आभाळमाया : कोणी येऊन गेलं?

40

>> वैश्विक

एका दीर्घिकेत (गॅलॅक्सीमध्ये) सुमारे शंभर ते दोनशे अब्ज तारे असतील तर त्यात आपल्या सूर्यासारखे असंख्य तारे असायला हरकत नाही आणि अनेक सूर्य असतील तर त्यांच्याभोवती किमान काही हजार ग्रहमाला असायलाही प्रत्यवाय नसावा. विश्वाचा एकूण पसारा, त्यातील अब्जावधी दीर्घिका आणि त्यांच्यात सामावलेले तारे वगैरेंचा हिशेब करताना आपल्यासारखी किंवा आपल्याहूनसुद्धा प्रगत अशी जीवसृष्टी कुठेतरी असावी असं मात्र बोललं जाऊ लागलं. त्याच्या अस्तित्वाची प्रत्यक्ष अनुभूती येईपर्यंत हा केवळ कयासच असणार. ‘ड्रेक इक्वेशन’प्रमाणे एखाद्या ताऱ्याभोवती ग्रहमाला असणं अवघड नाही, परंतु त्या ग्रहमालेत जीवसृष्टीची जोपासना करणारा पृथ्वीसारखा ग्रह असू शकेल का याचा तपास महत्त्वाचा. बरेच ‘बॅरन’ किंवा शुष्क ग्रह तर आपल्याही ग्रहमालेत आहेत. म्हणजे ग्रह असल्यावर वस्ती असायलाच पाहिजे असं नाही. ‘जीव’ जगू शकेल असं वातावरण हवं आणि ‘सजीव’ किती नाजूक आहे ते आपण आपल्यावरूनच जाणतो. तापमान गेल्या महिन्यात वाढत होतं तेव्हा असहय़ काहिली होत होती, तर काही ठिकाणी बर्फवृष्टीने माणसं गारठत होती.

मुद्दा असा की, जीवसृष्टीचं जे रूप आपण सभोवती पाहतो त्यात आपण सर्वात शहाणे! (सेपियन-सुज्ञ) तेव्हा आपण इथेच जन्मलो की ‘कोठुनी आलो येथे’ वगैरेचा शोध आपणच घ्यावा. मग पुढचा प्रश्न असा की, एका वैश्विक योगायोगाने आपण जर पृथ्वीवर अस्तित्वात आहोत आणि अवघ्या विश्वाचा आवाका आपल्याला समजतो आहे तर तसाच ‘योगायोग’ अन्य विराट विश्वात अन्य कुठे झालाच नसेल असं का मानावं? केवळ आपल्याला (अजून तरी) तसे पुरावे सापडले नाहीत म्हणून? मग संशोधनच खुंटलं! त्यामुळे खऱ्या ‘एलियन’चा शोध घेण्याचे प्रयत्न कसोशीने सुरूच राहणार. त्यातूनच गेली दोन वर्षे ऑम्युऑम्युआ नावाच्या स्पेसशिपसारख्या आपल्या सूर्यमालेला भेट देऊन गेलेल्या अज्ञात वस्तूबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या ‘ऑम्युऑम्युआ’ची कल्पनाच आहे. त्यात ते एका लांबट ओबडधोबड दगडासारखं दिसतं. असे अशनी किंवा धूमकेतू आपल्या सूर्यमालेत इतस्ततः फिरत असतात, परंतु ‘ऑम्युऑम्युआ’ जरा वेगळा प्रकार होता असं जगभरच्या अनेक खगोल अभ्यासकांनाच वाटतं. 2017 मध्ये प्रथम ‘दर्शन’ देणाऱ्या या ‘विचित्र’ आकाराच्या अंतराळ ‘भटक्या’वर हॉर्वर्ड स्मिथसॉनिअन सेंटरमध्ये चर्चाही झाली. ‘ऑम्युऑम्युआ’ नावाचे हे स्पेसक्राफ्ट किंवा अंतराळवाहनासारखे पाषाण ‘बाहेरून’ आपल्या सूर्यमालेत प्रवेश करते झाले. त्याचा प्रत्यक्ष फोटो घेतला गेला नसला तरी संवेदशील उपकरणांना त्याचं अस्तित्व जाणवलं. काही काळाने या ‘वस्तू’चा वेग अचानक वाढल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं.

