लेख – ‘फोर डे वीक’ हिंदुस्थानात शक्य होईल का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश कोळी

कोरोना महामारीच्या काळात लोकांनी ‘वर्क फ्रॉम होम’पासून कामाच्या तासांमध्ये केलेल्या बदलांपर्यंत अनेक नवनवीन अनुभव घेतले. या पार्श्वभूमीवर जगातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मोठी कंपनी मानल्या जाणाऱया पॅनासोनिकने घेतलेला ‘फोर डे वीक’ म्हणजे ‘चार दिवसांचा आठवडा’ हा निर्णय इतर कंपन्यांसाठी आणि इतर देशांसाठीही एक आदर्श निर्णय ठरू शकतो. सरकारच्या स्तरावर विचार केल्यास प्रमुख फायदा असा आहे की, कार्बन उत्सर्जन कमी होईल. रहदारी कमी झाल्यास पर्यावरण सुधारेल.

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जपानची दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱया पॅनासोनिक कंपनीने या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून चार दिवसांचा आठवडा, म्हणजेच आठवडय़ातून चार दिवस काम करण्याचा पर्याय आपल्या कर्मचाऱयांसमोर ठेवला आहे. ‘फोर वार्ंकग डेज’ किंवा ‘फोर डे वीक’ नावाने आठवडय़ातील चार दिवस काम करण्याचा हा निर्णय ओळखला जात आहे. जगातील अनेक कंपन्या आणि देश या निर्णयाकडे एक पर्यायी व्यवस्था म्हणून गंभीरपणे पाहत आहेत. जपानमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात जीव तोडून काम करण्याची संस्कृती रुजलेली आहे. अंग मोडून तेथील लोक काम करतात. एवढेच नव्हे तर अतिकामाने विशिष्ट आजारसुद्धा तेथील अनेक लोकांना जडला आहे. जपानमधील बहुतांश कर्मचारी कामाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. ‘वर्क लाइफ बॅलन्स’ हे त्यांच्या दृष्टीने जणू सेलिब्रेशनच असते. तसे पाहायला गेल्यास हिंदुस्थान आणि चीनमधील स्थिती याहून फारशी वेगळी नाही, परंतु जपानमधील अवस्था तर सरकारी सर्वेक्षणावरूनच दिसून येते. 2020 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, देशभरात केवळ आठ टक्के कंपन्याच अशा आहेत, ज्या आठवडय़ातून दोन दिवस पक्क्या सुट्टय़ा देतात. अशा पार्श्वभूमीवर पॅनासोनिकसारख्या मोठय़ा कंपनीचा तसेच जपानच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या शियानोगी कंपनीचा आठवडय़ातून चारच दिवस कर्मचाऱयांना कामावर बोलावण्याचा निर्णय क्रांतिकारीच वाटत आहे.

आयर्लंडमध्ये तर सरकारनेच अधिकृतपणे ‘फोर डे वीक’चा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी हा निर्णय तेथील काही कंपन्या लागू करून पाहतील. या निर्णयाचा परिणाम काय होतो याचा अंदाज घेतला जाईल. जर फायदा होत असल्याचे दिसून आले तर कदाचित हा निर्णय संपूर्ण देशभर लागू केला जाईल. सुरुवातीला काम सहा दिवसांत विभागण्याचे नियोजन आहे. नंतर तेच काम पाच दिवसांत आणि नंतर चार दिवसांत विभागले जाणार आहे असे सांगितले जाते. लोकांना काम आणि खासगी जीवनात संतुलन राखताना भयानक अडचणी येत आहेत हे जेव्हा सरकारने पाहिले, तेव्हा जून 2020 मध्ये ‘फोर डे वीक’ हा एक पर्याय असल्याचे सरकारने कंपन्यांना सांगितले. आपापल्या यंत्रणा तपासा, कर्मचाऱयांशी बोला आणि जमत असेल तर हा निर्णय राबवण्याचे ठरवा, असा सल्ला सरकारने कंपन्यांना दिला. काही कंपन्यांनी हे धोरण लागू केले तर बऱयाच कंपन्यांनी ते लागू केले नाही.

अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी, आयर्लंड आणि ब्रिटन अशा देशांमध्ये काही कंपन्यांत ही व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे. आयर्लंडमध्ये तर सरकारनेच सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल वर माहिती दिली आहेच. बेल्जियममधील नेत्यांनी या महिन्यापासून ‘फोर डे वीक’ लागू करण्याचे संकेत दिले आहेत. स्पेन आणि स्कॉटलंडच्या सरकारांनीही प्रायोगिक तत्त्वावर हे करून पाहण्यासाठी मानसिक तयारी केली आहे. दक्षिण कोरियात मार्च महिन्यात निवडणुका होणार आहेत आणि राष्ट्रपतीपदाचे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार ली जे म्यूंग यांनी अशी घोषणा केली आहे की, सत्तेवर येताच कामाचे तास कमी करण्यात येतील. आईसलँडमध्ये काही सर्वेक्षणे करण्यात आली. कामाचे काही तास कमी केल्यामुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात असे तेथे दिसून आले आहे. कंपनी आणि कर्मचारी यांच्यात ताळमेळ असेल तरच हे शक्य आहे, हे उघड आहे. हिंदुस्थानात नवीन लेबर अधिनियमांवर आता मंथन होत आहे. तसे पाहायला गेल्यास हा अधिनियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होणे अपेक्षित होते, परंतु कोरोना महामारी आणि काही राज्यांची तयारी नसल्यामुळे तसेच पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने हे शक्य झाले नाही.

‘फोर डे वीक’ निर्णयाचे समर्थन करणाऱयांचे म्हणणे असे आहे की, जर आपल्याकडे तीन दिवस रिकामे असतील तर आपल्याला पुरेसा आराम मिळू शकेल. कुटुंबाला आपण वेळ देऊ शकू आणि स्वतःच्या प्रगतीच्या दिशेनेही काही काम करू शकू. जेव्हा लोकांना कार्यालयात कमीत कमी दिवस बोलावले जाईल तेव्हा या निर्णयामुळे अधिक लोकांना रोजगार देता येऊ शकेल. कंपनीचा पैसा वाचू शकेल आणि उत्पादकतेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकेल. सरकारच्या स्तरावर विचार केल्यास प्रमुख फायदा असा आहे की, कार्बन उत्सर्जन कमी होईल. रहदारी कमी झाल्यास पर्यावरण सुधारेल. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि कामाच्या दिवसांत झालेले बदल यामुळे जगभरात नोकरीचे दिवस आणि तास यांच्या नवनवीन मॉडेलवर विचारविनिमय सुरू झाला आहे. प्रश्न असा की, हे सगळे हिंदुस्थानात घडेल का?