लेख – दोन ऐतिहासिक उड्डाणे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘किती मौज दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अधांतरी’ अशी एक जुनी विमान वर्णनाची कविता आहे. त्या काळात उडतं विमान पाहावं हा सुद्धा रोमांचकारी अनुभव असायचा. मोटारी, आगगाडी, टेलिफोन, तारायंत्र, विजेचे दिवे या साऱया गोष्टी त्या त्या काळात विस्मयकारी ठरल्या होत्या. त्यामुळे जगातल्या पहिल्या विमानोड्डाणाचे अप्रूप खूपच होतं.

‘पॉवर्ड फ्लाइट’ किंवा यांत्रिक शक्तीवर चालणारे विमान उडवून अवकाशमार्ग सर्व जगासाठी खुला केला तो ऑर्विल आणि किवर या राइट बंधूंनी. तारीख होती 17 डिसेंबर 1903. अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरगेलिन राज्यात ही विस्मयकारी घटना पाहायला अनेक लोक उपस्थित होते आणि फिल्म हाताने फिरविण्याचा (हॅण्ड क्रॅन्क) कॅमेरा या ऐतिहासिक घटनेचं चित्रिकरण करत होता. त्यादिवशी सकाळी साडेदहा वाजता राइट बंधू आपलं विमान घेऊन सज्ज झाले. ‘फ्लायर’ नावाचं विमान त्यांनी स्वतः बनवलं होतं. 40 फूट लांबीच्या या विमानाचे पंख 21 फुटांचे होते. त्याच्या उड्डाणासाठी या बंधूंनी एक धावपट्टीही तयार केली. या 60 फूट ‘रन वे’चं नाव त्यांनी ठेवलं होतं. ‘जंक्शन’ रेलरोड.’ सुरुवातीला ऑर्विलने विमान उडवलं ते 12 सेकंद हवेत तरंगलं. त्यानंतरची दोन उड्डाणं आणखी थोडी ‘उंच गेली शेवटी दुपारी बाराच्या सुमारास विक्टरने चौथ्या उड्डाणात विमान 800 फुटांवर नेलं आणि 52 सेकंद हवेत तरंगलं. या साऱयाचं चित्रीकरण झालं. ‘फ्लायर’ने इतिहास घडवला. आता पृथ्वीवरचं आकाश माणसाच्या आवाक्यात आलं होतं. राइट बंधूंचे हे ‘फ्लायर’ अमेरिकेत वॉशिंग्टन येथे असलेल्या स्मिथसॉलिअन संस्थेच्या ‘एअर ऍण्ड स्पेस म्युझियममध्ये ठेवण्यात आलं आहे. ते आतापर्यंत जगातल्या लाखो लोकांनी पहिलंय. 2018 मध्ये सुमारे 62 लाख पर्यटकांनी राइट बंधूंच्या कर्तृत्वाचं दर्शन घेतलं.

शिक्षणात फारशी गती नसलेल्या राइट बंधूंना बालपणापासूनच यंत्रनिर्मितीचं आकर्षण होतं. सायकलच्या दुकानात काम करताना स्वतःची अशी वैशिष्टय़पूर्ण सायकल बनवली होती. परंतु त्यांच्या मनात इंजिनाच्या शक्तीवर विमान उडवण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यांची ती इच्छा 1903 मध्ये पूर्ण झाली. जगातलं पहिलं विमान आता माणसाचा प्रवास वेगवान आणि कमी वेळेचा ठरण्याची ती नांदी होती.

राइट बंधूंच्या पूर्वीही बलून किंवा प्रचंड फुगा तरंगत ठेवून त्याला जोडलेल्या ‘टोपली’मध्ये बसून विहंगम दृश्य न्याहळण्याचे प्रयत्न झाले होते. शिंगणे आणि आचार्य यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या 1889 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात बलूनचं वर्णन आहे. ज्यावर्षी हिंदुस्थानात रेल्वे सुरू झाली. त्याच वर्षी म्हणजे 1853 मध्ये कॅट नावाच्या माणसाने विमान (बलून) उडवून मुंबईकरांना थक्क केलं होतं आणि 1873-74 च्या सुमारास ‘असेच एक विमान (हायड्रोजनचा बलून) ‘परळास लालबागेत उडविण्यात आले व बरेच उंच गेले’ असा उल्लेख आहे. पुढे 1895 मध्ये शिवकर बापूजी तळपदे यांची मुंबईच्या चौपाटीवर ‘मरूत्सखा’ नावाचे ‘विमान’ उडविण्याची बातमी तत्कालीन वृत्तपत्रात आली होती, परंतु हे ‘विमान’ यंत्रशक्तीवर चालणारी नव्हते. शिवाय त्यात माणूसही नव्हता. ते कर्तृत्व राइट बंधूंचे.

यंत्रयुगाने वेग घेतल्यावर ‘अधांतरी’ फिरणाऱया विमानांनी पृथ्वीवरचे अवघे आकाश व्यापले आणि 1957 मध्ये माणसाची नजर विराट अवकाशाकडे गेली. युरी गागारिन स्पेसमध्ये जाणारा पहिला माणूस ठरला. त्यानंतर 1969 मध्ये माणूस थेट चंद्रावर दाखल झाला. चांद्र विजयानंतर संशोधकांनी मंगळ ग्रहाचा अभ्यास करायला सुरू करून तिथे अनेक यानं उतरवली. पाथ फाइंडर ते गेल्या 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरलेल्या पर्सिव्हरन्स ऊर्फ ‘पर्सी’ने तर कमाल केली. त्यावर स्वार झालेले ‘इन्जेन्युइटी’ (चातुर्य) नावाचे अवघ्या 2 किलो वजनाचे हेलिकॉप्टर मंगळावर उड्डाण करायला सज्ज झाले. आतापर्यंत काही यानांनी मंगळपृष्ठावर रपेट केली होती पण परग्रहावर स्वतंत्रपणे उड्डाण करणारे ‘इन्जेन्युइटी’ हे पहिलेच हेलिकॉप्टर ठरले. दुसऱया ग्रहावरचे दुरस्य संचालनाद्वारे घडविलेले हे पहिलेच उड्डाण असल्याने त्याला ऐतिहासिक यशाचा सन्मान लाभला. ते 10 फूट उंच व 39 सेकंद उडले.

राइट बंधूंच्या फ्लाइटचं 274 किलो वजन होतं. ते त्यांनी स्वतः स्वार होऊन उडवलं. त्यानंतर 117 वर्षांनी (19 एप्रिल 2021) माणसाने पुन्हा एक ऐतिहासिक उड्डाण रिमोट कंट्रोलद्वारा दुसऱया ग्रहावर घडवून आणलं! 1903 मध्ये फ्लायर उडालं तेव्हा ‘उडणारे यंत्र’ ‘मशीन दॅट फ्लाइज’ असे मथळे वृत्तपत्रांनी दिले. त्यानतंरच्या सवा शतकात माणसाने आकाश ते अवकाश या प्रवासात अनेक विक्रम केले. परंतु ‘फ्लायर’सारखं ऐतिहासिक महत्त्व ‘इन्जेन्युइटी’ला लाभलं. पुढच्या काळात माणसाची भरारी वाढतच जाणार. ‘फ्लायर’ ते इन्जेन्युइटी ही प्रगती विलक्षण आहे.