
>> सदाशिव पाटील
आपल्या पाल्याची कुवत न ओळखता पालक केवळ सुरात सूर मिसळून किंवा खोटय़ा प्रतिष्ठेपायी परभाषीय माध्यमाची निवड करतो. मुळातच ओढूनताणून अशा परिस्थितीतून गेलेला विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत तग धरत नाही. असे विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांच्या मानाने मागेच राहतात. त्यांना इच्छित क्षेत्र मिळत नाही. नैराश्य येते. अशा विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पुढील पिढय़ांचे अतोनात नुकसान होते. शिक्षणाने केवळ बोलके पोपट तयार करायचे की सुरेख भावनिक अभिव्यक्ती व्यक्त करणारे संवेदनशील, जबाबदार नागरिक तयार करायचे यावर योग्य विचार व कृती व्हावी.
ज्या देशाने शिक्षणाचे सर्वांगीण महत्त्व विषद करणारे विचारवंत विश्वाला दिले त्या देशातील म्हणजेच आपल्या हिंदुस्थानातील आजची शिक्षण क्षेत्राची अवस्था पाहिल्यावर मन अस्वस्थ होते. शिक्षणाचे उद्दिष्ट अर्थप्राप्तीच्या पलीकडे नाहीच हा भ्रम निर्माण झाला आहे. आज महाराष्ट्रात महानगरांपासून छोटय़ा छोटय़ा गाव- शहर पातळीवरही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल वाढतो आहे. ठरावीक शिक्षणानंतर संपूर्ण पिढीच परदेशात जाते की काय किंवा सगळय़ाच देशांतील सुशिक्षितांना आपल्याकडे बोलावते की काय असे वाटायला लागले आहे. पण मग सगळे लोकांचेच अनुकरण करून आपण त्यांना आकर्षित कसे करणार? स्वतःचे स्थान भक्कम केल्याशिवाय आपण इतरांना कसे सावरणार? स्वातंत्र्याचा खरा अर्थ आम्हाला कधी कळेल? खरं तर इंग्रजांना हवे होते तसे ‘स्थानिक इंग्रज’ त्यांनी तयार केलेच, परंतु आता स्वातंत्र्योत्तर काळात काही अपवाद वगळता स्वदेशाचे मीठ खाऊन विदेशाची चाकरी करण्याची विचारधारा अधिक बोकाळलीय.
इंग्रजी ही जागतिक भाषा आहे की इंग्रजांनी राज्य केलेल्या काही देशांत वापरली जाते, हाही विचार होणे आवश्यक आहे. मातृभूमी आपल्याला आसरा, सुरक्षा देते तर मातृभाषा योग्य संस्कार करते. म्हणूनच किमान प्राथमिक व माध्यमिक स्तरावर तरी शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतच असायला हवे हे कित्येक शिक्षणतज्ञांचे मत आहेच. इंग्रजी चांगली येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षणे, स्पोकन इंग्लिशसारखे कोर्सेस शाळाशाळांमध्ये राबविले जातात. गेल्या काही वर्षांत इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकविले जाते. त्यामुळे इच्छितांची इंग्रजी भाषा चांगलीच होणार आहे. परंतु त्यासाठी शिक्षणाचे माध्यमच बदलावे हे योग्य वाटत नाही. सगळय़ांनीच अशा अनुकरणाचा अतिरेक करावा हे अयोग्य आहे. इंग्रजी माध्यमात शिकले म्हणजे कुणी भाषापंडित होत नाही किंवा मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण घेतले म्हणजे त्यास इंग्रजी येणारच नाही असेही नाही. अलीकडे शिक्षण विभाग तसेच सुजाण नागरिक व शिक्षणतज्ञांच्या प्रयत्नांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांना चांगलेच प्रोत्साहन मिळत आहे. ‘सेमी इंग्रजी माध्यम’ हा सुवर्णमध्य बहुसंख्य मराठी शाळांमध्ये उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन झाले पाहिजे. कारण शिक्षण क्षेत्राची सखोल वस्तुस्थिती शिक्षकच अधिक जाणतो. जिज्ञासा वृत्ती, अभ्यासू, ज्ञानलालसा याबाबत जागरूक असलेला शिक्षकच विद्यार्थी व समाजाचा अपेक्षित विकास घडवून आणू शकेल हा विश्वास आहे.