यामागचं कारण काय असावं त्याचा शोध सुरू झाला. ‘सोलर रेडिएशन प्रेशर’मुळे ऑम्युऑम्युआ’चा वेग वाढला का यावर चर्चासत्र झालं. काही संशोधकांचं मत असं पडलं की, ही वस्तू केवळ अंतराळात भरकटणारी नैसर्गिक वस्तू नसून त्यावर ‘कोणीतरी’ बसवलेल्या ‘लाइट सेल’मुळे (बॅटरी) तिचा वेग वाढवता येतो. हा ‘सोलर सेल’ असल्याने सूर्यप्रकाशातून ऊर्जा ग्रहण करतो. ती ‘वस्तू’ म्हणजे धूमकेतू किंवा लांबुडका अशनी (दगड) असता तर अशा गोष्टी ज्या ‘पद्धतीने’ सूर्यमालेत वावरतात तसंच त्याचं वर्तन असतं. एका संशोधकाच्या मते ‘ऑम्युऑम्युआ’ म्हणजे परताऱ्यावरच्या ग्रहमालेतून कोणीतरी आपल्या ग्रहमालेचं निरीक्षण करण्यासाठी मुद्दाम धाडलेली ‘एलियन’ वस्तू असावी. ही वस्तू एका शोध मोहिमेचा भाग म्हणून परताऱ्याभोवतीच्या परग्रहावरून आली होती का? ऑम्युऑम्युआ येऊन गेल्यावर आसपासच्या भटक्या धूमकेतूंवर त्याचा परिणाम होऊन त्यांच्यावरची धूळ उडाली असंही म्हटलं जातंय.

हे सगळं ‘निरीक्षण’ खरं ठरलं तर ‘कुणीतरी आहे तिथे!’ एवढं नक्की होईल, परंतु जे ‘कोणी’ आहेत त्यांना आपल्या ग्रहमालेतल्या ‘पृथ्वी’ नावाच्या ‘प्रगत’ ग्रहाशी संपर्क का साधावासा वाटला नाही? ते आपल्याला ‘प्रगत’ मानतच नाहीत की त्यांना आपलं अस्तित्व समजलं नाही किंवा ते आपल्याला नगण्य समजतात? असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात. प्राचीन काळी नारदीय सूक्तात सृष्टीचा जो कोणी कर्ता आहे तो ‘कर्ता आहे की अकर्ता?’ असा चिकित्सक प्रश्न विचारलेला आहे.

‘ऑम्युऑम्युआ’ या अंतराळ भटक्यामागचं वैज्ञानिक कारण शोधावंच लागेल. नैसर्गिक पाषाणातच काही यंत्रणा बसवून की तशा आकाराचं, रूपाचं अंतराळयान बनवून कोणी आपल्या ग्रहमालेची ‘रेकी’ तर करत नाही? तसं करणारे ते ‘मित्र’ असतील की ‘अतिरेकी?’ भयचकित करणाऱ्या या शंकांचं निरसन करायचं तर आपली ‘वैश्विक’ तपास यंत्रणाही अधिकाधिक सक्षम करावी लागेल. कदाचित काही काळाने या ‘ऑम्युऑम्युआ’च्या ‘स्टोरी’त काहीच दम नव्हता असंही सिद्ध होईल, पण ही काही पटकथा नव्हती. काही वैज्ञानिकांना तसं अभ्यासांती वाटतंय म्हणून त्याला महत्त्व. ‘अन्य कुणी आहे का विश्वात?’ असा आपल्यासारखाच प्रश्न पडलेले ते त्यांच्या दृष्टीने ‘अन्य’ असलेल्यांच्या शोधात आपल्या सूर्यमालेत येऊन गेले असतील तर पहिली भेट हुकली असंच म्हणावं लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या