आभाळमाया : कृष्णविवर ‘दिसले’!

>> वैश्विक

खगोलीय संशोधनातला एक मोठा टप्पा गाठला गेला. 10 एप्रिलला सकाळी अमेरिकेतल्या ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’मध्ये एका महत्त्वाच्या संशोधनाची घोषणा होत असताना ‘खगोल मंडळा’त आम्ही तो कार्यक्रम ‘लाइव्ह’ पाहिला. ब्लॅक होल ऊर्फ कृष्णविवराचा फोटो घेण्यात यश प्राप्त झालं होतं. या संशोधनाची यशस्वीता वर्षभर पडताळल्यानंतर ही घोषणा करण्यात येत होती. 2017 मध्ये गुरुत्वीय लहरी किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्हज्च्या अस्तित्वाचा शोध असाच जाहीर करण्यात आला होता. विश्वनिर्मितीमधली अनेक कोडी उलगडण्याचा ध्यास घेतलेल्या शास्त्र्ाज्ञांना आणखी एक मोठं अद्वितीय यश मिळालं होतं.

ब्लॅक होल किंवा कृष्णविवर म्हणजे एखाद्या ताऱयाची अंतानंतरची एक अवस्था. एखादा तारा आपल्या सूर्याच्या वस्तुमानाचा किंवा त्यापेक्षा कमी वस्तुमानाचा असेल तर त्याचा व्हाइट ड्वार्फ किंवा श्वेतखुजा बनतो. सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.4 ते 3 एवढं वस्तुमान एखाद्या ताऱयाच्या अंतानंतर उरलेल्या अवशेषात राहिलं तर त्याचा न्यूट्रॉन स्टार होतो आणि सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 3 पटींहून जास्त वस्तुमान एखाद्या ताऱयाच्या अंतानंतर उरलेल्या गाभ्यात शिल्लक राहिलं तर त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं. त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की, आसपासचा प्रकाशही त्यात खेचला जातो. ब्लॅकहोलमध्ये खेचली जाणारी गोष्ट बाहेर येत नाही. ती काळोखी ‘वस्तू’ दिसणार कशी? तर प्रकाश खेचण्यापूर्वीच्या स्थितीत ब्लॅकहोलच्या तोंडाशी एक दीप्तीमान कडं तयार होतं. त्याला इव्हेन्ट होरायझन म्हणतात. याच इव्हेंट होरायझनचं नाव धारण करणाऱया पृथ्वीवरच्या आठ ठिकाणच्या रेडिओ दुर्बिणींच्या समुच्चयाने (ग्लोबल ऍरेद्वारा) एम-87 या ‘कन्या’ तारकासमूहातल्या पृथ्वीपासून पाच कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असणाऱया कृष्ण विवराभोवतीच्या वलयाचं सूक्ष्म निरीक्षण करून 6 एप्रिल 2017 रोजी कृष्णविवराचं अस्तित्व सिद्ध करणाऱया इव्हेंट होरायझनचा फोटो घेतला. त्यापासून तयार झालेली सध्या फोटोसारखी प्रतिमा अनेक दिवसांच्या चिकित्सेनंतर 10 एप्रिल 2019 रोजी प्रसृत करण्यात आली. इव्हेंट होरायझन ही ब्लॅकहोलभोवतीची अशी जागा जिथे प्रचंड गुरुत्वीय आकर्षणामुळे भौतिकशास्त्र्ााचे सामान्य नियम लागू पडत नाहीत. 10 एप्रिलला त्याचा फोटो प्रसिद्ध झाल्यावर जगाने आतापर्यंत कधीच न बघितलेल्या ब्लॅक होलचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. आपल्या सूर्यमालेपासून सर्वांत जवळच्या अल्फा सेन्टॉरी किंवा मित्र ताऱयाचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला (सेकंदाला 3 लाख कि.मी. वेगाने)4.16 वर्षे लागतात. त्याच वेगाने प्रकाश आपल्या सर्वांत जवळच्या ‘लार्ज लॅजेलैनिक क्लाउड’ या दीर्घिकेपासून (गॅलॅक्सीपासून) आपल्यापर्यंत यायला 3 लाख वर्षे लागतात. आणि आता त्या एम-87 दीर्घिकेतील ब्लॅकहोलचा फोटो घेतला गेलाय. तिथला प्रकाश आपल्यापर्यंत 5 कोटी वर्षांनी पोहोचतो. म्हणजे आज आपल्याला दिसलेलं ब्लॅक होलचं रूप 5 कोटी वर्षांपूर्वीचे आहे असं म्हणता येईल. खगोलीय अंतर आणि प्रकाशाचा वेग लक्षात घेता दूरस्थ तारे पाहताना आपण खरं तर त्यांचा भूतकाळ पाहत असतो.

