युसूफ-ए-हिंदोस्ताँ

2119

>> शिरीष कणेकर

डिसेंबर महिन्याला माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका सात डिसेंबरला माझी आई जगातून गेली. एका अकरा डिसेंबरला दिलीप कुमार जगात आला.
अगदी सुरुवातीच्या काळातील दिलीप कुमारचा ‘ज्वारभाटा’ किंवा ‘घर की इज्जत’ पाहून घरी आलेली माझी आई म्हणाली होती, ‘‘नवीन पोरगा चित्रपटाचा हिरो आहे. अजून ‘रॉ’ आहे; पण बघाल तुम्ही, एक दिवस तो फार मोठा नट होईल.’’
तो फार मोठा नट झालेला मी बघितला, पण आपलं भाकीत खरं झालेलं बघायला माझी आई नव्हती.
दो दिन की मुहोब्बत में हमने
कुछ खोया है कुछ पाया है
कुछ हंसी में बदले है आँसू,
कुछ अपना दर्द छुपाए है
परवाच्या 11 डिसेंबरला सकाळीच मला एका वाचकाचा फोन आला.
‘‘मी टिळक बोलतोय.’’ तो म्हणाला.
‘‘बोला लोकमान्यजी.’’ मी माझ्या स्टॅण्डर्डनेही अत्यंत भिकारडा विनोद केला.
‘‘दरवर्षी 11 डिसेंबरला इसाक मुजावर न चुकता तुम्हाला फोन करायचे. आज मुजावर आपल्यात नाहीत. आजच्या दिवशी तुम्हाला त्यांची उणीव जाणवू नये म्हणून मी फोन केला.’’ टिळक हळुवारपणे म्हणाला. तो माझ्या भावना जपत होता आणि मी पोरकट, बुळबुळीत विनोद करीत होतो.
दिलीप कुमारचा 97वा वाढदिवस होता. काही वर्षांपूर्वी त्याला सूटबूट घालून हॉलमध्ये खुर्चीत आणून बसवायचे. शाहरुख, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी त्याच्या आसपास म्युझिकवर नाचायचे. अमिताभही असायचा. त्यांच्यात निर्विकार चेहऱयानं बसलेला दिलीप कुमार पहावयाचा नाही. दिलीप कुमारच्या अत्यंत बोलक्या चेहऱयावर भाव नाहीत? काय चाललंय हेच त्याला कळत नव्हतं. तो कोणाला ओळखत नव्हता. तो कोणाशी बोलत नव्हता. त्याच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन-समारंभातही तो पुतळय़ासारखा निर्विकार बसला होता. वैजयंतीमाला येऊन त्याच्याशी हस्तांदोलन करून गेली. त्यानं निर्जीव यांत्रिकपणे हात पुढे केला होता. ‘‘और शाम को मैं आही जाऊंगा’’ असं वैजयंतीमालाला लागटपणे म्हणणारा ‘नया दौर’मधला शंकर माझ्या डोळय़ांपुढे होता. ‘पैगाम’, ‘मधुमती’, ‘नया दौर’, ‘लीडर’, ‘संघर्ष’मधल्या या गाजलेल्या जोडीतल्या नायकाच्या डोळय़ांत साधी ओळखही नव्हती.
दिलीप कुमारच्या जुन्या नायिकांपैकी एक कामिनी कौशल हिला कोणीसं तिच्या व दिलीप कुमारच्या प्रेमाविषयी छेडलं तेव्हा ती म्हणाली होती, ‘‘कशाला जुन्या गोष्टी उकरून काढताय? ते किती थकलेत पहाताय ना? जगू द्या की, त्यांना शांतपणे.’’
अमिताभ बच्चन एका मुलाखतीदरम्यान मला म्हणाला होता, ‘‘माझ्या पिढीतल्या व माझ्या पुढल्या पिढीतल्या सर्व कलाकारांनी दिलीप कुमारचं काही न काही घेतलंय. कोणी म्हणत असेल की, त्यानं काहीही घेतलेलं नाही तर मी एवढंच म्हणेन की, तो धादांत खोटं बोलतोय.’’
ज्याच्या अभिनयावर अभिनेत्यांच्या काही पिढय़ा पोसल्या होत्या त्या दिलीप कुमारच्या चेहऱयावर ओळखीचे भाव नव्हते, ओळख पटल्याचा अभिनयही नव्हता.

काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर त्याच्या समाचाराला गेली होती. सायरा त्याला चमच्यानं पेज की काही भरवायचा प्रयत्न करीत होती. तो हट्टी मुलासारखा तिचा हात झिडकारत होता. लताला पाहून सायरा म्हणाली, ‘‘देखिये तो कौन आया है। आपकी बहेन. उनके हाथ से खायेंगे आप?’’
लतानं वाडगा होतात घेतला व चमचा त्याच्या समोर धरला. दिलीप कुमार मुकाटय़ानं जेवला. त्यानं वरकरणी ओळखल्यासारखं वाटत नव्हतं, पण कुठंतरी अंतरीची खूण पटली असावी म्हणून तर काहीही खळखळ न करता तो निमूटपणे जेवला.

लताकडून हा किस्सा ऐकताना मला भरून आलं. दिलीप कुमार व लता मंगेशकर या दोघांनी मला जिवंत ठेवण्यात खूप मोठा वाटा उचललाय. त्यांच्या पश्चात मला जगण्याचा अधिकारच नाही असं माझ्या मनानं घेतलंय, दिलीपकुमार आज असून नसल्यासारखा आहे. तोंडानं अन्न सेवन करणे मागेच थांबलं. तो हाडांचा सापळा झालाय, पण तो कसाही असला तरी आहे ही भावना आम्हाला पुरेशी आहे. त्यापासून आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते, ऑक्सिजन मिळतो. उगीचच वाटत राहतं की, तो आपल्या पायांवर पुन्हा उभा राहील व एखादा ‘देवदास’ किंवा एखादा ‘गंगा जमना’ करील. आमचं वय आणि आजार विसरून पुन्हा आम्ही उसळू, थिएटरवर वाऱ्या करू. आम्ही श्वास रोखून बसू व तो पडद्यावर गरजेल, ‘‘अरे, थूक देना उसके मुँहपे जो बातपे पलट जाय.’
ऋषी कपूरनं एक आठवण जागवल्येय. ‘प्रेम रोग’च्या शूटिंगच्या दरम्यान राज कपूर ऋषीला वारंवार सांगायचा, ‘‘मला तुझ्या डोळय़ात युसूफसारखे भाव हवेत. तो नायिकेकडे कसा बघतो ते आठव. तसा तू बघ.’’
आता युसूफच्या डोळय़ांत कसलेच भाव राहिले नाहीत. राज कपूरही जगात राहिला नाही. घशात वारंवार येणाऱ्या आवंढय़ांनीही मला जेरीला आणलंय. कशाकशाचं दुःख करण्यासाठीच देवानं मला जिवंत ठेवलंय का?
आज उद्याकडे मी वर जाईन आणि आईला भेटेन तेव्हा पहिली गोष्ट मी तिला सांगेन, ‘आई, तू बोलली होतीस ना एका पोरगेल्या हिरोविषयी. तो खरंच मोठा झाला. खूप मोठा गं!…’’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या