ठसा – दत्ता भंडार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश उपदेव

विचारधारा, जिज्ञासा अकादमी आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्तपणे दिला जाणारा स्वातंत्र्यसेनानी डॉ. एस.टी. महाले स्म़ृती पुरस्कार यावेळी दत्ता भंडार यांना जाहीर झाला आहे. दत्ता भंडार लहानपणापासून राष्ट्र सेवा दलात सक्रिय आहेत. हलाखीची परस्थिती असतानाही इंजिनीयरपर्यंत शिक्षण घेऊन ते पुण्यात किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरीला लागले. त्याच वेळी राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय पातळीवर ते कार्य करीत होते व आजही कार्य सुरू आहे. शिक्षण, आरोग्य, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था संघटनांच्या मार्फत गेली 45 वर्षे सक्रीय आहेत. 1972च्या बालकुमार मेळावा, 1974च्या हडपसर मेळावा व 1991 चा सुवर्ण महोत्सव मेळावा या मेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा होता यात निधी संकलन व कार्यक्रम आखणीत भरीव योगदान दिले. याचबरोबर साने गुरुजी शिक्षण संस्था, आवाबेन नवरचना केंद्र व संस्था, आपले घर, समाजवादी महिला सभा, साधना प्रकाशन, हडपसर साहित्य व संस्कृती मंडळ, किर्लोस्कर फाऊंडेशनचे सल्लागार म्हणून कार्य अशा अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून योगदान. साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य पथदर्शी ठरलेले आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक विशेषांक, गौरव अंक, दिवाळी अंकांचे संपादन केले आहे. आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा मागास होतकरू विद्यार्थ्यांना 10 वीपर्यंत शिकताना संपूर्ण शैक्षणिक मदत केली जाते, 88 मुलामुलींची जबाबदारी त्यांनी व त्यांची लेक आणि जावई व सहकाऱयांनी घेतली आहे. त्याना संगणक शिक्षणही दिले जाते. अवघड विषयांचा स्वतंत्र अभ्यास घेतला जातो त्यासाठी प्रशस्त व आधुनिक सोयीसुविधा असलेले सभागृह हडपसरच्या बेकराई भागात बांधण्यात आले.

5 शाळा व 35 विद्यार्थ्यांना घेऊन 2009 साली सुरू झालेला हा प्रकल्प आज 8 शाळा व 88 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला. या प्रकल्पाचा खर्च भंडार-पटनाईक परिवारांकडून केला जातो. साधना सहकारी गृहरचना संस्थेच्या वतीने एक आदर्श प्रकल्प उभा केला, त्यामुळे सर्वसामान्य सेवा दल कार्यकर्त्यांना स्वतःचे घर मिळाले. भाजीपाला खरेदी विक्री सहकारी सोसायटी संचालक म्हणून भरीव काम करता आले. हे सर्व माझ्या सहकारी मित्र सेवा दलाचे कार्यकर्ते यांच्यामुळे करता आले असे दत्ता भंडार नम्रपणे सांगतात.