विकेट – एक लहरी स्त्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

नवीन सुनेप्रमाणेच विकेट कशी वागेल हे कोणालाही कळत नाही. आजी खेळाडू, माजी खेळाडू, संघ व्यवस्थापक, समीक्षक, तज्ञ समालोचक व रातकिडे…कोणालाही नाही.

माझे विधान धाडसाचे आहे याची मला कल्पना आहे, पण खेद नाही. त्यामागे अनेक वर्षांचा अनुभव व अभ्यास आहे. चालू मालिकाच घ्या. लीडस्वर कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली व हिंदुस्थानी संघ अवघ्या 78 धावांत आटोपला. ही फलंदाजीला अनुकूल विकेट म्हणायची? याचाच अर्थ विकेट ‘वाचण्या’त कोहली सपशेल गंडला होता. आता ही ‘ओव्हल’ची विकेट ही इंग्लंडमधील फिरकीला सर्वाधिक धार्जिणी म्हणून वर्णिली जाते (म्हणून अश्विनला घेतले नाही?), पण पहिल्याच दिवशी तिच्यावर वेगवान गोलंदाजांनी तेरा विकेटस् घेतल्या. आता तरी यापुढे तिला फिरकीला धार्जिणी म्हणू नका.

तथाकथित तज्ञांच्या सामना चालू असतानाच्या विकेटस्वरील कॉमेंटस् मला बुचकळय़ात टाकतात. आपले फलंदाज ओव्हलवर ढेपाळत होते तेव्हा हे समालोचक सर्व खापर विकेटवर पह्डत होते (तेव्हा शास्त्री बहुधा गणपतीपुढे नारळ फोडला असावा). ‘वेगवान गोलंदाजीला अनुकूल’ असा विकेटवर शिक्का मारून ते मोकळे झाले. इंग्लिश फलंदाजी सुरू झाली त्याबरोबर विकेटमधला ‘राक्षस’ गायब झाला. इंग्लंडच्या तीन विकेटस् पडल्यावर काय तो ‘राक्षस’ खडबडून जागा झाला? थोडक्यात, फलंदाजी कशी होत्येय यावर हे विकेटची जात ठरविणार. उमेश यादवनं रूटची दांडी उडवून त्यांचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज माघारी पाठवला तर ते त्याचे श्रेय नाही, तर विकेटमधला ‘राक्षस’ एकाएकी जागा झाला म्हणून. या जागेपणाचा फायदा घेत बुमराहनेही दोन विकेटस् काढल्या वाटतं? यांच्या मर्जीनुसार विकेटला जाग येते किंवा झोपते. विकेट (किंवा समालोचक) म्हातारे झाल्याचे लक्षण.

सहा दिवस खेळूनही क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडियन संघाविरुद्धचा आपला वानखेडे स्टेडियमवरचा निर्णायक कसोटी सामना अनिर्णित राहिला. विकेट वेगवान बनवली आहे, असे वानखेडेंनी ‘मंत्रालय प्रेसरूम’मध्ये अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले. विकेट मद्रासच्या वरताण अशी खास फिरकी गोलंदाजांसाठी बनवलेली असणार याची खात्री वाटून संघ व्यवस्थापक अलेक्झांडर याने सामन्यापूर्वीच विकेटविषयी अधिकृत तक्रार नोंदविली होती. प्रत्यक्षात अनेकांना गळाला लावून झुलवत ठेवणाऱया छटेल पोरीप्रमाणे विकेटने सर्व तज्ञांना शेंडी लावली. सामन्यानंतर विकेट तयार करणारा पॉलीगर स्वतःवर खुश होऊन म्हणाला होता, ‘‘साला, विकेट काय हाय ते कोनालाबी समजला नाय.’’ त्या ‘कोनालाबी’मध्ये स्वतः पॉलीचाही समावेश होता. सहा दिवसांनंतरही सामना अनिर्णित राहिला. विकेटाय नमः

एक ज्येष्ठ समीक्षक मला म्हणाला होता, ‘‘पाहुणे मद्रासला येऊ देत, नाही बेटय़ांना गाढवासारखं लोळायला लावलं तर प्रसन्नाचं नाव बदलून पॅडमोर (वेस्ट इंडीजचा तत्कालीन सुमार ऑफस्पिनर!) ठेवू…’’

त्या समीक्षकाच्या उद्गारात असलेली गर्भित धमकी फारशी सुखावह नव्हती. गाढव चिखलात लोळतं हे एकदा लक्षात आलं की, मद्रासची विकेट कशी बनवण्यात येईल ते कळत होतं. ही धमकी निदान मला तरी ‘चुलीपाशी ये मेल्या, जळपं लाकूडच पाठीत घालते’ या बोडक्या म्हातारीच्या धमकीसारखीच नामर्दपणाची वाटते.

हे मी सेहेचाळीस वर्षांपूर्वी (‘मोहिनी’ मासिक, मे महिना, साल 1975) लिहिले होते. आता काळ बदललाय. तीन-तीन फिरकी गोलंदाज खेळवणारा आपला देश आज चार-चार वेगवान गोलंदाजांनिशी मैदानात उतरतोय, बंपर्सचा जवाब बंपर्सने देतोय, प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवतोय. आपला एवढा कायापालट झालाय की, जगातल्या सर्वश्रेष्ठ म्हटल्या जाणाऱया फिरकी गोलंदाजाचा विकेटवर आळ घेऊन संघात समावेश होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विकेट बोलू शकत नसल्यानं यामागे काही राजकारण, अहंभाव, आडमुठेपणा असल्यास कळायला मार्ग नाही. विकेट कशीही असली तरी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेला संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कुठला संघ वगळतो का? ‘‘विकेट फिरकीला अनुकूल नाही’’ असा खराखोटा दावा करत कधी ऑस्ट्रेलियानं शेन वॉर्नला, वेस्ट इंडीजनं लान्स गिब्जला, श्रीलंकेनं मुथय्या मुरलीधरनला आणि हिंदुस्थाननं कुंबळेला वगळल्याचं आठवतंय? मग एकटय़ा अश्विनवर ही संक्रांत का?

परवा अश्विन म्हणे ओव्हलवर नेटमध्ये फलंदाजीचा सराव करीत होता. इथपर्यंत ठीक आहे, पण तो म्हणे (जडेजासारखा?) डाव्या हाताने खेळत होता. हा काय प्रकार आहे? त्याला विचारले असता तो म्हणाला, ‘‘रोज काहीतरी शिकावं असा मला ध्यास असतो.’’

विकेटकडे बोट दाखवून आपल्याला संघाच्या बाहेर ठेवलं जातंय यापासून अश्विन काय शिकला असेल? विकेट कशीही असो, पण तिच्यावर खेळायचं की नाही हे विकेट नव्हे, तर कर्णधार व व्यवस्थापक ठरवतात हेच अश्विन शिकला असणार व प्रत्येक कसोटीच्या पहिल्या दिवशी तो हे नव्यानं शिकतोय.