जी भाषा आपण प्रथम शिकतो ती प्रथम भाषा म्हणजेच मातृभाषा. यानंतर जी कुठली भाषा शिकतो ती द्वितीयच असते. भाषेमुळेच आपण स्वतःला सिद्ध करतो. म्हणूनच आपण बोलायला शिकतो तेव्हा संस्कृती आणि संस्कारांचे धडे अनौपचारिकरीत्या घरातूनच मिळतात. वाचन, लेखन, संभाषण ही कौशल्ये मेंदूच्या क्षमतेनुसार कमीअधिक असू शकतात. मातृभाषेवर चांगले प्रभुत्व असणाऱ्या व्यक्ती इतर भाषाही चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतात. इंग्रजी माध्यमातून शिकूनही अर्जही नीट लिहिता न येणारे नमुने पाहिले की, बिकट परिस्थितीची जाणीव होते. सुमार शैक्षणिक, वैचारिक, आर्थिक पातळी असणारा पालकवर्ग आज मोठय़ा प्रमाणात उच्चभ्रू वर्गाचे अनुकरण करत आहे. आपल्या पाल्याची कुवत न ओळखता पालक केवळ सुरात सूर मिसळून किंवा खोटय़ा प्रतिष्ठsपायी परभाषीय माध्यमाची निवड करतो. मुळातच ओढूनताणून अशा परिस्थितीतून गेलेला विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत तग धरत नाही. असे विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांच्या मानाने मागेच राहतात. त्यांना इच्छित क्षेत्र मिळत नाही. नैराश्य येते. अशा विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पुढील पिढय़ांचे अतोनात नुकसान होते. इंजिनीअर्स, डॉक्टर्स, कायदेतज्ञ, संशोधक, प्रोफेसर याबरोबरच आज राष्ट्राला कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, चांगला माणूस यांचीही तितकीच गरज आहे. शिक्षणाने केवळ बोलके पोपट तयार करायचे की सुरेख भावनिक अभिव्यक्ती व्यक्त करणारे संवेदनशील, जबाबदार नागरिक तयार करायचे यावर योग्य विचार व कृती व्हावी.
> मातृभाषेतूनच संकल्पनांचा उत्तम विकास होतो.
> उसने अवसान फार काळ साथ देत नाही. अंधानुकरण टाळावे.
> केवळ भाषिक अडचणीमुळे विज्ञानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयातील मूलभूत संकल्पनांपासून विद्यार्थी अनभिज्ञ राहतो. नुसत्या पाठांतराचा दीर्घकाळ व्यावहारिक उपयोग होत नाही.
> वेळ, परिश्रम आणि वित्त प्रचंड खर्ची पडूनही चुकीच्या माध्यमामुळे इच्छित प्रगती होत नाही. आपल्या बौद्धिक, आर्थिक व इतर सर्व बाबींचा विचार करूनच पाल्याचे माध्यम निवडावे.
> इतर विविध कलागुणांमध्ये पारंगत असूनही करीअर होत नाही. अनेक (गुणवत्तेचे) पैलू अपुरेच राहतात. कारण शैक्षणिक प्रगती आवश्यक आहे.
> योग्य माध्यम न निवडल्यास पुरेसा आत्मविश्वास वृद्धिंगत न झाल्यामुळे अनेक संधींपासून वंचित राहावे लागते.
> उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी, क्षमता, अनुकूलता असणाऱयांबरोबर उगीच फरफटत जाऊ नका.
> आपल्या सामर्थ्यांचे व मर्यादांचे भान असू द्या. पाल्यालाही ते लक्षात येऊ द्या. तरच अडचणींवर मात करण्याची क्षमता तो निर्माण करेल.
म्हणूनच शिक्षणाचे योग्य माध्यम निवडायला हवे.




























