आता पुन्हा ब्लॅकहोलच्या फोटोविषयी. ‘इव्हेंट होरायझन’ रेडिओ टेलिस्कोपमध्ये समावेश असलेल्यांमध्ये अमेरिकेतल्या ऑरिझोना येथील सबमिलिमीटर टेलिस्कोप (एसएमटी), हवाई बेटावरचा जेम्स क्लर्क ऍक्सवेल टेलिस्कोप आणि सबमिलिमीटर ऍरे, चिलीमधला ऍपेक्स ऍण्ड अस्मा हा लार्ज तसंच सबमिलिमीटर ऍरे, अंटार्क्टिकातील साऊथ पोल टेलिस्कोप तसंच स्पेनमधील आयआरएएम 30 मी. टेलिस्कोपच्या एकत्रित सहयोगाने या ब्लॅकहोलचा फोटो मिळवण्यात आला. (आपल्याकडची महाराष्ट्रातील रेडिओ दुर्बीण मीटर वेव्हमध्ये काम करणारी असल्याने या प्रकल्पात नव्हती.) या सर्व रेडिओ दुर्बिणींनी पाठवलेल्या ‘डेटा’वरून आपल्याला दृश्य प्रतिमा कॉम्प्युटरवर तयार करता येते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ब्लॅक होल स्पष्ट दिसलं. खगेल विज्ञानाच्या संशोधन अभ्यासातील हा एक क्रांतिकारी क्षण होता. या फोटोची माहिती ब्रुसेल्स, सॅन्टिऍगो चिली, तैपेई, टोकियो आणि वॉशिंग्टन येथून एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आली. जिथून प्रकाशही परत येत नाही असं कृष्णविवर कुणाला भयावह वाटण्याचीही शक्यता आहे. परंतु आपल्या विराट विश्वात अशी अनेक कृष्णविवरं आहेत. आपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) मध्यभागी एक कृष्णविवरच आहे, मध्यभागी फुगीर आणि नंतर चपटय़ा आकाराच्या आपल्या आकाशगंगेचा विस्तार (व्यास) 1 लाख 60 हजार प्रकाशवर्षे इतका असून रुंदी मध्यभागी 600 व दूरवर 200 प्रकाशवर्षे इतकी आहे. 200 अब्ज तारे असलेल्या आपल्या आकाशगंगेतला आपला जीवनदाता सूर्य हा एक सामान्य तारा असून आपली सूर्यमाला दीर्घिकेच्या केंद्रकापासून 26 हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आणखी एक विस्मयकारी गोष्ट म्हणजे आपली सूर्यमाला (आपल्या पृथ्वीसकट) आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती 22 कोटी वर्षांत एक परिक्रमा पूर्ण करते. म्हणजे आपणही सारे एका कृष्णविवराभोवती ताशी 790,000 कि.मी. किंवा सेकंदाला सुमारे 250 कि.मी. वेगाने गरगरत आहोत. चक्रावलात ना? हीच तर खगोलीय गंमत आहे… आणि सत्यही! ब्लॅकहोलच्या फोटोसारखंच.