लेख – ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे 

कायद्याने ग्राहकांना हक्क, अधिकार दिले आहेत. ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे. कारण, ग्राहक शक्ती अधिक न्याय शक्ती अधिक दंड शक्ती म्हणजेच शोषण मुक्ती हेच समीकरण आहे. न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी.  ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून, आपली कर्तव्ये लक्षात ठेवून बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणेही अपेक्षित आहे, जेणेकरून तो फसवणुकीतून वाचू शकेल. शासन–प्रशासनाने ग्राहक दिन साजरा करताना ग्राहक संघटनांशी योग्य समन्वय साधून कार्यक्रमाची आखणी करणे आवश्यक आहे.

सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे, जाहिरातीचाही आहे. जो तो आपला उत्पादित माल बाजारपेठेत कसा जास्त विक्री होईल या प्रयत्नात असतो. कस्टमर इज किंग (ग्राहक राजा आहे) किंवा कस्टमर इज गॉड (ग्राहक देव आहे) अशी विशेषणे ग्राहकाला लावली जातात आणि दुसरीकडे अनेक प्रलोभने दाखवून ग्राहकांना आपल्या मालाच्या, वस्तूंच्या खपासाठी आकर्षित केले जाते आणि जाळ्यात ओढले जाते आणि बऱयाचदा अशा प्रलोभनांना ग्राहक बळी पडतो. त्यातच त्याची फसवणूक केली जाते.

1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. तत्कालीन अध्यक्ष केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केल. जागतिक पातळीवर पाठपुरावा केला गेला. त्याला युनेस्कोकडून मान्यता मिळाली आणि तद्नंतर दरवर्षी 15 मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे.

आपल्या देशात 1986 मध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली. तेव्हापासून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुलै 2020 मध्ये लागू झाला. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास सहा प्रकारचे हक्क प्राप्त झाले आहेत. प्रत्येक ग्राहकास आपले हक्क माहीत असतील तर त्याची फसवणूक होणार नाही.

काय आहेत हे हक्क?

  • सुरक्षेचा हक्क ः एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकानी घेणे आवश्यक असते. जसे फ्रीज, टी.व्ही., वॉशिंग मशीन, मोटरबाईक, कार वगैरे कुठल्याही वस्तू.
  • माहितीचा हक्क ः आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल माहिती विव्रेत्याने ग्रहकांना देणे बंधनकारक आहे. त्यात फसवणूक करू नये.
  • निवड करण्याचा हक्क ः विक्रेता एकाच प्रकारचे उत्पादन, वा ब्रँडचा आग्रह करू शकत नाही. निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.
  • म्हणणं मांडण्याचा हक्क ः ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर आपले म्हणणे, योग्य न्यायासाठी मांडण्याचा हक्क आहे.
  • तक्रार करण्याचा, तसेच तिचे निवारणासाठीचा हक्क ः फसवणूक झाली असेल तर, न्यायासाठी तक्रार निवारण करून घेण्यासाठी ग्राहक मंच, राज्य ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क आहे.
  • ग्राहकांच्या हक्काविषयी शिक्षणाचा अधिकार हक्क ः ग्राहकांना हक्क, कर्तव्ये माहीत नसल्यामुळे बाजारपेठेत फसवणूक होते, ते समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था, शासनाकडून ‘जागो ग्राहक जागो’सारख्या उपक्रमाद्वारे प्रबोधन केले जाते.

ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर त्याला न्याय हा मिळतोच, पण आपल्या हक्कासोबतच काही कर्तव्ये आहेत याची जाणीवसुद्धा ग्राहकांनी ठेवायला हवी.

काय आहे ती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या?

