आभाळमाया : नव्या ‘जगांचा’ शोध

>> वैश्विक ( [email protected] )

दोन आठवडय़ांपूर्वी पृथ्वीजवळून जाणाऱ्या एका महापाषाणाच्या संभाव्य (न) कोसळण्याबद्दल लिहिलं होतं. आता पुन्हा म्हणे 6 सप्टेंबरला असाच एक अशनी पृथ्वीजवळून जाणार आहे. त्याचीही चिंता नको. तो त्याच्या मार्गाने निघून जाईल. उलट त्याच सुमारास चंद्रावर उतरणारं आपलं ‘विक्रम’ लॅण्डर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर काय कामगिरी करतंय त्याची उत्सुकता अधिक आहे. ‘इस्रो’ने अत्यंत यशस्वीपणे ही मोहीम कार्यान्वित केली असून चांद्रयान-2 ठरल्याप्रमाणे पृथ्वीभोवती चार फेऱ्या मारून पाचव्या फेरीत कक्षा वाढवून चंद्राच्या दिशेने अचूकतेने निघालंय. ते 27 ऑगस्टला चंद्राभोवती फेऱ्या घालू लागेल.

पृथ्वीभोवती ज्या तंत्राने चांद्रयान-2 फेऱ्या मारून कक्षेबाहेर पोचण्याची ऊर्जा मिळवण्यात यशस्वी ठरलं तरच ते चंद्राभोवतीही फिरेल आणि यथावकाश वेग नियंत्रित करून 7 सप्टेंबर रोजी ‘विक्रम’ चंद्रावर उतरेल. आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण भागात जिथे कोणताही देश पोहोचलेला नाही तिथे आपलं ‘प्रज्ञान’ रोव्हर यशस्वीरीत्या चाललं की आपण चंद्र जिंकला. मग पुढचा टप्पा चंद्रावर माणूस पाठवण्याचा. आपले हे यशस्वी प्रयत्न गती घेत असतानाच चंद्राविषयी ज्या विविध बातम्या अधूनमधून येत असतात, त्यापैकी एक म्हणजे अतिशीत किंवा अतिउष्ण वातावरणातही तग धरू शकणारे काही सूक्ष्म जीव पृथ्वीवर आहेत तसेच ते चांद्रपृष्ठाखाली असण्याचा कयास आहे.

असे अंदाजच नव्या संशोधनाला वेग देतात. थोडक्यात, चंद्र आपल्याला आणखी बराच समजायचाय. मुळात आपली पृथ्वी तरी आपल्याला पूर्णत्वाने समजली आहे का, हा एक प्रश्नच आहे. एकदा एका फ्रेंच खगोलविदाशी बोलणं सुरू असताना हातातल्या पुष्पगुच्छावर बसलेल्या सूक्ष्म चिलटाकडे पाहत ते म्हणाले, ‘‘अजून आपल्याला पृथ्वीवरच्याच या ‘फ्लोरा-फौन’ची नीटशी ओळख झालेली नाही आणि आपण विश्वातील इतरत्र असलेल्या जीवसृष्टीचा ध्यास घेतलाय.’’ अर्थात संशोधनाच्या क्षेत्रात ‘मॅक्रो’ आणि ‘मायक्रो’ अशा दोन्ही पद्धतीने काम करावं लागतं. त्यामुळे ‘पृथ्वीबाहय़’ जगाचा शोध घेण्याचे प्रयास अविरत सुरू राहणार यात शंका नाही.

तर त्याचसंदर्भातलं गेल्याच महिन्यातलं वृत्त म्हणजे ‘नासा’च्या परग्रह संशोधन मोहिमेत तीन वेगळय़ा ‘जगांचा’ शोध लागलाय. ‘जगांचा’ याचा अर्थ इथे पृथ्वीसदृश ग्रहांचा असा घ्यायचा. कारण आपली जीवसृष्टीविषयक ग्रहांची संकल्पना पृथ्वीकेंद्रित आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीला पोषक वातावरण निर्माण झालं तसंच एखादं सर्वगुणसंपन्न ‘हॅबिटेबल झोन’ ‘त्या’ कोणत्या तरी ताऱ्याभोवतीच्या एका ग्रहाला प्राप्त झालं असेल तर तिथे सजीवांची वाढ होण्याची शक्यता जास्त. ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट किंवा परताऱयांभोवतीच्या ग्रहांचा वेध आणि शोध घेणाऱ्या उपग्रहाने त्याच्या प्रवासात अशा वस्तीयोग्य असू शकणाऱ्या ग्रहापर्यंतच्या संशोधनातील निम्मं लक्ष्य पार केलंय. पृथ्वीसदृश किमान चार ग्रह सापडल्याचा दावा केला जातोय.

2018 च्या एप्रिलमध्ये हा ‘टेस’ नावाची पाहणी उपग्रह अवकाशात भिरभिरतोय. त्या काळात त्याने 21 परग्रहांना वसाहतयोग्य ठरवलंय आणि आणखी अशाच साडेआठशे ग्रहांचा मागोवा घेणं सुरू आहे. आता या सर्वच ठिकाणी सजीवाला राहण्यायोग्य वातावरण असेल की नाही ते यथावकाश स्पष्ट होईल.

यातील तीन ‘जगं’ दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या पिक्टर तारकासमूहातील एका लाल खुज्या ताऱ्याभोवती फिरत असल्याचं म्हटलंय. हा तारा आपल्या सूर्यमालेपासून 70 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. मात्र यापैकी एकही निश्चितपणे वसाहतयोग्य नाही. परंतु असा शोध घेता घेताच कधीतरी आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतील (मिल्की-वे गॅलॅक्सीमधील) एखाद्या ‘जिवंत जगाचा’ शोध दृष्टिपथात येईल. तुलनेने नुकतंच बाळसं धरू लागलेल्या अवकाश संशोधनातली ही प्रगती काही कमी मोलाची नाही.

‘हॉलीवूड’ने अशा काल्पनिक जगांवर आतापर्यंत अनेक सिनेमे काढलेत. नाटककार वसंत कानेटकर यांना ‘कल्पनेच्या पलीकडे’ नावाचं नाटक अशाच विषयावर लिहायचं होतं असं त्यांनी एका भेटीत सांगितल्याचं आठवतं. या विषयांवरच्या चर्चेने पृथ्वीपलीकडच्या ‘विश्वा’चा विचार उद्याची पिढी करू लागेल. रचनात्मक विचार शृंखलाच नव्या संशोधनाला जन्म देत असते. आधी नुसता विचार किंवा संकल्पना (हायपोथिसिस) असलेली गोष्ट वैज्ञानिक सत्यांच्या अनेक कसोटय़ांवर पारखून आणि त्याला गणिती परिमाणांची जोड मिळून ती सिद्ध झाली की, नवे शोध लागतात. नव्या ‘जगाच्या शोधाचंही तसंच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या