
>> भगवान परळीकर
माजी खासदार, सहकार महर्षी, पद्मशाली समाजाचे धुरीण, विणकररत्न गंगाधरपंत कुचन यांचे नुकतेच निधन झाले. सोलापूरच्या पूर्व भागाच्या औद्योगिक जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सोलापूरसह महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुचन यांनी जवळपास राज्यातील 23 सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनवेळा खासदार झाले.s1980 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1984च्या निवडणुकीतदेखील ते विजयी झाले हेते. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी डावलली. यानंतर 1990 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन भाजप उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्या विजयासाठी कुचन यांनी पुढाकार घेऊन जागा जिंकून आणली. यानंतर 1995च्या सुमारास गंगाधर कुचन यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सहकार व अन्य क्षेत्रांचा मोठा अनुभव असल्यामुळे सोलापूर शहर जिल्हय़ासह राज्यातील विविध पक्षांतील राजकारणी कुचन यांचे मार्गदर्शन घेत असत.
सोलापुरातील सहकारी सूत गिरण्या, वस्त्रोद्योगविषयी संस्था, सहकारी बँका आदींच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय तसेच अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते राज्य सहकारी बँकेवर औद्योगिक बँकेच्या माध्यमातून अनेक वर्षे संचालक होते. ते खासदार असताना विडी कामगारांसाठी घरकुल उभारणीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. खासदार गंगाधरपंत कुचन हे तत्कालीन मजूर मंत्री पी. ए. संगमा यांच्याशी संसदेच्या कॅन्टीनमध्ये सहज गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पी. ए. संगमा त्यांना म्हणाले, ‘‘अंदाजपत्रकामध्ये कितीतरी योजना सुचवलेल्या असतात आणि त्यांच्यासाठी आर्थिक तरतूदसुद्धा केलेली असते, परंतु त्यातल्या कित्येक तरतुदी एखादाही खासदार वाचत नाही आणि त्यांची अंमलबजावणीसुद्धा करत नाही. केलेली तरतूद वाया जाते.’’ संगमा यांची ती खंत ऐकून कुचन यांनासुद्धा वाईट वाटले. त्यांनी संगमा यांना विचारले की, ‘‘अशी एखादी तुम्ही कामगारांसाठी केलेली तरतूद मला सांगा. ती मी अमलात आणून दाखवतो.’’ त्यावर संगमा यांनी खासदार कुचन यांना अंदाजपत्रकात आपण बिडी कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना सुचवली. गंगाधरपंत कुचन यांनी दिलेल्या शब्दानुसार घरकुल योजनेचा पाठपुरावा केला आणि सोलापुरातली पहिली विडी घरकुल योजना उभी राहिली. त्यानंतर विविध घरकुल योजना इतर नेत्यांनी उभ्या केल्या आणि सोलापूर हे घरकुलांचे शहर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले. गंगाधर कुचन यांच्या निधनाने सोलापुरातील एक अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पद्मशाली समाजाच्या उन्नतीसाठी, सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रापासून दूर असूनदेखील आपल्या घरात नित्य नियमित वृत्तपत्र वाचन, रेडिओ ऐकणे, टीव्ही पाहणे, विविध क्षेत्रांतील माहिती घेणे, सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये बैठकांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या पूर्व भागातील जडणघडण, वैभवाचे साक्षीदार असलेल्या एका पर्वाचा अंत झाला आहे.






























































