ठसा – डॉ. सतीश करंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) जागतिक हवामान बदल परिषद (कॉन्फरन्स ऑफ पार्टिज 27) शर्म इल शेख, इजिप्त येथे होत आहे. जगभरातील 192 देशांतील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. हवामान बदल या संकटाने जगभर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. जगभर स्वीकारलेले आणि प्रचंड ऊर्जा आवश्यक असणारे आणि नैसर्गिक संसाधनावर ताण निर्माण करणारे विकास प्रारूप हे हवामान बदल या संकटाची तीव्रता वाढवत आहे. याविषयी चर्चा या परिषदेत होणार आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जगभरातील धोरणकर्ते, राज्यकर्ते, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, संशोधक, पत्रकार, लेखक यांना निमंत्रित केले आहे. यासाठी शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांना लेखक मुक्त पत्रकार या गटातून निमंत्रित केले आहे.

करंडे यांचे हवामान बदल याविषयी 25 पेक्षा जास्त संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रकाशित झाले आहेत. जागतिक भात संशोधन संस्थेच्या सिंगापूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांनी संशोधन सादर केले आहे. आजपर्यंत पॅनडा, मलेशिया हैदराबाद धारवाड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादातही त्यांनी संशोधन सादर केले आहे. शिवाय मागील वर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि शेती संस्थेच्या दोन परिसंवादांसाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला आहे.

डॉ. सतीश करंडे यांची पर्यावरण शेती आणि हवामान बदल या विषयावर चर्चा करणारी लेखमाला दैनिकात प्रकाशित झाली होती. त्याला वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यापूर्वी त्यांनी अशाच विषयावर लिहिलेले लेखही प्रकाशित झाले आहेत. शेती आणि हवामान बदल अनुषंगाने त्यांनी लिहिलेल्या लेखमाला वाचक प्रिय ठरल्या. शेती आणि हवामान बदल याअनुषंगाने त्यांनी 200 पेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर दुष्काळ, शेती धोरण आणि ग्रामीण शिक्षण यावर चर्चा करणारी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हवामान बदल याचा शास्त्रीय अभ्यास आणि त्याविषयी सामान्य जनतेला समजेल अशा पद्धतीने मांडणी करून मराठीमधील प्रकाशित झालेले लिखाण यामुळे निवड झाली आहे, असे त्यांनी सांगितले. हवामान बदल आणि त्यामुळे येणाऱया नैसर्गिक आपत्ती याचा अनुभव जगभर येत आहे. मोसमी पावसावर अवलंबून शेती करण्यामध्ये हिंदुस्थानाचा पहिला क्रमांक आहे. जगातील एकूण शेतकऱयांपैकी 25 टक्के शेतकरी हिंदुस्थानात आहेत. त्यामुळे हवामान बदल या संकटाने सर्वात जास्त प्रभावित होणारे क्षेत्र हे शेती क्षेत्र आहे. त्यामुळे त्याविषयी धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि झीरो बजेट शेतीतून द्राक्ष, ऊस यांसारखी एकल पिके घेणार असू तर पुन्हा आपण तीच चूक करणार आहोत. त्यापेक्षा, शेतीच्या परिसंस्थेचा शाश्वत विकास हवा की एकल पिकांची बाजार ‘क्रांती’ हे ठरवावे. डॉ. सतीश करंडे सध्या एमकेसील नॉलेज फाऊंडेशनच्या संजीवक स्वावलंबी शेती प्रकल्पात मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. जिह्यातील दहा तालुक्यांतील 15 गावांतील 20 तरुण आणि महिला व पुरुष शेतकऱयांबरोबर त्यांचा प्रकल्प सुरू आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विवेक सावंत यांच्या कल्पनेतील आणि अशोक बंग यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित तो प्रकल्प आहे. हवामान बदल या संकटामध्ये शाश्वत आणि स्वावलंबी शेती करणे याविषयी मार्गदर्शन केले जाते. विवेक सावंत यांनी दिलेली कामे करण्याची संधी आणि वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन यामुळे हे शक्य होत आहे असे करंडे यांनी आवर्जून सांगितले.