
>> दिलीप जोशी
आपलं रूप आपल्याला आरशात किंवा फोटोत अथवा एखाद्या ठिकाणी प्रतिबिंबात दिसू शकतं. एरवी आपले डोळे सारं जगच काय, अवघं विश्व न्याहाळतात, पण आपण आपल्याला पाहत नाही असं अनेकदा घडते. उडणारं विमान किंवा धावती ट्रेन बाहेरच्या व्यक्तीला पूर्णपणे दिसते, पण आत बसणाऱया प्रवाशांना तशी कशी दिसणार?
तीच गोष्ट आपल्या आकाशगंगेची. ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेचा आपण एक भाग आहोत. या आकाशगंगेतच आपलं अस्तित्व अंतर्भूत असल्याने ती दुरून पाहणं शक्य नाही. त्याही हबलसारख्या अवकाशी दुर्बिणींना या दीर्घिकेचा बराचसा आकार दिसला. विश्वातल्या अब्जावधी दीर्घिकांपैकी एक असणाऱया आपल्या आकाशगंगेचा आकार पुरीसारखा किंवा दोन झांजा एकावर एक ठेवल्यावर दिसतात त्या मध्यभागी फुगीर आणि सभोवती चपटा आहे. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी विराट कृष्णविवर असून आपल्या सूर्यमालेसकट आपण या केंद्रकाभोवती सेकंदाला सुमारे 220 किलोमीटर वेगाने फिरत आहोत. आपल्या सूर्यमालेला आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती परिक्रमा करायला अदमासे 25 कोटी वर्षे लागतात. आपली पृथ्वी सूर्याभोवती सेकंदाला 30 किलोमीटर वेगाने फिरते. म्हणजे कोणत्याही वाहनात न बसता आपला अवकाशीय वेग जन्मल्यापासून अव्याहतपणे सेकंदाला सुमारे 250 किलोमीटर एवढा असतो.
अशा या विस्मयकारी वैश्विक घटना समजल्या की, आपलं अस्तित्व आणि आयुष्याच्या पळापळीचं नगण्य स्वरूप ध्यानात येतं, तर आपली ‘मिल्की वे’ दीर्घिका ही ‘स्पायरल’ प्रकारची आहे. म्हणजे या दीर्घिकेला अनेक वर्तुळाकार ‘बाहू’ असून आपण राहतो ती पृथ्वी सूर्यमालेसकट त्यातील ययाती (पर्सिअस) आणि धनु (सॅजिटेरियस) या दोन बाहूंना जोडणाऱया पुलावर (ब्रिजवर) वसलेली आहे.
या आकाशगंगेचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा व्यास 1 लाख प्रकाशवर्षे असून केंद्रस्थानीचा फुगवटा 5 हजार प्रकाशवर्षे तर टोकाचा चपटा भाग 1 हजार प्रकाशवर्षे इतका प्रचंड आहे. अर्थात विराट विश्वातल्या अब्जावधी दीर्घिकांच्या तुलनेत आपली ‘मिल्की वे’ दीर्घिका काय किंवा आपला जनकतारा सूर्य काय, यांना अगदीच नगण्य स्थान आहे. असं असलं तरी आमच्या दृष्टीने त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे लक्षात घ्यायला हवं. कारण या सवं मांडणीमुळे आपण पृथ्वीवर अस्तित्वात आहोत हे विसरून कसं चालेल?
एकेका दीर्घिकेमध्ये तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, ताऱयांभोवती असलेल्या ग्रहमाला यांचा प्रचंड संसार असतो. अशा एकत्र कुटुंबातले तारेच शंभर ते दोनशे अज्ब असतात. त्यापैकी सूर्यासारख्या काही ताऱयांभोवती ग्रहमाला असल्या आणि त्यात पृथ्वीसारखे जिवंत ग्रह असले तर? त्याविषयीच्या अटकळींविषयी पुढच्या लेखात पाहू.
अर्थात या आकाशगंगा परस्परांपासून खूप दूर असतात. काही आकाशगंगांना उपदीर्घिकाही असतात. आपल्या ‘मिल्की वे’ची उपदीर्घिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱया कारण्डव (टय़ुकाना) या तारकासमूहातील ‘स्मॉल मॅजेलॅनिक क्लाऊड’ हा धूसर दिसणारा छोटा ढग आपल्याला कन्याकुमारी येथून दुर्बिणीतून दिसू शकतो. हीच आपल्या दीर्घिकेची उपदीर्घिका. आमच्या खगोल मंडळातील एक मरीन इंजिनीयर पस्तीस वर्षांपूर्वी बोटीने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला गेला तेव्हा त्याला ही ‘उपदीर्घिका’ इतकी स्पष्ट दिसली की, त्याने तिथून ती आनंदवार्ता पत्राने कळवली होती. या उपदीर्घिकेचा व्यासही 30 हजार प्रकाशवर्षे असून आपल्या सूर्यमालेपासून ती 1 लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे (1 प्रकाशवर्ष म्हणजे 9460 अब्ज किलोमीटर एवढे मात्र लक्षात असू द्या).
आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकापासून तशी जवळ म्हणजे 30 हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्यालाच ‘ओरायन ब्रिज’ म्हणतात. निरभ्र आकाशात काळोख्या रात्री आपणही आपल्या आकाशगंगेचा काही भाग (पट्टा) न्याहाळू शकतो. आकाशगंगेचा सर्वाधिक तेजस्वी भाग धनु तारकासमूहात दिसतो. पावसाळा संपल्यावर निरभ्र काळोख्या आकाशात आपल्या आकाशगंगेचे दर्शन केव्हातरी जरूर घ्या. त्यासाठी दुर्बिणीची गरज नाही.
आपली आकाशगंगा स्पायरल किंवा सर्पिलाकृती आहे. काही दीर्घिकांचे बाहू दूर दूर असतात. आपल्या शेजारी दीर्घिकेचं स्वरूप तसंच आहे. ही देवयानी (ऍण्ड्रोमीडा) दीर्घिका आपल्या आकाशगंगेच्या दिशेनेच येत असून कोटय़वधी वर्षांनी या दोन आकाशगंगांचा संगम होईल, परंतु त्यातील ताऱयांमधल्या प्रचंड अंतराने आदळआपट फार न होता देवयानी आरपार निघून जाईल असं म्हटलं जातं. ही दीर्घिका आपल्यापासून अवघ्या (!) 22 लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे. काही दीर्घिका काठीसारख्या तर काही लंबवर्तुळाकृती आणि काही अनियमित आकाराच्या असतात.
सर्पिलाकृती (स्पायरल) दीर्घिकेचे उत्तम उदाहरण म्हणून शामशबल तारकासमूहातील व्हर्लपूल दीर्घिकेचं नाव घेतलं जातं. आपल्या दीर्घिकेपासून 3 कोटी 50 लाख प्रकाशवर्षे अंतरावर असलेली ही आपल्या दीर्घिकेसारखीच स्पायरल गॅलॅक्सी अत्यंत सुंदर दिसते. असा हा दीर्घिकांचा ‘ऱहस्व’ आढावा. आपलंच विश्व आपल्याला किती ज्ञात (किंवा अज्ञात) आहे हे अशा अभ्यासावरून कळतं.





























































