
>> स्पायडरमॅन
‘व्हेनिस’सारखे पर्यटनस्थळ हे जगभरात अनेकांना मोहिनी घालणारे; तर कश्मीरमधील ‘शिकारे’ हे अनेक पर्यटकांचे जीव की प्राण आहे. पाणी, मग ते समुद्राच्या रूपात असो, धबधब्याच्या रूपात असो किंवा तलावाच्या; अनेक पर्यटकांना ते आपल्याकडे कायम आकर्षित करत आले आहे. आता तर साऊथ कोरियाच्या बुसान शहरामध्ये चक्क पाण्यावर तरंगणारे शहर निर्माण होत आहे. सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर या शहराची जोरदार चर्चा सुरू आहे.
संयुक्त राष्ट्राच्या पाठिंब्याने, जगातील या पहिल्या पाण्यावर तरंगणाऱ्या शहराचा प्रोटोटाइप निर्माण केला जात आहे. ‘OCEANIX’ असे नाव देण्यात आलेल्या या प्रोजेक्टची घोषणा खरे तर गेल्या वर्षी करण्यात आली होती. सध्या या शहराच्या नव्या नव्या डिझाइनने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली आहे. 15.5 एकर क्षेत्रफळात एकमेकांना जोडलेल्या अनेक प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने हे शहर वसवले जाईल. या शहरात अंदाजे 12000 लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 2025 पर्यंत तयार होणाऱ्या या प्रोजेक्टसाठी अंदाजे 15 अब्ज रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. समुद्राची सतत वाढणारी पातळी ही सध्या जगभरातील अनेक किनारपट्टीवर वसलेल्या शहरांसाठी गंभीर समस्या बनलेली आहे. अशा वेळी पाण्याचाच वापर जमिनीसारखा करून सर्व अत्यावश्यक सुविधा उभ्या करण्याचा हा प्रयत्न, नक्कीच जगाला आश्वस्त करेल असा निर्मात्यांना विश्वास वाटतो. अशा प्रकल्पामुळे किनारपट्टीवर वास्तव्य करणाऱ्या अनेक लोकांना समुद्रपातळीच्या धोक्यापासून संरक्षित करता येणार आहे.
OCEANIX प्रोजेक्टच्या निर्मात्यांच्या सांगण्यानुसार सध्या जगातील 5 पैकी 2 लोक हे किनारपट्टीपासून 100 किलोमीटरच्या परिसरात वास्तव्यास आहे. हे प्रोजेक्ट अशा लोकांसाठी मोठी आशा निर्माण करणारे आहे. सुंदर अशा निळ्या सरोवरावर उभारल्या जात असलेल्या या शहरात अनेक पूल असणार आहेत आणि हे शहर विविध प्लॅटफॉर्मने एकमेकांशी जोडले गेलेले असेल. शहरात सात मजल्यापेक्षा कमी उंचीच्या इमारती उभारण्यात येणार असून, जोरदार वाऱ्यांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल.






























































