मुद्दा – ‘बर्ड फ्लू’ : मानवाला धोका आणि खबरदारी

>> डॉ. फराह इंगळे

ठाणे  जिह्यातील वेहलोली गावामधील एका पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या महिन्यात जवळपास 100 कोंबडय़ांचा मृत्यू झाल्यानंतर शहापूरमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. या कोंबडय़ांमधून गोळा करण्यात आलेले नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आणि चाचण्यांच्या निष्पत्तींमधून पुष्टी झाली की बर्ड फ्लू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचएसएन1 एव्हियन इन्फ्लुएन्झामुळे त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवार सकाळपर्यंत मानक कार्य संचालन प्रक्रियेचे पालन करण्यासाठी शहापूरमधील किमान 15,600 ब्रॉयलर कोंबडय़ा मारण्यात आल्या.

या सर्व बातम्या येत असताना सर्वात मोठी भीती अशी आहे की, आपण एव्हियन फ्लूपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? आणि या फ्लूचा मानवावर किती परिणाम होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरे पुढे आहेत.

एव्हियन इन्फ्लुएन्झा हा आजार एव्हियन (बर्ड) इन्फ्लुएन्झा (फ्लू) टाइप ‘ए’ विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे हातो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रीव्हेन्शन (सीडीसी)च्या मते जगभरात हा आजार सामान्यतः वन्य जलचर पक्षींमध्ये आढळून येतो आणि स्थानिक पोल्ट्री, इतर पक्षी व प्राण्यांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

एव्हियन फ्लू विषाणूंचा संसर्ग मानवांना होत नाही आणि असा संसर्ग दुर्मिळ आहे. मायो क्लिनिकच्या मते, 2015 पासून काही तुरळक केस आढळून आल्या आहेत, पण व्यक्तीला या आजाराचा संसर्ग झाला तर आजार अत्यंत सौम्य असतो, काही रुग्णांना आयसीयू केअरची गरज भासू शकते. हा आजार व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे. 2003 ते 2019 दरम्यान डब्ल्यूएचओने जगभरात एचएसएन1 च्या 861 मानवी प्रकरणांची पुष्टी दिली, ज्यापैकी 455 जणांचा मृत्यू झाला, पण हिंदुस्थानमध्ये मृत्यूसंदर्भात नोंदणी नाही.

मानवांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे सामान्य आहेत. खोकला, ताप, घसा खवखवणे, स्नायुदुखी, डोकेदुखी व श्वास घेताना त्रास होणे. बर्ड फ्लू होणाऱ्या व्यक्तींना जीवनास धोकादायक आजार होऊ शकतात-जसे न्यूमोनिया, पिंकी (कॉन्जेक्टिव्हायटिस), श्वसनक्रिया बंद होणे, किडनी बिघडणे आणि हृदयविषयक आजार.

व्यक्तींना पक्षी किंवा पक्ष्यांच्या विष्ठेच्या जवळच्या संपर्काच्या माध्यमातून बर्ड फ्लू संसर्ग होऊ शकतो. काही व्यक्तींना संसर्गित पक्ष्यांची साफसफाई करताना किंवा ने-आण करताना विषाणूचा संसर्ग झाला आहे. व्यक्तींना संसर्गित पक्ष्यांच्या विष्ठेसह दूषित झालेल्या पाण्यामध्ये पोहल्यामुळे किंवा आंघोळ केल्यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याचीदेखील शक्यता आहे.

यूएन फूड ऍण्ड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणांना जारी केलेल्या संयुक्त निवेदनाच्या मते चिकन व इतर पोल्ट्री उत्पादने योग्यरीत्या शिजवल्यास खाण्यास सुरक्षित आहेत, पण सूत्रांनी सांगितले की, आजाराने ग्रस्त समूहामधील कोणत्याही कोंबडय़ांच्या अन्न साखळीमध्ये समावेश करू नये. एव्हियन फ्लूचा धोका कमी करण्यासाठी काही उत्तम आरोग्यदायी सवयी पुढीलप्रमाणेः

  • क्रॉ-कन्टेमिनेशन टाळा.
  • चिकनचे मांस साफ करताना व तयार करताना ग्लोव्हज् घाला.
  •  कटिंग बोर्डस्, भांडी आणि कच्च्या पोल्ट्रीच्या संपर्कात आलेले सर्व पृष्ठभाग स्वच्छ धुण्यासाठी गरम, साबणाच्या पाण्याचा वापर करा.
  • उत्तमरीत्या शिजवा-रस्सा तयार होईपर्यंत चिकन शिजवा (किमान 30 मिनिटे) आणि किमान इंटर्नल तापमान 165 फॅरेड (74 अंश सेल्सिअस) ठेवा.
  • कच्ची अंडी खाऊ नकाः कच्ची किंवा कमी शिजवलेली अंडी असलेले अन्न टाळा. कारण अंडय़ाचे कवच कोंबडय़ांच्या विष्ठेमुळे दूषित होतात.
  • तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याचा किंवा आवडत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या ऑर्डरमध्ये चिकन व अंडी असतील तर अगोदरच क्वॉलिटीसंदर्भात विचारण्याचा प्रयत्न करा आणि अन्न योग्यरीत्या शिजवले असल्याची खात्री घ्या.
  • घरी सेवन करण्यासाठी प्रीकट किंवा फ्रोजन केलेले चिकन निवडा. तुम्ही ताजे कापलेले चिकन खरेदी करत असाल तर ते शिजवण्यास वापरण्यापर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

 (लेखिका वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये इंटर्नल मेडिसीनच्या संचालक आहेत.)