आभाळमाया : अंतराळ शेती

>> वैश्विक, khagoldilip@gmail.com

अंतराळातील माणसाच्या सुखस्वास्थाचे सर्वांगीण विचार सुरू झाले आहेत. कारण नजीकच्या भविष्यकाळात माणूस चंद्र-मंगळावर जाऊन येईल किंवा काही काळ तेथे राहील, अशी स्वप्नं दाखवली जात आहेत. इलॉन मस्कसारखे त्यात आघाडीवर आहेत. अंतराळानुभव घेण्यासाठी उत्सुकांची संख्याही काही कमी नाही आणि दिवसेंदिवस ती वाढतच जाणार. हिंदुस्थानचं चांद्रयान-2 चंद्रावर जाण्याच्या तयारीत असताना अतिप्रगत देशांमध्ये मंगळाचे वेध लागलेले दिसतात.

मात्र अंतराळात जायचं, राहायचं तर माणसाची प्रमुख गरज आहे ती सुरक्षित प्रवास-निवास आणि सुग्रास जेवण. पृथ्वीवर जन्मलेल्या आणि इथेच आयुष्य काढलेल्या माणसाला पारंपरिक जेवणच रूचणार. गरज म्हणून काही काळ जीवनसत्त्व आणि प्रथिनांच्या गोळय़ांवर दिवस काढले तरी बराच काळ अंतराळात राहण्याची वेळ आली तर तिथेच काही फळं, फुलं आणि धान्य पिकवता येईल का, यावर संशोधन सुरू आहे. वर्ष-दोन वर्षांपासूनच असे प्रयत्न होत असून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर चिनी प्रजातीचा कोबी पिकवण्यात अंतराळयात्रींना यश आलंय. त्यातला काही अंतराळवीरांच्या आहारासाठी आणि थोडा पृथ्वीवर आणून संशोधनासाठी वापरण्याचा विचार योग्यच.

पानकोबीचं पीक थेट अंतराळात घेण्याचं ठरलं ते बऱ्याच विचारमंथनानंतर. या कोबीमध्ये पोषक अन्नघटक असणं अत्यंत गरजेचं होतं. टोकियो बेकाना पद्धतीचा कोबी या सगळय़ात उजवा ठरला आणि तो पोषक तसंच चविष्ट असल्याचं अंतराळयात्रींचं मत झालं.

अंतराळप्रवासात, अंतराळयात्रींमध्ये जे काही शारीरिक बदल घडतात त्यात हाडांवर होणारा परिणाम तर असतोच, पण जिभेवरच्या चवीची केंद्रेसुद्धा बिघडू शकतात. ‘टेस्ट बड्’ मंदावल्याने तोंडाला चव नाही अशी आजारी माणसासारखी अवस्था होऊ शकते. अधिकाधिक तिखट सॉस खावंसं वाटू लागतं तर काहीजणांना मधाची चव बरी वाटते. याचं एक कारण असं असावं की, शून्य गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वजनरहित अवस्थेत असताना पृथ्वीवर जसा शरीरातला द्रव पायाकडे अधिक खेचला जातो (गुरुत्वाकर्षणामुळे) तसं न घडता द्रव सर्व शरीरभर समानतेने पसरतात. चिनी कोबी अंतराळातच पिकवून त्याची टेस्ट चांगली लागत असेल तर उत्तमच, अन्यथा विशिष्ट अन्नपदार्थांची पॅकेटस् आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर बराच काळ राहणाऱ्या अंतराळयात्रींना पुरवण्यात येतात.

