लेख – चीन तैवानवर हल्ला करणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन  

रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये युक्रेनला सैन्याची मदत करण्याकरता नाटो, अमेरिका तयार नाही. यामुळे आता चीनकडून तैवानवर लष्करी हल्ल्याची शक्यता वाढत आहे. चीन अनेक वर्षं तैवानविरुद्ध हायब्रीड वॉर लढत आहे. रशियानेसुद्धा 2014 मध्ये युक्रेनविरुद्ध हायब्रीड वॉरफेअर सुरू केले आणि त्याचे आता पारंपरिक युद्धात रूपांतर झाले. याच पद्धतीने चीनच्या तैवान विरोधातील हायब्रीड युद्धाचे रूपांतर पारंपरिक युद्धात होईल का, हा प्रश्न आहे.

चीनने तैवानविरुद्ध सुरू केलेल्या हायब्रीड युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र आहे मीडिया वॉरफेअर. ज्याचा उद्देश आहे की, तैवानच्या सैन्याला, नेतृत्वाला आणि जनतेला घाबरवून टाकायचे. ज्यामुळे ते चीनविरुद्ध युद्ध करण्यास तयार होणार नाहीत. एका अमेरिकन लेखकाने नुकतेच एक नवीन पुस्तक लिहिले आहे – ‘चायनीज मीडिया वॉरफेअर अगेंन्स्ट तैवान’. या पुस्तकात मोठे संशोधन करून अनेक बाबी पुढे आणलेल्या आहेत, ज्या जगाला माहिती नव्हत्या. हीच कारवाई हिंदुस्थानातसुद्धा होत आहे. त्या मीडिया वॉरफेयरला प्रत्त्युत्तर कसे दिले पाहिजे यावर आपण लक्ष केंद्रित करू.

मीडियामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाचा समावेश आहे. मीडिया वॉरफेअरचा उद्देश आहे की, बातमी ही शस्त्र म्हणून वापरायची. त्यामुळे तैवानच्या जनतेचे मतपरिवर्तन करून त्यांना कमजोर करायचे, त्यांची चीनविरुद्ध लढण्याची शक्ती, इच्छा आणि ताकद कमी करायची. म्हणून चीन वेगवेगळ्या पद्धती वापरून तैवानच्या जनतेला आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये वर्तमानपत्रे, रेडिओ, चित्रपट, टीव्हीचे कार्यक्रम, पुस्तके, व्हिडिओ गेम्स, शैक्षणिक व्यवस्था आणि ग्लोबल मीडिया नेटवर्क ही  क्षेत्रे सामील आहेत.  मीडिया वॉरफेअरमध्ये चीन त्या देशातील प्रसारमाध्यमांत चीनच्या बाजूने लेख मॅनेज करतो. त्यामुळे ऑनलाईन दहशतवाद, ऑनलाईन मानसिक युद्ध वाढवता येते. दुसऱ्या देशाच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करता येतो. महत्त्वाच्या नागरिकांचे मतपरिवर्तन करून त्यांना चीनच्या बाजूने आणता येते. व्यापारी जगताला साम, भेद, दंड याचा वापर करून चीनशीच व्यापार करायला सांगितले जाते. चीन प्रोपोगंडा वॉरफेयर, दुष्टाचार, फेक बातम्या शस्त्रांचा वापर करून मतपरिवर्तन करतो.

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर चीनने मीडिया वॉरफेअर सुरू केले. या महामारीला चिनी व्हायरस असे म्हणायला हवे होते. परंतु चीनचा डब्ल्यूएचओवर असलेल्या पूर्ण कंट्रोलमुळे याचे नाव कोव्हिड-19 असे ठेवण्यात आले. यासाठी अमेरिकी किंवा इतर शास्त्रज्ञांना जबाबदार ठरवण्यात आले. कुठल्याही देशाची चीनने महामारी पसरवली म्हणून सांगण्याची हिंमत झाली नाही. चीनने तैवानमध्ये भीती पसरवली की, या महामारीमुळे तैवान पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. चीनने तैवानमध्ये पुस्तकांतून चीन कम्युनिस्ट पक्षाची कथा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तैवान हा चीनचा एक भाग होता, तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही चीनमध्ये सामील व्हावे.

