लेख – वेगवान प्रगतीचा निर्धार करूया

>> सुनील कुवरे

गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. त्यात महापूर, दुष्काळ, भूकंप, बॉम्बस्फोट मालिका, वादळे अशी अनेक मोठमोठी संकटे आली. त्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहिला. संकटसमयी महाराष्ट्र कधीही मागे हटला नाही आणि हटणार नाही. उलट कोणत्याही राज्यावर संकट आले तर महाराष्ट्र प्रथम धावून जातो. आतासुद्धा महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करेल. महाराष्ट्राला उज्ज्वल इतिहास आहे. तेव्हा वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करूया!

महाराष्ट्र हे नाव उच्चारताच आपल्या राज्याची महानता आपल्याला जाणवेल. नुसतं नाव उच्चारण्यापुरता नाही तर हे राज्य आपल्याला 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाले आहे. यात मोठा सहभाग कामगार आणि शेतकरी वर्गाचा होता. गेल्यावर्षी महाराष्ट्राला सहा दशकांचा कालावधी पूर्ण झाला. प्रत्येक वर्षी महाराष्ट्र दिनाचा शाही सोहळा वाजतगाजत साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे आपण महाराष्ट्राची षष्टय़ब्दी साजरी करू शकलो नाही, तर यंदाही कोरोनाचे सावट असल्याने आपण राज्याची एकसष्टीही साजरी करू शकलो नाही, याची निश्चितच खंत सर्वांना असणार.

महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी प्रत्येक वेळी महाराष्ट्र झळाळून उठला आहे. असे असले तरी विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करणेही आवश्यक आहे.छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आधुनिक काळात फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र ओळखला जातो. या महापुरुषांची सामाजिक सुधारणांची परंपरा हे महाराष्ट्राचे वेगळेपण आहे.

गेल्या 61 वर्षांत महाराष्ट्राने विकास केला. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी दूरदृष्टीच्या विकासाच्या योजना आखल्या. आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राने आपला ठसा उमटविला आहे. औद्योगिककरणात महाराष्ट्राने आपली आघाडी कायम राखली. पण आत्ताचे चित्र काय आहे? महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत. जे आहेत त्यातील काही प्रमुख उद्योग परप्रांतात गेले. उद्योजक महाराष्ट्रात येण्यास तयार नाहीत. कारण उद्योजकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात येणाऱया उद्योगधंद्यांना सवलती देत काही हजार कोटींचे करार करून दाखविले. विकासाच्या योजना आखल्या जात आहेत. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पुढेच राहील.

महाराष्ट्राने अनेक बाबतीत देशालाही नवी दिशा दाखविली आहे. पंचायत राज, रोजगार हमी योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीचा अधिकार, महिलांना पंचायतीमध्ये 50 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. अजूनही मोठी आव्हाने आहेत.

महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत प्रगती केली, तरी प्रगतीच्या अनेक वाटा खेडय़ांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, हे वास्तव नाकारता येत नाही. आज मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र या सर्वांमध्ये सामूहिक सद्भावना असेल असे स्वप्न होते, ते स्वप्न अधुरेच आहे. प. महाराष्ट्राचा विकास झाला. पण मराठवाडा, विदर्भाचा पाहिजे त्याप्रमाणात विकास झाला नाही. दुसरीकडे सरकारने शेतकऱयांसाठी अनेक पॅकेज दिली. अनेक वेळा कर्जमाफी दिली. तरी शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. धरणांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असूनही शेतकरी सुखी नाही. तेव्हा शेतकऱयाची मानसिकता बदलून त्याला चांगली शेती कशी करता येईल आणि नुकसान होणार नाही यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. महाविकास आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचारांबाबत ‘शक्ती’ कायदा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मुंबईसह राज्याच्या सर्व भागांत परप्रांतीयांनी हातपाय पसरले आहेत. ‘आवो जावो घर तुम्हारा’ या वृत्तीमुळे परप्रांतीय शिरजोर होऊन या महाराष्ट्रातच मराठी माणूस परका होत आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात मुंबई दिसते, पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही, हे वास्तव आहे. तसेच आज मराठी भाषेत व्यवहार व्हायला हवेत; पण ते होताना दिसत नाहीत याची खंत वाटते. एक विचार करण्यासारखी गोष्ट… दाक्षिणात्य राज्ये आपले स्वतःचे अस्तित्व जपताना दिसतात. आपणसुद्धा तसेच अस्तित्व जपले पाहिजे.

गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. त्यात महापूर, दुष्काळ, भूपंप, बॉम्बस्पह्ट मालिका, वादळे अशी अनेक मोठमोठी संकटे आली. त्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहिला. संकटसमयी महाराष्ट्र कधीही मागे हटला नाही आणि हटणार नाही. उलट कोणत्याही राज्यावर संकट आले तर महाराष्ट्र प्रथम धावून जातो. आतासुद्धा महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करेल. महाराष्ट्राला उज्ज्वल इतिहास आहे. तेव्हा वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करूया!

आपली प्रतिक्रिया द्या