
>> सनत्कुमार कोल्हटकर
सुदानमध्ये दोन प्रबळ गटांमध्ये संघर्ष पेटला असल्याचे दिसत असले तरी हा संघर्ष या गटांच्या मागे उभ्या असणाऱ्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांच्यादरम्यान उद्भवलेला आहे. अमेरिकेला सुदानमधील त्यांच्या अनिर्बंध खाणकामामध्ये इतर कोणाला आणि विशेषतः रशियाला वाटा देण्याची इच्छा नाही. या संघर्षामुळे गेल्या एक महिन्यात 11 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.
सुदान…उत्तर आफ्रिकेमधील सर्वात मोठा देश आहे. इतर आफ्रिकन देशांपेक्षा त्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. या देशाची बरीच मोठी सीमा इजिप्तला लागूनच आहे. उत्तर आफ्रिकेतील या देशाबरोबर इजिप्त देशाचे चांगले संबंध आहेत. रेड सीला लागून असणाऱ्या या देशाला रेड सीचा मोठा किनारा लाभलेला आहे. तसेच सुदानच्या अत्यंत मोक्याच्या सामरिक / भौगोलिक स्थानामुळे त्याला जागतिक भू-राजकीय परिस्थितीमध्ये मोठे महत्त्व आलेले आहे. सुदानकडे खनिज संपत्तीचे साठे असून त्या देशाला सुपीक जमीनही मुबलक प्रमाणात लाभलेली आहे.
2022 मध्ये सुदानमधील खाणींमधून मिळालेल्या सोने उत्पादनाचा अधिकृत आकडा सुमारे 18 टन आहे, पण अनधिकृत सोने उत्पादनाचा आकडा यापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. सुदानमध्ये सोन्याच्या मोठय़ा खाणी आहेत. या खाणींमध्ये अर्थातच पश्चिमी देशांची आणि त्यातही अमेरिकेची मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेने आतापर्यंत येथून किती शेकडो / हजार टन सोन्याचे उत्पादन घेतले हे स्पष्ट नाही.
सुदान देशाचे लष्करप्रमुख अब्देल फताह आणि जनरल मोहमद हमदान दगालो या दोघांमधील मतभेदाने हा संघर्ष पेटलेला आहे. जनरल मोहमद हमदान दगालो यांना रशियाकडून शस्त्रास्त्रांचा मुबलक पुरवठा होत असल्याचे सांगतात. या संघर्षाला धार चढली ती विशेषतः अगदी अलीकडेच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव यांनी फेब्रुवारीमध्ये सुदानला भेट दिली होती त्यानंतर. सुदानची राजधानी खार्टूममध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुदानमध्ये नाविक तळ बांधणे आणि सुदानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे याबद्दल करार झाल्याचे सांगण्यात येते. रशियाचे 300 सैनिक आणि रशियाची 4 लढाऊ जहाजे सुदानमधील या नाविक तळावर कायम उपस्थित असतील. सुदानला या बदल्यात रशियाकडून पुढील 25 वर्षे शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येईल. दिबोटीमध्ये स्थान न मिळाल्याने रशियाने सुदानकडे त्यांचा मोर्चा वळविला असल्याचे सांगण्यात येते. रशियाच्या वॅग्नर ग्रुपने सुदानला लष्करी प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. तसेच सुदानमधील सोन्याच्या खाणींचा विस्तार करण्यामध्ये वॅग्नर ग्रुपने रस दाखविला आहे.
सर्जेई लावरोव यांच्या भेटीनंतर लगेच अमेरिका, यू.के. आणि फ्रान्सच्या प्रतिनिधींकडून सुदानला भेट देण्यात आली. रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर रशियावर अमेरिका आणि त्याचे मित्रदेश यांनी निर्बंध टाकले असताना रशियाकडून सर्जेई लावरोव यांनी सुदानला भेट देणे आणि सुदानमध्ये नाविक तळ उभा करण्याच्या रशियाच्या हालचाली या अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांना अस्वस्थ करणाऱ्या होत्या. अमेरिकेला सुदानमध्ये रशियासारख्या त्याच्या शत्रुदेशाची उपस्थिती नको आहे.
आफ्रिका, लॅटिन अमेरिका, इराण आणि आशियातील अनेक देशांकडून अमेरिकन डॉलरला वगळून इतर चलनाचे मार्ग शोधणे वेगाने चालू असल्याने अमेरिकाही डॉलरच्या आधारासाठी सोन्याचा साठा वाढवत असावी असे दिसते. त्यामुळे इथून तिथून जिथे मिळेल तिथून सोने या धातूचा साठा वाढविण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ऑस्ट्रेलियामधील एका सोन्याच्या खाणीचे जे टेंडर निघाले होते, त्यामध्ये अमेरिकेने सर्वात जास्त बोली लावल्यामुळे त्याला त्या खाणींची मालकी मिळाली.