याशिवाय चीनने प्रत्येक देशात चिनी विद्यार्थी आणि स्कॉलर्स असोसिएशन नावाची  संस्था निर्माण केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना पैसे देऊन चीनच्या बाजूने आणले जाते. चिनी कनयस इन्स्टिटय़ूट या जगामध्ये काम करत आहेत, ज्या चीन कम्युनिस्ट पार्टीमार्फत कंट्रोल केल्या जातात. वेगवेगळ्या देशांतून प्रकाशित होणारे संशोधनसुद्धा चीन कंट्रोल करतो. चीनच्या विरोधात कुठलेही संशोधन चीन होऊ देत नाही. याकरिता पुस्तक प्रकाशित करणारे, पुस्तक वितरीत करणारे, पुस्तके विकणारे, पीएचडी करणारे अशा सगळ्यांना ब्लॅकमेल करून चीनविरोधातले संशोधन थांबवले जाते.

सोशल मीडियाचासुद्धा चीन गैरवापर करत आहे. चीनच्या सोशल मीडियामध्ये कोणीही घुसखोरी करू शकत नाही. परंतु हिंदुस्थानच्या किंवा तैवानच्या सोशल मीडियामध्ये चिनी हस्तकांनी घुसखोरी केलेली आहे. अनेकांना ट्रोर्ल्स बनवून चीनच्या विरुद्ध लिहिणाऱ्यांच्या वर हल्ला करायला सांगितले जाते. चीनने तीन लाखांहून जास्त सैनिक स्ट्रटेजिक सपोर्ट फोर्समध्ये तैनात केले आहेत.

ते ऑनलाईन दहशतवादाचा वापर करतात. चीन सोशल मीडियामध्ये सायबर हल्ले करून किंवा आर्टिफिशियल इंटिलिजेन्सचा वापर करून किंवा ऑनलाईन दहशतवाद पसरते. तैवानमध्ये स्मार्ट फोन आणि इंटरनेटचे स्पीड जास्त असल्यामुळे सायबर हल्ल्यांना त्यांना बळी पडावे लागले. चीनने यू-टय़ूबवरसुद्धा मोठय़ा प्रमाणात घुसखोरी केलेली आहे. जे यू-टय़ुबर चीनच्या विरुद्ध बोलतात त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाते, त्यांच्यावर सायबर हल्ले केले जातात. चीन वेगवेगळ्या व्हिडीओ प्लॅटफार्ममध्येसुद्धा घुसखोरी करतो. एंटरटेनमेंटद्वारे इनडॉक्ट्रिनेशन करण्याच्या युद्ध पद्धतीला एंटरटेनडॉक्ट्रिनेशन असे म्हटले जाते.

एक साधा सिनेमा बॅटल ऑफ कोरियन वॉर याकरिता चीनने जर 200 मिलियन डॉलर एवढा खर्च केलेला आहे. 1950 साली युनायटेट नेशन्सच्या फोर्सवर हल्ला केलेल्या चीनची ही कहाणी आहे. यामध्ये दाखवण्यात आले होते की, चीन नॉर्थ कोरियाच्या बाजूने चांगले काम करत होता आणि युनायटेड नेशन्सचे सैनिक हे चुकीचे काम करत होते. चीनने वेस्टर्न वर्ल्डच्या फिल्म मीडियात घुसखोरी केली आहे. हॉलीवूडची चीनच्या विरुद्ध फिल्म तयार करण्याची हिंमत नाही. चीनने सिनेमातल्या कुठल्याही प्रसंगाला काढून टाका म्हटले, तर ते लगेच काढून टाकतात.

परदेशातील टीव्ही चॅनल्सना चीन फ्री कंटेंट देतो. फ्री कंटेंट चीनचे स्तुती करणारे असतात. जे चिनी नागरिक देशाच्या बाहेर गेलेले आहेत त्यांच्यावर चीन हेरगिरी करतो. चीनने बाहेर असलेल्या चिनी नागरिकांना संस्थांमध्ये एकत्रित केलेले आहे. चीन परदेशातून आलेल्या चिनी नागरिकांवर लक्ष ठेवतो.

चीन तैवानमध्ये नेमके काय करत आहे आणि त्याला तैवान कसे प्रत्युत्तर देत आहे, याचा अभ्यास करून आपणसुद्धा प्रत्त्युत्तर कारवाई चीनविरुद्ध करू शकतो. एकूणच चीनच्या विरोधात कोठेही काहीही लिहिले जात नाही. या माहितीचा वापर हिंदुस्थान कसा करू शकेल? आपण हिंदुस्थानात प्रत्येक क्षेत्रात चीनची घुसखोरी किती झालेली आहे याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून आपण चीनच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कशी घुसखोरी करायला पाहिजे, चीनचे दुष्प्रचाराचे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. जे हिंदुस्थानी बळी पडत आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

[email protected]