ठसा – दामोदर तांडेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पंढरीनाथ तामोरे

मच्छीमारांवरील अन्यायाविरोधात सतत वेगवेगळय़ा माध्यमांतून लढा देणारे दामोदर जनार्दन तांडेल यांचे नुकतेच निधन झाले. पालघर जिह्याच्या किनारपट्टीवर माहीम महिकावती परिसरात निसर्गसौंदर्याने नटलेल्या केळवे गावात 27 जुलै 1948 रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यातील जिद्द आणि लढाऊ वृत्ती दिसून यायची. त्यांचे शालेय शिक्षण आदर्श विद्यामंदिर, केळवे येथे झाले. ते कबड्डीपटू व धावपटू होते. पुढे त्यांचे उच्च शिक्षण मुंबई येथील के. सी. कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजमधून झाल्यानंतर त्यांनी दोन वर्षे एल.एल.बी.चा अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केला. कफ परेड येथे राहत असताना त्यांना हिंदुस्थान लिव्हर कंपनीत नोकरी मिळाली आणि त्या कंपनीत त्यांची कामगार नेता म्हणून ओळख निर्माण झाली. पुढे ते ऑल इंडिया युनिलिव्हर एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष झाले. कामगार चळवळीत प्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत यांच्याबरोबर काम केले. कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ मच्छीमार समाजाच्या हितासाठी अर्पण केला. त्यांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती स्थापन करून त्या समितीच्या झेंडय़ाखाली मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न हाताळले. त्यांनी शेवटपर्यंत पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी शासनदरबारी, कोर्टदरबारी लढा सुरू ठेवला. मच्छीमारांचा सातबारा त्यांच्या नावे होण्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे व आंदोलने केली आणि त्यांच्या आंदोलनाची नोंद घेऊन सरकारने सर्व सागरी जिल्हाधिकाऱयांना मच्छीमारांच्या जमिनी व वहिवाटीच्या जमिनी नावावर करण्यासाठी मोजमापाचे आदेश दिले आहेत. अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या स्थापनेदरम्यान त्यांनी पांडुरंग विठ्ठल घिवलीकर व दिलीप नरहरी पागधरे यांच्याबरोबर मुंबई येथे सभा घेऊन सहकार्य केले होते. मच्छीमारांच्या डिझेल अनुदानाचा प्रश्न, वादळामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न, मच्छीमार बंदरे आणि जेटी, पर्ससीन नेट व एलईडी लाईटने अवैध मासेमारी करणाऱया ट्रॉलर्सविरुद्ध लढा हे मुद्दे त्यांनी सतत पेटते ठेवले होते. कोकण किनारपट्टीवरील गावामधील मच्छीमारांच्या वहिवाटीच्या जमिनी सातबारा उताऱयावर आणणे यासाठी त्यांनी अथक पाठपुरावा केला. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या झेंडय़ाखाली त्यांनी पत्रके, आंदोलने, मोर्चे, संबंधित मंत्री आणि सचिव यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या माध्यमांतून मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले. त्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख या काँग्रेस नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग महामंडळाचे 2002 साली उपाध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय मत्स्यजिवी सहकारी संघावर कार्यकारी संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. कबड्डीपटू व धावपटू असल्याने त्यांनी साई मित्रमंडळातर्फे प्रत्येक वर्षी कफ परेड येथे कला, क्रीडा स्पर्धा भरवून तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आणि बेरोजगार तरुणांना नोकरीधंदा मिळवून देण्याचेही काम केले. त्यांनी एका माहितीपटाची निर्मिती केली होती. काही माणसे आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तेव्हा समाजाचे काहीतरी देणे लागतो, समाजासाठी आपल्याला काहीतरी केले पाहिजे असे ठरवून आपल्या परीने कार्य करीत असतात. दामोदर तांडेल हे नेहमी पांढऱयाशुभ्र वेषात वावरत असत. हातात फाईल, डोळय़ांवर चष्मा आणि सतत मोबाईलवर कार्यमग्न अशी त्यांची ओळख होती. दामोदर तांडेल यांचे कार्य खऱया अर्थाने सुरू होत असताना नियतीने डाव साधला. त्यांच्या जाण्याने मच्छीमार आणि कामगारांची फार मोठी हानी झाली आहे.