‘त्या’ 23 ला काँगेसचा धक्का…

काँग्रेसने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमावा, पक्षाचे कॉर्पोरेट कल्चर बदलावे असा आवाज उठवून ‘पत्रप्रपंच’ करणाऱया 23 नेत्यांचा एकेक करून काँगेस हायकमांड सध्या आपल्या पद्धतीने ‘हिसाबकिताब’ करत आहे.

या पत्राचार मोहिमेचे दोन प्रमुख गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा यांना पक्षाने त्यांची जागा खूपच लवकर दाखवून दिली. वास्तविक आझादांना इतर राज्यांतूनही काँगेस राज्यसभेवर आणू शकली असती, मात्र काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावावर फुली मारली. आझादानंतर आपणच विरोधी पक्षनेते अशा ‘आनंदा’त असलेल्या आनंद शर्मांच्या आनंदावर पक्षश्रेष्ठाRनी विरजण टाकले. पहिल्यांदाच राज्यसभा खासदार बनलेल्या मल्लिकार्जुन खरगेंना विरोधी पक्षनेते बनवून शर्मांना धक्का दिला. पत्रावर ज्या 23 नेत्यांनी सह्या केल्या त्यांचे पंख छाटणे सुरू आहे.

त्यात लगेचच खुलासा करणाऱया जितीन प्रसादांसारख्या काही नेत्यांना जरूर दिलासा मिळाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पत्राचार करणाऱया नेत्यांना हायकमांडने हिंग लावूनही विचारलेले नाही. जितीन प्रसाद, शशी थरूर व अखिलेश प्रसाद सिंग यांचा अपवाद वगळता इतर असंतुष्ट नेत्यांना काँगेसने ‘प्रचार करणार काय?’, अशी साधी विचारणाही केलेली नाही. काँगेसने जारी केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून 23 पैकी 20 चेहरे गायब आहेत. भुपिंदरसिंग हुड्डा, मनीष तिवारींसारखे नेते पक्षाकडून प्रचाराचे कधी आमंत्रण मिळते याकडे डोळे लावून बसले आहेत खरे, मात्र हायकमांडने 23 जणांचा पत्राचार गंभीरपणे घेतला आहे. ही कठोर भूमिका काँगेसला लाभदायक ठरेल की नाही ते यथावकाश कळेलच.

आपली प्रतिक्रिया द्या