गाथेच्या शोधात – स्त्री सामर्थ्याचे चिरंतन प्रतीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विशाल फुटाणे ([email protected])

भारतीय प्रतीकवादात अतिरिक्त अवयव हे अनेकदा अतिरिक्त शक्तीचे प्रतीक मानले जातात. अनेक हातांची दुर्गा, अनेक मुखांचा ब्रह्मा किंवा त्रिनेत्रधारी शिव याप्रमाणेच मीनाक्षीचा तिसरा स्तन हे प्रतीक तिच्या असामान्य दैवी शक्तीचा तात्त्विक आशय उलगडते.

तामीळनाडूच्या सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया मदुराई शहरातील मीनाक्षी अम्मन मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर दक्षिण भारतीय इतिहास, पुराणपरंपरा, साहित्य, शिल्पकला आणि लोकस्मृती यांचे एक अद्वितीय केंद्र आहे. या मंदिरातील हजारो शिल्पांपैकी एक शिल्प विशेषत अभ्यासकांचे लक्ष वेधून घेते, ते म्हणजे तीन स्तन असलेल्या राजकन्या मीनाक्षीचे शिल्प. आधुनिक काळातील व्यक्तीला हे शिल्प प्रथमदर्शनी विचित्र किंवा काल्पनिक वाटू शकते, परंतु तामीळ साहित्य, स्थानिक देवीपरंपरा आणि भारतीय प्रतीकवादाचा सखोल अभ्यास केला असता या कथेमागील गहन सांस्कृतिक आणि तात्त्विक आशय उलगडू लागतो.

मीनाक्षीची कथा दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय धार्मिक आख्यायिकांपैकी एक आहे. तिचे सर्वाधिक विस्तृत वर्णन ‘तिरुविलैयाडल पुराणम्’ या ग्रंथात आढळते. सोळाव्या शतकातील परंजोती मुनिवर यांनी रचलेल्या या ग्रंथात मदुराईशीसंबंधित भगवान शिवाच्या चौसष्ट दैवी लीलांचे वर्णन आहे. या ग्रंथानुसार पांडय़ राजा मलयध्वज आणि त्याची पत्नी कांचनामलाई यांना अनेक वर्षे अपत्यप्राप्ती होत नव्हती. राज्य, संपत्ती, वैभव आणि सत्ता असूनही त्यांना वारस नव्हता. अखेरीस त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी महान यज्ञ आयोजित केला. यज्ञ संपन्न होत असताना यज्ञकुंडातून एक कन्या प्रकट झाली. ही कन्या सामान्य मानवी जन्मातून आलेली नव्हती. ती अयोनिज होती.

या अद्भुत कन्येचे आणखी एक वैशिष्टय़ होते. तिला दोन नव्हे तर तीन स्तन होते. राजदरबारात आश्चर्य आणि चिंता निर्माण झाली. त्याच वेळी आकाशवाणी झाली. त्या दिव्य वाणीत सांगण्यात आले की, या कन्येला पुत्राप्रमाणे वाढवावे. तिच्या भविष्यकाळातील पतीचे दर्शन होताच तिचा तिसरा स्तन आपोआप अदृश्य होईल. या कन्येला तडादगै असे नाव देण्यात आले. पुढे तीच मीनाक्षी म्हणून दक्षिण भारतात प्रसिद्ध झाली. ही कथा केवळ एका ग्रंथापुरती मर्यादित नाही. परंजोती मुनिवरांच्या आधी तेराव्या शतकात रचलेल्या ‘तिरुवालवायुदैयार तिरुविलैयाडल’ या ग्रंथातही मीनाक्षीचा उल्लेख आढळतो. यावरून मीनाक्षीची परंपरा अनेक शतकांपासून तामीळ समाजात जिवंत होती, हे स्पष्ट होते.

मीनाक्षीला राजपुत्रासारखे शिक्षण देण्यात आले. तिने युद्धकला, घोडेस्वारी, हत्तीस्वारी, रणनीती आणि प्रशासन यांचे शिक्षण घेतले. ती एक कुशल सेनापती आणि राज्यकर्ती बनली. पुढे तिने अनेक प्रदेश जिंकत दिग्विजय केला. दिग्विजय करत ती कैलासापर्यंत पोहोचली. तेथे तिची भेट भगवान शिवांशी झाली. शिवांचे दर्शन होताच तिचा तिसरा स्तन अदृश्य झाला. त्यानंतर शिव आणि मीनाक्षी यांचा विवाह झाला. मदुराईमध्ये आजही साजरा होणारा मीनाक्षी-तिरुकल्याणम् उत्सव या विवाहाची स्मृती जपतो. मात्र मीनाक्षीच्या कथेला केवळ चमत्कार म्हणून पाहणे योग्य नाही. तिच्या तिसऱया स्तनाचा अर्थ काय होता, हा प्रश्न इतिहासकार, तत्त्वज्ञ आणि सांस्कृतिक अभ्यासकांना सतत आकर्षित करत आला आहे. भारतीय संस्कृतीत स्तन हे केवळ स्त्राrसौंदर्याचे प्रतीक मानले गेलेले नाही. ते मातृत्व, पोषण, वात्सल्य आणि जीवनसंवर्धनाचे प्रतीक आहेत. त्यामुळे मीनाक्षीचा तिसरा स्तन हा अतिरिक्त मातृशक्ती, अतिरिक्त पोषणक्षमता आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक म्हणूनही समजला जाऊ शकतो.

दक्षिण भारतात अनेक ग्रामदेवता, युद्धदेवता आणि मातृदेवतांची पूजा प्राचीन काळापासून केली जात होती. मीनाक्षीची कथा ही अशाच सांस्कृतिक समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता’ हा देवीमाहात्म्यातील प्रसिद्ध श्लोक स्त्राrच्या मातृस्वरूपाला सर्वोच्च स्थान देतो. भारतीय शिल्पकलेत मातृदेवतांच्या मूर्तींमध्ये उन्नत उरोज वारंवार दिसून येतात. लज्जागौरी, सप्तमातृका, यक्षिणी आणि विविध ग्रामदेवतांच्या शिल्पांमध्ये स्तनांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. कारण ते प्रजनन, संतती, समृद्धी आणि जीवनसंवर्धनाचे दृश्य प्रतीक आहेत.

मदुराईच्या मंदिरातील मीनाक्षीचे शिल्प म्हणजे हजारो वर्षांच्या सांस्कृतिक स्मृतीचे, मातृत्वाच्या गौरवाचे आणि स्त्राrशक्तीच्या दैवी कल्पनेचे दर्शन. म्हणूनच मीनाक्षी ही भारतीय संस्कृतीतील स्त्राrच्या सामर्थ्याचे एक प्रतीक आहे.

(लेखक पुरातत्व संशोधक आहेत.)