  • बाजारपेठेत एका उत्पादनासाठी अनेक उत्पादक असतात. त्यात स्पर्धा ही असणारच. फसव्या जाहिरातीला ग्राहकाने बळी पडू नये.
  • बऱयाचदा धमाका सेल ऑनलाइन खरेदीवर असतात, सणावारालाही डिस्काऊंट सेल असतात, अशा वेळी न खपलेला किंवा काही दोष असलेला माल असू शकतो. सावधपणे खरेदी करावी.
  • खरेदी करताना मालाचे बिल घेणे आवश्यक आहे. बिलाचा आग्रह धरावा. न दिल्यास विव्रेत्याची तक्रार करावी. कारण माल दोषयुक्त असेल तर बिलाशिवाय आपण काहीच करू शकत नाही.
  • एम.आर.पी.(मॅक्झिमम रिटेल प्राईज)पेक्षा जास्त किंमत देऊ नका. खरेदी करताना ती बघा.
  • वस्तूंची मुदत तपासा. (एक्स्पायरी डेट) ती संपली असेल तर वस्तू नाकारावी. अशा वस्तूचा वापर हानिकारक ठरू शकतो.
  • पेट्रोल भरताना मीटरवर शून्याकडे लक्ष द्या. शुध्दतेविषयी शंका असल्यास पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांचेकडे तक्रार करा.
  • सोने खरेदी वेळी हॉलमार्ककडे लक्ष द्या.
  • ऑनलाइन खाद्य पदार्थ मागवताना योग्य काळजी घ्या. पदार्थ खराब आढळून आल्यास ताबडतोब तक्रार करावी.

ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा म्हणून जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंच कार्यरत आहेत. विनाशुल्क आपण तक्रार दाखल करू शकतो. राज्यपातळीवर राज्य ग्राहक परिषद आहे, तर पेंद्रात राष्ट्रीय परिषद आहे.

गावपातळीवर ग्राहकांसाठी ग्राहक सेवा संस्था, ग्राहक पंचायत, प्रवासी संघ कार्यान्वित आहेत. ग्राहकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्या कार्य करतात. प्रत्येक जिह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती आहे. या समितीत विविध विभागांतील सदस्यांची निवड केली जाते. शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य असतात.

ग्राहकांच्या वाढत्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने ‘जागो ग्राहक जागो’ अभियान सुरू केले आहे. बँका, सार्वजनिक वितरण, वीज, बांधकाम, अन्नौषध, पर्यटन, पोस्ट अशा विविध प्रकारच्या खात्याच्या तक्रारी या अभियानाच्या हेल्पलाइन (मदत सेवा प्रणाली) वर ग्राहक करू शकतो.

जागतिक ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक दिनाचे शासकीय पातळीवरून आयोजन केले जाते. त्यात औपचारिकता असते. काहीच ठिकाणचे अपवाद सोडले तर बहुतांशी उदासीनता असते. कार्यक्रमासंबंधित प्रसार, प्रचार व्हावा तो होत नाही. ठरावीकच लोकांना पत्रिका वाटून कार्यक्रम होतात. ज्यांना पत्रिका जातात ते कोणीही कार्यक्रमात नसतात ही सत्यता आहे. कार्यक्रमास ग्राहकांच्या उपस्थितीचा अभाव असतो. बऱ्याचदा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी, वेंडर, स्वस्त धान्य दुकानदार हेच उपस्थित असतात. दहापंधरा लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकून घेतला जातो. पह्टो काढले जातात. ज्या आत्मीयतेने आयोजन अपेक्षित आहे ते केले जात नाही.

वास्तविक अशा कार्यक्रमात, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी, गॅस एजन्सी, वजनमापांबाबत अधिकारी यांची उपस्थिती हवी. ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायदा समजावून सांगायला हवा, ते होत नाही. कार्यक्रमात ग्राहकांची उपस्थिती वाढण्यासाठी प्रयत्न होत नाही. सालाबादप्रमाणे कार्यक्रम साजरा करून, वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होते. यापलीकडे काही साध्य होत नाही. ते आपण दरवर्षी पाहतोच. शासनाने याबाबतीत योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे हे मात्र नक्कीच.

शेवटी एकच म्हणावे लागेल. कायद्याने ग्राहकांना हक्क, अधिकार दिले आहेत. ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे. कारण, ग्राहक शक्ती अधिक न्याय शक्ती अधिक दंड शक्ती म्हणजेच शोषण मुक्ती हेच समीकरण आहे. न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी.

ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून, आपली कर्तव्ये लक्षात ठेवून बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणेही अपेक्षित आहे, जेणे करून तो फसवणुकीतून वाचू शकेल. शासन-प्रशासनाने ग्राहक दिन साजरा करताना ग्राहक संघटनांशी योग्य समन्वय साधून कार्यक्रमाची आखणी करणे आवश्यक आहे.

[email protected]