
>> नीती मेहेंदळे
नद्या स्वतःच आपली कशी काळजी घेतात याचं हरिपूरचा संगम उत्तम उदाहरण आहे. कृष्णा-वारणा दोन्ही नद्यांवर मोठमोठी धरणं बांधलेली आहेत. कोयना पुढे प्रीतिसंगमाला जाते तेव्हा कृष्णेचं पाणी लोकांना बारमाही मिळावं यासाठी लगोलग वारणा मदतीला येते. त्यामुळे इथला परिसर तसा नेहमी सुजलाम् सुफलाम् दिसतो. संगमाच्या घाटावर पार पुढे बसून दोन नद्यांना न्याहाळताना हे सगळं चित्र नकाशा होऊन डोळ्यांपुढे अवतरतं आणि हरिपूरविषयी अधिक आत्मीयता वाटते.
कोल्हापूरहून वारणा येते कृष्णेला भेटायला ती सांगलीत हरिपूरपाशी. वारणा – कृष्णा गळाभेट घेतात त्या जागी काळपट आणि स्वच्छ असं दोन वेगळ्या रंगांचं पाणी पण दिसतं. त्या संगमावरच एक नितांत रमणीय असा ऐतिहासिक विस्तीर्ण घाट आजही चांगल्या अवस्थेत दिसतो. घाटाजवळ पहिलं मंदिर संकुल लागतं तेच मुळी संगमेश्वराचं. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात पटवर्धन घराण्यातील वीर पुरुषाने संगमस्थानाचे महत्त्व जाणून अनेक मंदिरांची हरिपूरमध्ये स्थापना केली. सांगली-मिरज-पुरुंदवाड प्रदेशात पटवर्धन संस्थान कार्यरत होते. त्यांचे या सर्व ठिकाणी आजही तगून असलेले भव्य वाडे त्याची साक्ष आहेत, असं तिथल्या पुजाऱयांकडून सांगितलं जातं की, संगमेश्वराचं देऊळ चारशे वर्षे तरी पुरातन आहे. आतील शिवलिंग हे मात्र प्राचीन समजलं जातं. रामाने वनवासात स्वहस्ते इथलं शिवलिंग स्थापन केलं व त्याची पूजा केली अशी एक पाटीसुद्धा देवळात दिसते. तसेच गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायात 77 वा श्लोकही तिथे नमूद केला आहे, जो या संगमाचं नाव
उद्धृत करतो –
वरुणासंगमी असे बरवे
जेथे तुम्ही मनोभावे
स्नान करा मार्कंडेय नावे
श्री संगमेश्वर पुजावा
या मंदिरात नित्य पूजेसोबत लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र इ. पूजाही होत असतात. महाशिवरात्री, विशाळी अमावस्या, श्रावणी सोमवार, विजयादशमी इ. दिवशी तिथे उत्सव साजरे केले जातात.
अशीच आजूबाजूला गणपती, हनुमान, विष्णू, देवी मंदिरं आढळतात. तिथलं विष्णू मंदिर असंच एक उत्कृष्ट स्थापत्याचा नमुना आहे आणि त्याला भवताली तटही आहे. असंच सुंदर विष्णू मंदिर कुरुंदवाड येथेही दिसते.
गेल्या वर्षी पावसाळ्यात हरिपूरच्या संगमाजवळ व शेतात दोन बारा फुटी मगरी दिसल्या होत्या तेव्हा गावात भयाचं सावट पसरलं होतं. पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचं आगमन झालं असावं असा अंदाज स्थानिक व्यक्त करतात. त्यातून सहाशे कोटींचा नवा पूलही या संगमापासून शिरोळे गावापर्यंत बांधायचा संकल्प सरकारकडून मंजूर झालाय, ज्याला गावकरी विरोध करत आहेत. या पुलाला जोडणारे स्थानिक मार्ग करावे लागतील व त्यांना अडलेलं पुराचं पाणी वाट न मिळाल्याने गावात शिरण्याचा धोका त्यांनी दर्शवला आहे. यातून जो तोडगा निघेल त्यात या सुंदर मंदिर समूहाला धक्का लागू नये याचीही नोंद घेतली जावी अशी आशा आहे. नदीकाठच्या मंदिरांना पुराचा धोका सर्वात जास्त असतो. त्यातूनही हरिपूर आजही बरेच सुस्थितीत आहे. त्यात मंदिर ट्रस्ट व गावकऱयांचा मोठा हातभार आहे. घाटावर नेणाऱया रस्त्यावर सुंदर पायऱया व रेलिंग केलेलं दिसतं.


























































