दुधवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनंत सोनवणे

अरण्यातील मानवी अतिक्रमणं हिमालयातही सुरू आहेत. दुधवा व्याघ्र प्रकल्प हे त्याचेच उदाहरण…

नेपाळपासून जवळ, हिमालयीन टेकडय़ांच्या पायथ्याशी गवताळ मैदानी प्रदेशात दुधवाचं जंगल पसरलंय. गवताळ, दलदलीचा भूभाग, छोटे-मोठे तलाव, साल वृक्षांनी बहरलेलं अरण्य अशी दुधवाची रचना आहे. इथल्या जैवविविधतेमुळे 1965 साली या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. पुढे 1977 मध्ये अभयारण्याचं राष्ट्रीय उद्यानात रूपांतर झालं. परिसरातल्या ऊस शेती मालकांचा तीक्र विरोध डावलून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली. नंतर 1987 मध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यानाचा व्याघ्र प्रकल्पात समावेश झाला.

वाघ हा दुधवातला प्रमुख वन्यजीव. जुलै 1976 मध्ये ब्रिटनच्या प्राणी संग्रहालयातून आणलेल्या तारा नावाच्या वाघिणीचं दुधवाच्या जंगलात पुनर्वसन करण्यात आलं. वाघांची संख्या वाढवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. मात्र 1950 साली पाकिस्तानातून आलेले निर्वासित आणि परिसरातले साखर सम्राट यांच्यामुळे वाघ विरुद्ध माणूस असा लढा दुधवात सुरू झाला. शिवाय या जंगलातून रेल्वे मार्गही गेला आहे.

एकशिंगी गेंडय़ाचीही तीच कथा. इथं गेंडय़ांची बेसुमार शिकार झाली. 1978 मध्ये इथला शेवटचा गेंडा मारला गेला. मग आधी आसामहून तीन आणि नंतर नेपाळहून चार गेंडे आणून दुधवात सोडले गेले. त्यांचं पुनर्वसन यशस्वी झालं आणि दुधवात पुन्हा गेंडय़ांचा मुक्त वावर सुरू झाला. दुधवाच्या गवताळ प्रदेशात चितळ, सांबर, भेकर यांचे कळप चरताना दिसतात. बारशिंगा हा रुबाबदार तृणभक्षी प्राणीही इथं पाहायला मिळतो. त्यांच्या शिंगांना बारा फाटे फुटलेले असतात. मादीला शिंगं नसतात. उन्हाळय़ाच्या सुरुवातीला नराची शिंगं गळून पडतात आणि हिवाळय़ात पुन्हा फुटतात. इथं पाढा हरणं, नीलगाय, काळवीटही आहेत. दुधवात बिबळेही आहेत, मात्र त्यांचं दर्शन सहज होत नाही. याशिवाय इथं रानमांजर, रानडुक्कर, अस्वल, लांडगा इत्यादी वन्यजीव दर्शन देतात. काही नेपाळहून आलेले हत्ती दिसतात. दुर्मिळ दृढलोभी ससा इथं दिसल्याच्या नोंदी आहेत. 1984 पूर्वी इथं रानकुत्र्यांचाही वावर होता. दुधवाच्या समृद्ध जंगलात तीनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. त्यात अनेक दुर्मिळ तसेच स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश होतो. विविध प्रकारचे तित्तर, होले, घुबडं, गिधाडं, होले, सुतार, श्यागा, स्वर्गीय नर्तक, इत्यादी विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या किलबिलाटानं जंगल सदैव गजबजलेलं असतं.

इथल्या तलाव, नद्यांच्या काठांवर पाणपक्ष्यांची जत्रा भरते. या जत्रेत पाणकावळे, बगळे, विविध प्रकारचे करकोचे, शेराटी, बलाक, वारकरी, इत्यादी प्रकारची बदकं यांचा समावेश होतो. हिवाळय़ात अनेक परदेशी पाहुणे या जत्रेत सहभागी होतात. आशिया, युरोप, आफ्रिकेतून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी पाणवठे गजबजून जातात. पांढरे करकोचे, थापटय़ा, क्रौंच, चकवाक, मालगुजा, पट्टकादंब, कृष्णकादंब, इत्यादी पाहुण्यांच्या आगमनाने जंगलाला नवचैतन्य मिळतं.

दुधवानं जतन केलेल्या दुर्मिळ पक्ष्यांमधला प्रमुख पक्षी म्हणजे बंगाली तणमोर. गवताळ प्रदेशातल्या पक्ष्याची संख्या जगात खूपच कमी उरली आहे. विणीच्या हंगामात मादीला आकर्षून घेण्यासाठी तो अत्यंत लक्षवेधी हालचाल करतो. गुलाबी बदक हा अतिदुर्मिळ पक्षी पूर्वी दुधवात दिसायचा. मात्र त्याच्या आकर्षक रंगरूपामुळे त्याची अनिर्बंध शिकार झाली. 1956 नंतर हे गुलाबी बदक हिंदुस्थानातून नामशेष झालं. आता तर ते जगातूनही नामशेष झालं असं म्हटलं जातं. थोडक्यात निसर्गाला ओरबाडणाऱया मानवी हव्यासापोटी दुधवानं खूप काही गमावलंय. मात्र खूप काही जतनही करून ठेवलंय. हे वैभव जपायला हवं. चारही बाजूंनी अतिक्रमणाच्या सापळय़ात अडकलेल्या दुधवा जंगलाला मोकळा श्वास घेता यायला हवा.

दुधवा व्याघ्र प्रकल्प
प्रमुख आकर्षण – वाघ
जिल्हा- लखीमपूर खेरी व बाहरिच
राज्य – उत्तर प्रदेश
क्षेत्रफळ – 1284.30 चौ.कि.मी.
निर्मिती – 1987
जवळचे रेल्वे स्थानक – दुधवा (4 कि.मी.)
जवळचा विमानतळ – लखनौ (191 कि.मी.)
निवास व्यवस्था -वन विभागाचं विश्रामगृह
योग्य हंगाम – फेब्रुवारी ते एप्रिल
सुट्टीचा काळ – 15 जून ते 15 नोव्हेंबर
साप्ताहिक सुट्टीचा दिवस – नाही

[email protected]