सुदानमध्ये दोन प्रबळ गटांमध्ये संघर्ष पेटला असल्याचे दिसत असले तरी हा संघर्ष या गटांच्या मागे उभ्या असणाऱ्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांच्यादरम्यान उद्भवलेला आहे. अमेरिकेला सुदानमधील त्यांच्या अनिर्बंध खाणकामामध्ये इतर कोणाला आणि विशेषतः रशियाला वाटा देण्याची इच्छा नाही. या संघर्षामुळे गेल्या एक महिन्यात 11 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. लष्कराची लढाऊ विमाने व निमलष्करी दलांची हेलिकॉप्टर्स खार्टूममधील परस्परांच्या ठिकाणांना लक्ष्य करीत असल्याचे सांगण्यात येते. 2021 साली सुदानमधील सरकारविरोधात बंडाळी करणारे लष्करप्रमुख जनरल बुरहान आणि निमलष्करी दलांचे प्रमुख जनरल दागालो यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनला आहे. या गृहयुद्धात बळी पडलेल्यांची संख्या साडेआठशेच्या नजीक पोहोचली असून तीन हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. हा ‘वांशिक’ संघर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुदानमध्ये काम करत असणाऱ्या हिंदुस्थानींना सुरक्षितपणे तेथून बाहेर काढण्यासाठी हिंदुस्थान सरकारला बरेच प्रयत्न करावे लागले होते. 15 एप्रिलपासून सुदानचे लष्कर आणि निमलष्करी दल असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्समध्ये (आरएसएफ) घनघोर संघर्ष सुरू झाला होता. राजधानी खार्टूमचा ताबा मिळविण्यासाठी आरएसएफने जोरदार हल्ले चढविले होते. सुदानच्या जनतेला आवश्यक ते सहाय्य पुरविण्यासाठी करण्यात आलेली तात्पुरती तडजोड म्हणून संघर्षबंदीसाठी सौदी अरेबिया आणि अमेरिकेने पुढाकार घेतला होता.
एडनच्या आखातातील रेड सी अर्थात लाल सामुद्रधुनीचा नकाशा जर समोर ठेवला तर या क्षेत्रामध्ये ज्या काही घटना अलीकडल्या काही महिन्यांत घडल्या आहेत किंवा अजूनही घडत आहेत आणि येणाऱ्या काळात घडण्याची शक्यता आहे ते बघता आणि जगातील अनेक देशांनी या भागातील प्रदेशामध्ये आपापले अस्तित्व निर्माण करण्यासाठी ज्या काही धडपडी आणि हालचाली चालविलेल्या आहेत त्या औत्सुक्यपूर्ण आहेत. हा प्रदेश अथवा रेड सीची सामुद्रधुनी ही येणाऱ्या काळात अनेक जागतिक घडामोडींचे केंद्र असेल असे दिसते आहे. इजिप्तकडून इजिप्तच्या सुएझ चॅनलच्या विशेष आर्थिक क्षेत्रात हिंदुस्थानला टर्मिनल वेअरहाऊस बनविण्यासाठी जागा देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.
सुदानजवळ असणाऱ्या चाड या उत्तर आफ्रिकेतील देशाने नुकतेच इस्रायलमध्ये त्यांचा दूतावास सुरू केला आहे. अर्थातच इस्रायलचाही चाडमध्ये दूतावास सुरू होत आहे. चाड या देशाकडे समुद्र किनारा नसला आणि तो देश चारही बाजूंनी भूभागाने वेढला गेला असला तरी उत्तर आणि मध्य आफ्रिका यांच्या मध्यवर्ती ठिकाणी हा छोटा देश वसलेला आहे. सुदानला या देशाच्या सीमा भिडलेल्या आहेत आणि सुदानला रेड सीचा किनारा लाभलेला आहे.
हिंदी महासागर आणि रेड सी यांच्या एकमेकांना भिडणाऱ्या मोक्याच्या ठिकाणी दिबोटी बंदर वसलेले आहे. या मोक्याच्या बंदराच्या ठिकाणी चीनने यापूर्वीच त्यांचा नाविक तळ उभा केलेला आहे. चीनने दिबोटी या इथिओपियाजवळील अत्यंत मोक्याच्या जागेवर असणाऱ्या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी चीनचा नाविक तळ आणि त्यासाठी लागणाऱ्या मालाचा चढउतार, रहदारी यासाठी उत्तम सोयीसुविधा उभ्या केल्या आहेत. रेड सीमधील एडनच्या आखातातील सागरी मार्ग येथून मोठय़ा प्रमाणात होणारी सागरी वाहतूक लक्षवेधी आहे. फ्रान्सचाही दिबोटी येथे पूर्वीपासूनच हवाई दलाचा तळ आहे. जर्मनी, अमेरिका, इटली याही देशांची छोटय़ा प्रमाणात का होईना, दिबोटी येथे लष्करी उपस्थिती आहे.
महासत्तांच्या संघर्षामध्ये सामान्य सुदानी नागरिकांचा बळी जाताना दिसतो आहे.