लेख – बहुआयामी भारुडरत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अशोक हांडे  

लोकप्रिय भारुडकार निरंजन भाकरे गेले कित्येक महिने कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सक्रिय सामील झाले होते. आपल्या भारुडाच्याच माध्यमातून लोकांना कळकळीचं आवाहन करीत होते त्याच कोरोनाने त्यांचा घास घ्यावा ही तर नियतीने केलेली क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल. दुःख आवरता आवरत नाही. भाकरे आता स्वर्गात जातील, देवांनाही बुरगुंडा (बुरगुंडा म्हणजे ज्ञान) देतील आणि हा कोरोना संपविण्यासाठी कार्यरत राहतील असंच वाटतं.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये 2004 साली खास लोककलावंतांचा एक कार्यक्रम होता. त्यात राजा मयेकर काही सादर करणार होते. त्यांनी आयोजकांना सुचवलं होतं की, तुम्ही या कार्यक्रमाला अशोक हांडे यांना पाहुणे म्हणून आवर्जून बोलवा. त्यानुसार आयोजकांच्या आत्यंतिक आग्रहामुळे आणि राजाभाऊंच्या प्रेमाखातर मी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमामध्ये अचानक ‘सुया घ्या…. बिबं घ्या, होय माय’ असा आवाज आल़ा माझे डोळे चमकले आणि बुरगुंडा सुरू झाला. मी मात्र माझ्या बालपणीच्या आठवणीत रमलो होतो.

आता गडकरीच्या रंगमंचावर प्रत्यक्ष माझं बालपण अवतरलं होतं. बुरगुंडाची तीच चाल. तोच मृदंगाचा ठेका, तीच टाळ वाजवण्याची पद्धत आणि तेच अनादी नवल झाले म्हणून प्रत्येक वेळी वेगवेगळय़ा विषयाची सुरुवात आणि हास्याचा प्रचंड कल्लोळ झाला की त्यातूनच बुरगुंडाचा ठोका सुरू होईल. आहा।़।़हा…

सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंगमंचावरील हा गावठी दिसणारा कलाकार बिनीचा होता यात शंकाच नाही. विशेष म्हणजे त्याची बुरगुंडा पदासाठीची चाल अगदी बरहुकूम आमच्यासारखीच होती. राजा मयेकर सूत्रधार होते. त्यामुळे आधी सर्व लक्ष त्यांच्याकडे होतं. पण हळूहळू सगळा माहौल या बाईने जिंकला होता. खरं म्हणजे बाईच्या वेशात तो पुरुषच होता. मध्यांतर झाले, मी वेगाने ग्रीन रूममध्ये घुसलो आणि त्याला मिठी मारली तो बहुआयामी कलाकार म्हणजे भारुडरत्न निरंजन भाकऱे

निरंजन भाकरे म्हणजे संभाजीनगरजवळील सिल्लोडजवळच्या एका छोटय़ाशा खेडय़ात राहणारे गरीब कुटुंब. तिथलेच स्थानिक कलाकार घेऊन हे भारुड करण्यासाठी गावोगाव फिरत आणि आपली गुजराण करीत. अतिशय विनम्र स्वभाव. समोरच्या व्यक्तीबद्दल ऋजुभाव आणि ‘तान’ पेक्षा ‘कानसेन’ जास्त. वाचनाची आवड असणारा. नवी नवी भारुडं रचणारा हा कलंदर कलावंत सादरीकरण तर इतकं झकास करी की संपूर्ण रंगमंच एकटा व्यापून टाकी. त्यानंतर मी ‘मराठी बाणा’ कार्यक्रम करायचं ठरवलं. मराठी लोकसंस्कृतीची श्रीमंती व्यावसायिक रंगभूमीवर सादर करून तिला खरा न्याय द्यायचा ही तळमळ आणि एकमेव उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवून मी ‘मराठी बाणा’चा घाट घातला आणि मला पहिली आठवण झाली निरंजन भाकरेंची. इकडं ‘मराठी बाणा’च्या ताळय़ा सुरू झाल्या. पण भाकरेंचा संपर्क होईना. शेवटी आमचे संभाजीनगरचे नाटय़ व्यवस्थापक संदीप सोनार यांना कामाला लावले आणि भाकरे सापडले. फोनवर त्यांनी पहिलाच प्रश्न केला, ‘माझं गाडीभाडं कोण देणार’ मला हसू आलं, अहो, म्हटलं तुम्ही कसलीच काळजी करू नका.

तर अशा रीतीने संभाजीनगरच्या एस.टी.तून भल्या पहाटे निरंजन भाकरे चौरंग ऑफिसमध्ये दाखल झाले. सकाळी आल्या आल्या चहा, मग नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी तालीम व रात्री ऑफिसमध्ये राहायची सोय, खूश झाले. ‘मराठी बाणा’मधील लोकसंस्कृती पाहून ते लोककलाकार म्हणून मनोमन सुखावत होते. ‘दादा, काय तुम्ही म्हणजे मोठे अवघड काम आहे, कसा काय पसारा सांभाळता या शंभर-सव्वाशे कलाकारांचा. अहो, आम्हाला एक मृदंगवाला आणि दोन-चार टाळकरी सांभाळता सांभाळता धन्य होते अन् एवढं करून याचा खर्च भागेल का? नाही चालला कार्यक्रम तर नुकसान किती होईल’ असे त्यांचे भाबडे प्रश्न असत.

