>> अश्विन बापट
चिकू पावडर, चिकू स्लाइस, चिकू पल्प ते ‘रेडी टू यूज’ कडधान्ये आणि बरंच काही… डहाणूमधील मेघना जोशींच्या फॅक्टरी युनिटमधील उत्पादनांचं हे वैविध्य आणि त्यांनी चोखाळलेली उल्लेखनीय म्हणावी अशी वेगळी वाट.
उद्योजिका मेघना जोशी यांच्या उत्पादनांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी आधी याची निर्यात केली आणि आता त्या स्थानिक बाजारपेठेत आपली उत्पादनं पोहोचवत आहेत.
याबद्दल त्या म्हणाल्या, मी 21 वर्षे फायनान्समध्ये एमएनसी कंपनीत सीएफओ म्हणून काम केलं. मी स्वतः चार्टर्ड अकाऊंटंट आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ही वेगळी वाट मी निवडली आणि आता या व्यवसायाला पूर्ण वाहून घेतलंय. माझी एक पार्टनर आहे, जिने अमेरिकेत हावर्डमधून न्यूट्रिशन डिप्लोमा केलाय. तिच्या साथीने मी आधी अमेरिकेत उत्पादनांची निर्यात सुरू केली. ही उत्पादनं आरोग्यदायी असल्याने त्याला तिथे चांगली मागणी मिळू लागली. चिकू स्लाईस, चिकू पावडर यासारख्या प्रॉडक्ट्सना चांगली मागणी आहे. अमेरिकेसोबतच यूकेमध्येही आमच्या प्रॉडक्ट्सना नियमित मागणी येतेय. परदेशात सातत्याने ऑर्डर्स सुरु झाल्यावर स्थानिक बाजारपेठेतही आमच्या व्यवसायाचा पाया भक्कम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चिकूनंतर जांभूळ पल्प, जांभूळ रोल्स, जे सुरळीच्या वड्यांसारखे असतात. असे प्रॉडक्टही आम्ही सुरू केलेत. आरोग्यपूरक तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी ही उत्पादनं महत्त्वाची ठरत असल्याने लोकांनीही त्याला चांगली पसंती दिलीय. चिकू, जांभळानंतर आता आंब्याची आणि फणसाचीही रोल, पल्प अशी उत्पादनं मोठय़ा प्रमाणात बाजारात आणण्यासाठी आम्ही पावलं टाकली आहेत. तक्षवी प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीचा झिप फ्रूट ब्रँड हळूहळू लोकांपर्यंत पोहोचतोय. डहाणू परिसरातील आदिवासी पाडय़ातील सुमारे 30 स्त्री -पुरुष कर्मचारी आमच्या फॅक्टरीमध्ये काम करतात.
फळांखेरीज रेडी टू यूज कडधान्य हे आमचं उत्पादनही मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय. हे र्किंग वुमनसाठी फारच उपयुक्त उत्पादन आहे. मटकी आणि मुगाची रेडी टू यूज मोड आलेली कडधान्ये हे आमच्या ब्रँडचं खास उत्पादन घराघरात जावं अशी माझी आणि आमच्या टीमची इच्छा आहे. एरवी कडधान्याला मोड येण्यासाठी अंदाजे 12 ते 14 तास लागतात. आमच्या या रेडी टू यूज पॅकेटमधील कडधान्ये 15 मिनिटं तुम्ही गरम पाण्यात भिजवली तर त्याला मोड येतात. शिवाय ही प्रॉडक्ट्स सहा महिने टिकू शकतात. आमची उत्पादनं मुंबईत ठिकठिकाणी विक्रीसाठी जात असतात. मुंबईतील दादर, विलेपार्ले, मुलुंड, ठाणे यांसारख्या भागात आमच्या पदार्थांना चांगली मागणी आहे. याशिवाय मुंबईतील चार ते पाच फाइव्ह स्टार हॉटेल्सना आम्ही पल्पचा पुरवठा करत आहोत. कोणतीही प्रिझर्वेटिव्हज्, कृत्रिम रंग तसंच साखर न वापरता आमची उत्पादनं आम्ही तयार करतो. भविष्यात प्रॉडक्ट रेंज वाढवण्याकरिता फॅक्टरीची उत्पादन क्षमताही आम्हाला वाढवावी लागेल यादृष्टीनेही आमची चाचपणी सुरू झालीय, असंही मेघना जोशी यांनी आवर्जून सांगितलं.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोड्युसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)