उद्योगविश्व- नवउद्योजकांचा भविष्यकाळ उज्ज्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अश्विन बापट

भारत हा कृषीप्रधान देश असला तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योग क्षेत्रही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं. याच उद्योग क्षेत्रासाठी येणारं 2025 नेमकं कसं असेल, कोणकोणत्या क्षेत्रात भारतीय उद्योजक, महाराष्ट्राचा विचार केल्यास मराठी उद्योजक कक्षा रुंदावू शकतात, याविषयी ज्येष्ठ उद्योजक आणि अप्लाइड इनोवेशन अँड टेक्नोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष राम भोगले यांच्याशी संवाद साधला.

उद्योजकांसाठी येणाऱया वर्षात 2025मध्ये आशादायी चित्र असल्याचं ज्येष्ठ उद्योजक आणि अप्लाइड इनोवेशन अँड टेक्नोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष राम भोगले यांनी नमूद केलं. ते म्हणाले, दोन क्षेत्रांत आपल्या देशातल्या उद्योजकांसाठी प्रचंड मोठय़ा संधी आहेत. त्यातील एक पर्यटन आणि दुसरी सौरऊर्जा. महाराष्ट्राचा विचार केल्यास पर्यटनाकरिता अत्यंत पोषक अशी ही भूमी आहे. खास करून कोकणचे समुद्रकिनारे जर आपण पाहिले तर निसर्गाने भरभरून दिलंय. तरीही जितक्या प्रमाणात या समुद्रकिनाऱयांवर पर्यटनाचं क्षितिज विस्तारायला हवं होतं तितकं ते झालेलं नाही. तीच गोष्ट छत्रपती संभाजीनगरची. जिथे वेरुळची लेणी हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे. एक उदाहरण म्हणून पाहूया, या ठिकाणी जर अंदाजे वार्षिक पर्यटकांची संख्या 15 ते 20 लाखांच्या घरात धरली तर त्यातील 50 हजाराची संख्या ही केवळ परदेशी पर्यटकांची आहे. हे चित्र  नक्कीच बदलता येऊ शकतं. परदेशी पर्यटक वाढले तर या पर्यटन व्यवसायाला आणखी उभारी येईल. देशांतर्गत पर्यटन वाढत असलं तरी परदेशी पर्यटक आपण जितके जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे आणू शकू, तितका आपल्या राज्याला पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल. ही एक साखळी आहे. जास्त पर्यटक आले तर रोजगार वाढतील. रोजगार वाढला की, महसूल वाढेल आणि पैसा आपल्याच अर्थव्यवस्थेत खेळता राहील.

आणखी एक क्षेत्र जिथे खूप पोटेन्शियल आहे ते म्हणजे सौरऊर्जा. याचा अधिकाधिक वापर झाला तर दिवसागणिक वाढत जाणारी विजेची गरज भागवणं तर शक्य होईलच. शिवाय रोजगार निर्मिती शक्य आहे. यादृष्टीने शेतीमध्ये अधिकाधिक सौरऊर्जेचा वापर झाल्यास शेतकऱयांसाठीही ते हिताचं आहे. एकूणातच बायो फ्युएलचा अर्थात जैव किंवा सेंद्रीय कचऱयापासून इंधन निर्मितीची कास आपण जास्तीत जास्त धरल्यास याचा दीर्घकालीन फायदा आपल्याला होऊ शकतो. काळानुरुप पर्यावरण रक्षण किंवा पर्यावरणपूरक वाटचाल हा आपला प्राधान्यक्रम असणार आहे, किंबहुना असायला हवा. यादृष्टीने इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात ईव्हींचा वापरदेखील वाढणार आहे. दिवसागणिक बॅटरी टेक्नॉलॉजीसह ईव्हीसाठी आवश्यक तंत्र आणखी प्रगत होईल हे नक्की. खास करून शहरी भागात टू व्हीलरचा वापर हा नक्कीच वाढेल. मोठय़ा अंतरासाठी मात्र ईव्ही लगेचंच जास्त प्रमाणात वापरली जाईल अशी स्थिती दिसत नाही. एक सोपं उदाहरण घेतलं तर ही बाब आपल्याला अधिक स्पष्ट होईल. एखाद्या वाहनात पाच मिनिटांमध्ये पेट्रोल भरून होतं, मात्र पाच मिनिटांमध्ये जर तेच वाहन चार्जिंग करायचं असेल तर होत नाही. यामुळे दीर्घ अंतरासाठी नव्हे तर शहरी भागात ईव्ही व्हेईकलला नक्की चालना मिळेल.

