लेख – ठसा- सामूहिक गोसेवेचे अनुष्ठान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पी. एन. पाटील

हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाईला तर पवित्र मानले गेले आहेच, पण तिचे दूध आणि त्यापासून बनणारे इतर पदार्थ, गोमूत्र, शेण आदी सगळय़ाच गोष्टीही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र, औषधी आणि उपयुक्त मानल्या गेल्या आहेत. गोहत्या हे तर महापाप समजले गेले आहे. साहजिकच गाय म्हणजे गोमाता अशीच सश्रद्ध हिंदू धर्मीयांची धारणा आहे. त्याच भावनेतून अनेक गोप्रेमी वेगवेगळय़ा पद्धतीने गोसेवा करीत असतात.

जळगाव (खान्देश) येथील डॉ. विजय काबरा हे अशाच गोभक्तांपैकी एक. जळगाव शहर आणि जिल्हय़ात 2009 मध्ये त्यांनी ‘सामूहिक गोसेवा – एक अनुष्ठान’ या नावाने उपक्रम सुरू केला. त्या माध्यमातून शहर आणि जिल्हय़ातून हजारो जण गोसेवेच्या या उपक्रमाशी जोडले. डॉ. काबरा यांनी हा संकल्प सोडला आणि त्यांना लोकांनीही साथ दिली. जळगाव शहरातील ‘पांजरापोळ’ संस्थेची निवड डॉक्टरांनी या उपक्रमासाठी केली आणि लोकांना गोसेवेसाठी आवाहन केले. हिंदू धर्मातील सर्वच क्षेत्रातील, समाजातील स्त्री-पुरुषांनी, जातीभेदापलीकडे जाऊन या उपक्रमाला प्रतिसाद दिला. हिंदू धर्मात प्रामुख्याने उच्च समजल्या जाणाऱया वर्गात गोसेवेचे महत्त्व असेही अधोरेखित आहेच, पण त्या जोडीला इतरही वर्गातील, समाजातील मंडळी या गोसेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली.

गुरू नानक जयंतीच्या पर्वात शीख बांधवांनी गोसेवा केली तर मोहरम, रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम तसेच बोहरी समाजातील बांधवांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. मागील नाताळच्या काळात सेंट अलायन्स चर्चचे फादर जगदीश वळवी आणि इतर ख्रिश्चन बांधव-भगिनींनीदेखील गोसेवा केली. अशारितीने जळगाव शहर आणि जिल्हय़ातील सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांनी गोसेवा करण्याचा हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. त्याअर्थाने डॉ. विजयकुमार काबरा यांनी सुरू केलेली ही गोसेवा यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. एक सामाजिक अनुष्ठान म्हणून या माध्यमातून (ताजा) भाजीपाला, केळी, सरकी ढेप, चणाडाळ, गूळ देऊन गोसेवा केली जाते. गाईचे एकूणच महत्त्व लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने गोसंवर्धनासाठी विशेष पुढाकार घ्यावा, गाईच्या पालनपोषणासाठी शेतकरी बांधवांना विशेष अर्थसहाय्य दरवर्षी द्यावे आणि गोवंश संवर्धन तसेच गोवर, गोमूत्र यांच्याद्वारा सेंद्रिय शेतीस बळ द्यावे, अशी डॉ. विजयकुमार काबरा यांची अपेक्षा आहे.