लेख – कोरोनाविरोधात तंत्रज्ञानाची मदत

>> प्रसाद ताम्हणकर

कोरोना आपत्ती काळात सामान्य माणसाची तंत्रज्ञान विश्वात प्रामुख्याने ओळख झाली ती इंटरनेट, विविध मॅसेजिंग ऍप्स, व्हिडीओ कॉलिंग ऍप्स, ऑनलाइन मीटिंग्ज, शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजणारा ऑक्सिमीटर, शरीराची उष्णता तपासणाऱया थर्मोगन इत्यादींशी. इंटरनेटवर गुगलचा वापर प्रामुख्याने आजूबाजूला घडत असलेल्या विविध घडामोडींची माहिती घेणे आणि प्रामुख्याने ‘कोरोना’संदर्भात मिळेल तितकी माहिती घेणे यासाठी सामान्य लोकांनी केला. आधी कोरोना म्हणजे काय? तो कोणाला होतो? इथपासून झालेली सुरुवात कोरोनाची लक्षणे, त्यावरचे ऍलोपॅथी आणि होमिओपॅथींमधले उपचार, रोगप्रतिकारक काढा कसा करावा असे टप्पे पार करत गेला.

कोरोनाशी चालू असलेल्या लढाईत मानवाला पूर्ण विजय मिळालेला नाहीये आणि उद्या विजय मिळाल्यानंतरही फार खूश होऊ नका. कारण या कोरोनाच्याच तोडीचे काही व्हायरस भविष्यात पुन्हा तुमच्या आयुष्यात डोकावण्याची शक्यता असल्याचे जगभरातील रोगतज्ञ सांगत आहेत. एक मात्र खरे की, या कोरोनाच्या विषाणूने जगभरातील माणसांचे आयुष्यच लहान-मोठय़ा प्रमाणात बदलून टाकले. कोरोनाच्या हल्ल्याचा सामना करताना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रचंड मदत मानवाला झाली हे कबूल करावेच लागेल. तंत्रज्ञानापासून दूर असलेले किंवा नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास तयार नसलेले अनेक लोक कोरोनाच्या काळात तंत्रज्ञानमित्र बनले. सोशल डिस्टन्सिंग पाहून ते वर्क फ्रॉम होमपर्यंत अनेक नव्या नव्या गोष्टींची ओळख लोकांना पहिल्यांदाच झाली. नोकरी, व्यवसाय, शिक्षणासारखी कामे चक्क घरातूनच होऊ लागली. लॅपटॉप, गुगल, इंटरनेट, वर्क फ्रॉम होम, झूम, व्हिडीओ कॉलिंग, इंटरनेट अशा शब्दांची आणि प्रकारांची ओळखदेखील अनेकांना पहिल्यांदाच झाली. ‘‘थर्मामीटर कशाला लागतोय घरात?’’ विचारणाऱया अनेकांच्या घरात चक्क ऑक्सिमीटर, थर्मल गन दिसायला लागल्या. गमतीचा भाग म्हणजे कोरोनाच्या आपत्तीत अगदी दुर्गम गावखेडय़ापर्यंत पोहोचलेल्या तंत्रज्ञानाने अशी काही जादू केली आहे की, लवकरच होणाऱया महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी वाटलेल्या निवडणूक चिन्हांमध्ये चक्क लॅपटॉप, सीसीटीव्ही, पेनड्राईव्ह अशा तंत्रज्ञानाशी जोडलेल्या चिन्हांचादेखील समावेश आहे.

वर्क फ्रॉम होमला सरावाला लागलेल्या कर्मचाऱयांनी झूम, व्हॉट्सऍप अशा ऍप्सचा पुरेपूर वापर करून घेतला. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटणाऱया युवापिढीने नेटफ्लिक्स, अमॅझॉनसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस दाखवले आणि त्यांच्या कमाईत दुपटीने वाढ करून दिली, तर बच्चे कंपनीने विविध गेम्स डाऊनलोड करत गेम उत्पादक कंपन्यांची चांदी केली. मात्र लॉक डाऊनचा काळ संपता संपता बच्चे कंपनी इंटरनेटवरती एज्युकेशन फ्रॉम होमच्या चक्रात अडकली, तर युवापिढी ऑनलाइन अभ्यास, परीक्षा आणि निकालाच्या फेऱयात.

हे झाले 2020 ला सुरू झालेले चित्र, पण आता वर्तमान आणि भविष्यकाळासाठी देखील मानवजातीला तंत्रज्ञानावर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. संपूर्ण जगापुढे सध्या जी काही प्रमुख उद्दिष्टय़े असणार आहेत, ती म्हणजे –

  • छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱयांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत शक्यतो इंटरनेटच्या माध्यमातून अथवा कमीत कमी व्यक्ती संपर्क करत आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत कसे पोचवता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. यासाठी डिजिटल मार्केटिंग अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून उत्पादनाची जाहिरात आणि विक्री करणे या मार्गाचा मोठय़ा प्रमाणावरती अवलंब करावा लागेल.
  • छोटे व्यापारी, सिनेमागृहे, नाटय़मंदिर, उपहारगृहे इथेदेखील थर्मल गन, ई-पास बुकिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत गर्दीवरती नियंत्रण ठेवायला हवे.
  • शासनाने देखील स्वॅब टेस्टिंग, थर्मल चेकसारखे तंत्रज्ञान वापरत कोरोना रुग्णांची ओळख पटवण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे.
  • मुख्य म्हणजे तंत्रज्ञान कितीही मदत करणारे असले तरी या तंत्रज्ञानाच्या मदतीने खोटी अथवा चुकीची माहिती, अफवा पसरणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे.
  • आज गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठय़ा कंपनींनी आपल्या कर्मचाऱयांना पुढील वर्षभर घरातून काम करण्याची पूर्ण मुभा दिली आहे. कर्मचाऱयांना पसंत आल्यास त्यापेक्षा जास्ती काळदेखील घरातून काम करू शकणार आहेत अशीदेखील त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. आपल्याकडेदेखील या दृष्टीने काय प्रयत्न केले जाऊ शकतात याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
  • इंटरनेटच्याच मदतीने घेण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, येत्या काळात लोकांच्या जीवनशैलीत मोठय़ा प्रमाणावर बदल दिसणार असून लोकांचा जंक फूडपेक्षा पौष्टिक आहाराकडे कल वाढत जाणार आहे. त्यानुसारदेखील या दोन्ही क्षेत्रांतील उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची आखणी करणे निकडीचे आहे.
  • येणाऱया काळात मोठय़ा प्रमाणावर माणसांची जागा ही यंत्रे घेणार आहेत हे तर निश्चित आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेत त्याच्या बरोबरीने स्वतःला बदलणे गरजेचे असणार आहे. इंटरनेट, संगणक, मोबाईल या अत्यावश्यक वस्तू बनणार असून त्यांचा वापर न करता येणारा हा ‘अशिक्षित’ या वर्गात मोडला जाणार आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

    एकूण काय तर बदलत्या महाराष्ट्राने बदलत्या तंत्रज्ञानाच्या हातात हात घालत स्वतःला कसोटीच्या पातळीवर पूर्णपणे खरे उतरवायचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या