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उद्योग जगत खास करून रोजगारावर किती परिणाम होईल, असं विचारलं तेव्हा भोगले म्हणाले की, जेव्हा संगणक देशात आला तेव्हाही लोकांच्या रोजगारांचं आता काय होणार, बेरोजगारी वाढणार का, अशी ओरड सुरू झाली होती. पण आज संगणकाच्या एन्ट्रीनंतर देशात रोजगाराची, व्यवसायाची नवी दालनं खुली झाली आहेत. तीच बाब मी एआयबाबतीत म्हणेन. एआयकडे डेटा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. ज्याचा फायदा कोणत्याही क्षेत्रातील क्षमता आणि गुणवत्ता उंचावण्यासाठी होऊ शकतो. एआयचा सकारात्मक वापर झाल्यास नफ्यासह स्पर्धात्मक दर्जाही सुधारण्यास मदतच होईल. एआयमुळे स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन वाढला की, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालनाच मिळते. हे साधं सूत्र आहे. डिजिटल पेमेंटचा मोठा फायदा आज आपण पाहतोय. ग्रामीण महाराष्ट्रानेही आज
कॅशलेस व्यवहार इतक्या सहजतेने स्वीकारल्याचं आपण सारेच अनुभवतोय.

एकीकडे हे सारं होत असतानाच आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. जागतिक पातळीवर गेल्या चार ते पाच वर्षांत भारताचं महत्त्व अधोरेखित होतंय. चीनच्या वर्चस्वाला काही अंशी ब्रेक लागतोय, अशी स्थिती आहे. त्यातच अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सत्तेवर येणं ही बाबदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप महत्त्वाची आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धाची पार्श्वभूमीही लक्षात घ्यावी लागेल. या साऱया घडामोडींचा वेध घेतला तर अमेरिकेतील उद्योग चीनकडून भारताकडे वळतायत, त्यांना भारताचं बिझनेस पोटेन्शियल एव्हाना लक्षात आलंय. इंजिनिअरिंग आणि केमिकल उद्योगसारख्या क्षेत्रात आपल्याला विकासासाठी खूप वाव आहे.

येत्या वर्षात 2025मध्ये उद्योजकतेची कास धरू पाहणाऱयांना भोगले यांनी नवउद्योजकांना मंत्र दिला आहे. ते म्हणाले, “तीन गोष्टी या उदयोन्मुख उद्योजकांनी लक्षात घ्याव्यात. एक म्हणजे योग्य पद्धतीने मार्केट सर्व्हे करूनच मैदानात उतरा. आपण काय करू इच्छितोय, त्यासाठी आपण काय करू शकतो, या साऱयाचा अभ्यासपूर्ण विचार करूनच पावलं टाका. शक्य असल्यास त्या क्षेत्रात नोकरी करून अनुभव घ्या. दुसरी बाब म्हणजे एकदम उंच नजर ठेवण्यापेक्षा छोटी छोटी ध्येय समोर ठेवून वाटचाल करा. कारण जरी तिथे तुम्ही फटका खाल्ला तरी जोखीम कमी असते. पण धडा तोच मिळतो, याउलट जर मोठी उडी एकदम मारायला गेलात तर खोलवर जखम होण्याची आणि त्यातून पुढे न सावरण्याचीच शक्यता जास्त असते. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कायम नवतंत्रज्ञान वापरत रहा. कमी खर्चाचं किंवा सेकंड हँड तंत्र केवळ पैसा वाचतोय म्हणून वापरू नका. कारण नवतंत्रज्ञानाच्या वापरातून मिळणारा फायदा हा दीर्घकालीन असतो. त्यातली गुणवत्ता आणि सातत्य हे कायम राहणारं असतं.’’ या तीन बाबी नवउद्योजकांनी लक्षात घेतल्या तर त्यांचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असेल हे निश्चित.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)