‘मराठी बाणा’चा पहिला प्रयोग 1 नोव्हेंबर 2005 रोजी सकाळी 6 वाजता दीनानाथ नाटय़मंदिर, पार्ले येथे सादर होणार होता. आम्ही 22 ऑक्टोबरपासून छत्तीसगडमध्ये ‘आजादी 50’चे शो करीत होतो. आम्ही 31 ऑक्टोबरला मुंबईत दाखल होणाऱ आधी तालमी झाल्या होत्या. पण प्रयोगाआधी सात-आठ दिवस तालमी नव्हत्या. भाकरे धास्तावले होते. दादा, एकदा तरी तालीम करा भाकरेंचे आर्जव होत़ं तर मी मात्र ‘‘शक्य नाही डायरेक्ट शो कऱू आता प्रसंगच तसा आलाय, तुम्ही घाबरू नका, तुम्ही हाडाचे कलाकार आहात’’असा त्यांना फोनवर धीर देत होतो.

आणि कमाल झाल़ा सुया घ्या, बिबं घ्या, पोत घ्या म्हणत भाकरेंची इन्ट्री झाली आणि तिथेच टाळय़ा पडल्या. पुढचे जवळजवळ अर्धा तास ‘दीनानाथ’मध्ये हास्याचे फवारे फुटत होते.  आमचा बुरगुंडा हा ‘मराठी बाणा’चा खास आकर्षण बिंदू होता. दरवेळी त्यात वेगवेगळे तत्कालीन विनोद तयार करून त्यात पेरीत होतो. कोणी कोणी राजकीय पुढारी येत, त्यांच्यावरही तिथेच कॉमेंट करीत अस़ू तेही सगळं खिलाडू वृत्तीनं घेत. राखी सावंतपासून आसाराम बापू. कुठलाही विषय वर्ज्य नसे. बुरगुंडा दरवेळी निराळा असतो म्हणून पुन्हा पुन्हा ‘मराठी बाणा’ बघणारे प्रेक्षक हजारो आहेत. सर्वात गंमत झाली अमेरिका दौऱयावर. आमचा अमेरिका दौरा ठरला. त्यावेळी भाकरे खूपच आनंदी आणि उत्साही झाले होते. अमेरिकेच्या दौऱयावर मला फक्त बुरगुंडाचीच धास्ती होती. कारण इथे महाराष्ट्रात सगळे राजकीय, सामाजिक संदर्भ लोकांना कळतील पण तिकडे सातासमुद्रापलीकडे हा सगळा प्रकार लोकांना पटेल का ,आवडेल का अशी धास्ती होती. जुले 2011 रोजी शिकागोच्या मॅकरमॅन सेंटरच्या ऍरीक्रॉन थिएटरमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे मराठी अधिवेशनात संपूर्ण अमेरिका, कॅनडा व लंडनसारख्या ठिकाणांहून जमलेल्या 5000 मराठी व बिगर मराठीदेखील प्रेक्षकांसमोर ‘मराठी बाणा’चा प्रयोग सुरू झाला.

ज्याची धास्ती होती तो क्षण अखेर आला. सुया घे, बिबं घे, पोत घे म्हणत भाकरेंची इन्ट्री झाली आणि त्या एवढय़ा भव्य नाटय़गृहाचे वातावरण इलेक्ट्रीफाईड झालं. त्यापुढचा अर्धा तास बुरगुंडाचं गारुड त्या तिथल्या सातासमुद्रापलीकडच्या मराठी माणसांवर झालं. बॅकस्टेजला डोक्यावर पोतडी, हातात काठी आणि कमरेवर बाहुला या वेशातील भाकरेंबरोबर फोटो काढण्याची अहमिका लागली होती. त्यात ऍरीकॉन थिएटरचे सर्व अमेरिकन कर्मचारी आणि बरेचसे गोरे अमेरिकन सामील झाले होते. भाकरेंचा संकोच त्यांच्या चेहऱयावर दिसत होता. पण हा भाषेच्या पलीकडे जाऊन झालेला गौरव हाच त्यांचा पुरस्कार होता. बरं एवढं होऊन त्याचं माय इदं न मयं ‘‘दादा, हे सगळं तुमच्यामुळे झालं. माझ्या जीवनात अशोकजी परांजपे आल़े त्यांनी मला संभाजीनगरहून मुंबईला आणलं आणि अशोक हांडेंनी मला पार सातासमुद्रापार नेलं. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही दादा- अहो भाकरे, खरं म्हणजे तुम्ही ही सगळी लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्रावर उपकार करताच़ तुम्ही खूप मोठे आहात आणि म्हणूनच विनम्र सेवा करून घेतली आणि मग चौरंगच्या सगळय़ा कलाकारांचा बांध फुटला.

(लेखक ‘चौरंग’ संस्थेचे संस्थापक,‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.)

[email protected]