लेख – निरपेक्ष दान हेच खरं श्रेष्ठदान!

604

>> स्वाती सूर्यकांत बाजारे

जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट मानवावर सर्वशक्तिनिशी चाल करून येतात तेव्हा ती आपल्याबरोबर घेऊन येतात. असंख्य वेदना आणि असहाय्य जीवन. त्यातूनच मग जन्म घेतात अनेक कहाण्या. वेदनांच्या, दुःखाच्या, असहाय्यतेच्या, भलाईच्या, बुराईच्या, दातृत्वाच्या, प्रेमाच्या, त्यागाच्या, जिद्दीच्या, जीवनातील कटू सत्याच्या. त्यातील प्रत्येक कहानीचा एक इतिहास होतो. आणि तो माणसाला बरंच काही शिकवून जातो. संकटं येतात तशी जातातही, पण चिरंतन वेदनांच्या दुखऱ्या जखमा मागे ठेवून जातात.

त्याचप्रमाणे संकटसमयी माणसानं दाखवलेली माणुसकी, मदतीचे हात आणि वेदनांवर मारलेली फुंकर हे मात्र माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही. माणुसकीचा हळूवार हात आणि वेदनावरची फुंकर माणसाला जगण्याचे बळ देतात. संकटातून पुन्हा उठून उभं राहण्याची प्रेरणा देतात. आपण या निसर्गापुढे लाचार आहोत, दुबळे आहोत, जीवन किती क्षणभंगूर आहे. संकटात सत्ता आणि संपत्ती दोन्हीही माणसाला तारत नाही तर माणूस आणि माणुसकीच शेवटी एकमेकांसाठी धावून येते या जीवनातील वास्तवाची जाणीव माणसाला आयुष्यात अनाहूतपणे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्येच होते.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिह्यांमध्ये अलीकडेच आलेल्या महापुरानं अशा अनेक कहाण्यांना आकार दिलाय, जन्म दिलाय. अशीच एक कहाणी अनोख्या दातृत्वाची, निःस्वार्थी, निरपेक्ष भावनेने, मातेच्या ममतेनं केलेल्या मदतीची. यंदा पश्चिम महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असा पाऊस पडला. महापुरानं थैमान घातलं. गावंच्या गावं पाण्याखाली गेली. माणसं रस्त्यावर आली. माणसांचे संसार उघड्यावर आले. घरात होतं नव्हतं तेवढं सगळं कपडालत्ता, पैसाअडका, वर्षभरासाठी साठवलेलं धान्य असा आयुष्यभर काडी काडीने जमवलेला संसार पाण्याखाली गेला आणि माणसाच्या डोळ्यांत टचकन पाणी उभं राहिलं. सर्वसामान्य माणसाची पार वाताहात झाली.

या महापुराचा फटका सर्वसामान्य जनतेबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालक आणि क्लिनर यांनाही बसला. वाठार (रेठरे) तसेच कोल्हापूर याठिकाणी महापुराचे पाणी अक्षरक्षः रस्त्यावरून वाहू लागले होते. त्यामुळे प्रशासनाने नाइलाजाने राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला बंद केला. त्यामुळे सर्व ट्रक, टँकर, कंटेनर अशी सर्व वाहने रस्त्यावर जागच्या जागी उभी राहिली स्थानबद्ध केल्यासारखी. निसर्गानंच जणू त्यांना स्थानबद्ध केलं होतं.

