आहेतः

शाश्वत संबंध :  रचनेमध्ये निसर्गाशी सातत्याने संबंध येत राहण्यावर भर दिला गेला पाहिजे आणि हा विलग अनुभव असू शकत नाही. खरोखर लाभ हवा असेल तर हा संबंध दीर्घकालीन असणे गरजेचे आहे. आयुष्यभराचा दृष्टिकोन मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतो.

रचनेतील हस्तक्षेप :  या रचना (डिझाइन्स) जागेच्या एकंदर वातावरणाशी जुळणाऱ्या असाव्यात. एखादेच रोपटे किंवा संदर्भ नसलेले चित्र यातून बायोफिलिक लिव्हिंग साध्य होऊ शकत नाही. या रचना सांस्कृतिक परिसंस्थेचा भाग झाल्या पाहिजेत.

संबंध दृढ करणे :  रचनेचा निसर्गाशी आतून असलेला संबंध आणि लोक व निसर्गाचे नाते दृढ करत नेणे ही या संकल्पनेची मेख आहे. माणूस हा कायमच समाजशील प्राणी राहिला आहे आणि त्यांच्या नात्याला नेहमीच अवकाशीय संदर्भ राहिला आहे. एक परिपूर्ण बायोफिलिक रचना लोक आणि पर्यावरणातील नाते सशक्त करणारी असते.

(लेखक हे विक्री व मार्केटिंग, पिरामल रिऍल्टीचे अध्यक्ष आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या