अंतराळात भाजी लावण्यामागचा आणखी एक उद्देsश असा की, सजीवच असलेल्या या वनस्पती आपल्या उक्रांतीपासून रूजलेल्या पृथ्वीच्या वातावरणापेक्षा अगदी वेगळय़ा वातावरणात कशी तग धरतात त्याचं  निरीक्षण करणे, पुन्हा प्रत्येक वनस्पतीसाठी पृथ्वीवरही वेगवेगळं हवामान, वातावरण लागतं. अंतराळातल्या एकसुरी वातावरणात नेमक्या कोणत्या वनस्पतींची लागवड करता येईल याविषयी अशा प्रयोगांच्या निष्कर्षातून निश्चित काही हाती लागेल. पुढच्या अधिक महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी भोजनव्यवस्थेबरोबरच चवदार जेवणाची सोय करणंही जरूरीचं ठरणार आहे. कारण भरमसाट पैसा खर्च करून अंतराळ पर्यटक अवकाशात झेपावतील तेव्हा त्या ‘कस्टमरां’च्या सुखासाठी अशा ट्रीप नेणाऱ्यांना प्रयत्न करावेच लागतील. सध्या तरी कोबी आणि काही फुलं वगैरे अंतराळात पिकण्याच्या वार्ता येतायत. उद्या तिथेही शेती होऊ लागली तर नवल वाटायला नको. मंगळावर तर ‘रेड वाईन’ बनवण्याचं घाटतंय आता बोला. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट असते ती अंतराळयात्रींच्या सुरक्षेची. एकवेळ बेचव, पण पोषक अन्न गिळून दिवस कंठता येतील, पण आकस्मिक अपघातांपासून बचाव कसा करायचा? अशा संभाव्य अपघातांची कल्पना करूनच अंतराळयान बनवलं जातं. तरीही कल्पना चावलासह अनेक अंतराळयात्रींचा बळी घेणाऱ्या कोलंबियाच्या अपघाताने जग सुन्न झालं होतं. आर्थिक नुकसान आज ना उद्या भरून येऊ शकतं, पण जीवितहानी झाली तर ते नेहमीच दुःखदायक ठरते. कोलंबिया यानाच्या बाहेरच्या बाजूच्या सिरॅमिकच्या टाइल्स निसटल्या आणि आग लागून ते भस्मसात झालं ही मन हेलावणारी दुर्घटना होती. अनेक निष्णात अंतराळयात्रींचा माणसाच्या वैज्ञानिक संशोधनासाठी द्यावं लागलेलं ते बलिदान होतं. त्यापूर्वी एका रशियन अंतराळयानातील यात्रीही मृतावस्थेत परतले होते. या धक्कादायक गोष्टींमुळे अंतराळयानांच्या सुरक्षेबाबत सतत संशोधन सुरू असतं. आता ‘व्हॅक्युम एक्स्टिंग्विश मेथड’ किंवा ‘व्हीईएम’ नावाची पद्धत जपानी संशोधकांनी शोधून काढली असून पृथ्वीवरील अग्निशमन सिलिंडरच्या अगदी उलट पद्धतीने त्याचं कार्य चालतं ‘व्हीईएम’ आग विझविण्यासाठी ‘फवारा’ न मारता आगीचा लोळच शोषून घेतं किंवा गिळंकृत करतं. त्यामुळे दुर्दैवाने अंतराळयानात आग लागलीच तर धूर पसरूनही गुदमरायला होतं तसंही घडणार नाही. आग आणि धूर शोषून घेईल आणि यानाला सुरक्षित ठेवेल अथवा मोठय़ा नुकसानीपासून त्याचा बचाव करील.

गरज ही शोधाची जननी असते. पूर्वी लॅपटॉप, कॉम्प्युटरही अंतराळात पाठवण्याचं वजन कमी करण्याच्या उद्देशानेच ‘डिझाइन’ करण्यात आला होता. आता तो घरोघर पोहोचलाय. अंतराळ संशोधन आणि मोहिमांचा फायदा काय, अशा प्रश्नाला आत्यंतिक गरजेतून निर्माण झालेलं वैज्ञानिक संशोधन अंतिमतः पृथ्वीवरच्या माणसालाही उपयुक्त ठरतं हेच उत्तर आहे. आता असं संशोधन काळाची गरज म्हणून वाढतच जाणार आहे.