सुरुवातीला सर्वांनाच वाटलं, एक-दोन दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. पण दोन-तीन दिवस उलटून गेले तरी रस्ता काही वाहतुकीला खुला झाला नाही. हायवेवर वाठारपासून ते थेट शिरवळपर्यंत जवळ जवळ दहा हजार वाहने उभी होती. रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांपुढे अन्नपाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला. काहींनी स्वतःजवळ असणारी शिधासामग्री बाहेर काढली आणि स्वतः भात शिजवून खाल्ला, पण पुन्हा तोही संपला. काहींजवळ तर यापैकी काहीच नव्हते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, पण माणसातल्या माणुसकीला या वाहनचालकांची समस्या न सांगताही लक्षात आली. खरंच वेळ माणसाला सर्व काही शिकवते तसंच इथंही झालं. या अडकून पडलेल्या वाहनचालक, क्लिनर यांच्या मदतीला माणुसकी धावली. हायवेच्या जवळपास असणाऱ्या गावांमधून मदतीचा ओघ सुरू झाला. काही स्वयंसेवी संघटना, तरुण मंडळे पुढे आली. ते या वाहनचालकांना पाण्याच्या बाटल्या, नाश्ता, चहापाणी पुरवू लागले. काही लोक वैयक्तिकरीत्या तिथं येऊन या लोकांना नाश्ता, चहापाणी पुरवत होते. काही लोक, तरुण मंडळे, स्वयंसेवी संघटना जेवण घेऊन येत होते आणि त्यांना खाऊ घालत होते. सद्भावनेनं आणि स्वयंस्फूर्तीनं ही माणसे मदत करत होती. अगदी भारावल्यासारखी. यात महिलांचीसुद्धा मदत फार मोठी होती. काही महिलांनी घरी स्वतः स्वयंपाक बनवून हस्ते परहस्ते पोचवला. रस्त्यावरच जेवणावळी पडू लागल्या. या साऱ्यात खाकी वर्दीतील माणुसकी मागे कशी राहील? त्यांनीसुद्धा याठिकाणी वाढण्याचे काम स्वतः हिरीरीने आणि आनंदाने केले. अशीच आणखी एक कहाणी अनोख्या दातृत्वाची. एक शिवशाही बस इंदोली फाटय़ानजीक येऊन थांबली. गाडी मध्येच थांबलेली पाहून बसमधील प्रवाशांमध्ये चुळबूळ सुरू झाली. कारण तिथे उतरणारे कुणीच नव्हते, चढणारेही कुणीच नव्हते आणि बसलाही काही प्रॉब्लेम नव्हता. मग बस का थांबली? प्रवाशांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले. सर्वांचे लक्ष आता बसचालकाकडे लागले होते. तो काय करतोय, काय सांगतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती, पण तो बोलला काहीच नाही. मात्र तो शांतपणे गाडीतून उतरला. गाडीत असणारं गाठोडं खाली घेतलं. ते सोडलं आणि त्यातील भाकरी आणि पिठलं तो रस्त्यावर अडकून पडलेल्या वाहनचालक, क्लिनर यांना एक एक करून देऊ लागला. पिठलं -भाकरी पाहून वाहनचालक- क्लिनर आणि त्यांच्याबरोबर असणारे इतर कामगार अशा सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून आले. तीन – चार दिवसांच्या भुकेपुढे वेळेला मिळालेली पिठलं-भाकरी अमृततुल्य वाटू लागली. ते आनंदानं पिठलं भाकरीचा आस्वाद घेऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा अनामिक आनंद दिसत होता. अनाहूतपणे मिळालेल्या या प्रेमळ भेटीपुढे आज आकाशही खुजं झालं होतं. पिठलं-भाकरीच्या जेवणापुढं आज पाची पक्वान्नंही फिकी पडली होती. पण ही रसद या उपाशी ताह्या पामरांना पुरवली कोणी? बसमधील सर्वच प्रवाशांची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. तेवढय़ात वाटपाचं काम संपवून शिवशाही बसचालक बसमध्ये बसला. आणि मग त्यांनं जे सांगितलं ते ऐकून साऱयांनाच माणुसकीचा गहिवर दाटून आला. ही शिवशाही बस सातारच्या बसस्थानकावर आली तेव्हा एका आजींनी मोठय़ा सद्भावनेनं या बसचालकाकडे ती शिदोरी दिली आणि सांगितलं, ‘आरं माझ्या लेकरा, रस्त्यावर तीन-चार दिवस झालं गाड्या, माणसं अडकून पडल्याती. त्यांना तीन-चार दिवस काय खायालाबी मिळाल्यालं नाय आसं मी ऐकलंय. एवढं चार घास दे त्यांना.’ आणि एक ती वृद्ध व्यक्ती कोणताही गाजावाजा न करता निरहंकार, निरपेक्षवृत्तीने आपल्या हातातील हे पवित्र असं दान देऊन तिथून केव्हाच निघून गेली होती. एक असं दान जे देणाऱ्याला माहीत नाही कुणाला दिलं आणि घेणाऱ्याला माहीत नाही कुणी दिलं. म्हणतात ना, ‘उजव्या हातानं दिलेलं डाव्या हाताला कळू नये तेच खरं श्रेष्ठदान.

(उपशिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा, मसूर (मुली), ता. कराड)

आपली प्रतिक्रिया द्या