लेख – आभाळमाया- वैश्विक- मंगळावर हेलिकॉप्टर!

गेल्या वर्षी जगाला कोविडने ग्रासायला सुरुवात केल्यावर जवळपास सर्व व्यवहार थबकले, परंतु अवकाश संशोधनाच्या मोहिमा  ठरल्या वेळेनुसार प्रगती करत  होत्या. कारण त्यांचे नियोजन खूप आधी सुरू झालेले असते. सर्व संभाव्य शक्यतांचा साकल्याने आढावा घेऊन एखादी अवकाशस्वारी निश्चित केली जाते. तशीच गोष्ट मंगळावर नुकत्याच पोचलेल्या ‘पर्सिव्हरन्स’ यानाच्या बाबतीत घडली.

2012 मध्ये मंगळपृष्ठावर ‘क्युरिऑसिटी’ यान गेले तेव्हा त्याचा खूप बोलबाला झाला. या यानाने केलेल्या संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणून ‘पर्सिव्हरन्स’ कार्य करत आहे. याचा अर्थच आहे, एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करणे. हे नाव देण्यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 28 हजार विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. त्यापैकी अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या ऍलेक्झॅण्डर मेथेर या सातवीतल्या विद्यार्थ्याने सुचवलेले ‘पर्सिव्हरन्स’ नाव स्वीकारले गेले. या उपक्रमातून ‘नासा’ने सर्वसामान्य लोकांशी जे नातं जोडलं ते वैज्ञानिक जाणिवा वाढवण्यास मदत करू शकतं. ‘पर्सिव्हरन्स’चं उड्डाण पाहण्यासाठी ऍलेक्झॅण्डर कुटुंबीयांसह उपस्थित होता.

‘क्युरिऑसिटी’चा अनुभव आल्याने ‘पर्सिव्हरन्स’मध्ये काही बदल करण्यात आले.  या रोव्हरची चाके मंगळावर फिरण्याच्या दृष्टीने अधिक सक्षम व्हावीत म्हणून त्याची रुंदी किंचित कमी करण्यात आली आणि 1025 किलो वजन झेलणाऱया या यानाचे वजन पेलण्यासाठी चाकांना टायटॅनियमचे स्पोक (सायकलच्या चाकाला तारा किंवा आऱया असतात तसे) बसवण्यात आले. हे यान प्लुटोनियम ऑक्साईड इंधनावर चालणार आहे.

यावरचे 19 शक्तिशाली कॅमेरे मंगळाचा बारकाईने वेध घेतील. थोडा जास्त लांब केलेला रोबोटिक ऑर्म तेथील दगड, माती गोळा करेल. दोन उत्तम मायक्रोफोन आवाजाचे ध्वनिमुद्रण करतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यानातून पाठवलेले ‘इंजेन्युईटी’ हे छोटेसे हेलिकॉप्टर मंगळावर स्वतंत्रपणे उड्डाण करून इतिहास घडवत असेल. 1903 मध्ये अमेरिकेत राइट बंधूंनी ‘फ्लायर’ नावाचे पहिले यांत्रिक विमान उडवले. इंधनावर उड्डाण करणारे  किंवा ‘पावर्ड फ्लाइट’ म्हटले गेलेले ते आपल्या ग्रहमालेतले पहिले विमान. त्यानंतर माणूस 1969 मध्ये चंद्रावर गेला. तेथे त्याने ‘चांद्र बग्गी’ चालवली. मंगळावरही स्वयंचलित ‘रोव्हर’ फिरू लागली, परंतु पृथ्वी सोडून इतर ग्रह किंवा उपग्रहाच्या पृष्ठावरून ‘स्वतः’ उड्डाण करणारे यान नव्हते. त्यामुळेच ‘इंजेन्युईटी’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे मंगळावरचे स्वयंचलित उड्डाण हे ‘पर्सिव्हरन्स’च्या मोहिमेतील मोठेच यश म्हणावे लागेल. मंगळावरच्या ‘जेझेरो’ या विवराचं संशोधन करताना हे यान मंगळावरच्या प्राचीन जैविक नोंदी (असल्या तर) दगड, खडकांच्या नमुन्यांतून या ग्रहाच्या रचनेचा आरंभकाळ याचा शोध घेऊन मंगळावरच ऑक्सिजन किंवा प्राणवायूची निर्मिती करता येणे शक्य आहे का? या गोष्टींचा अभ्यास करेल. अर्थातच आगामी काळात मंगळावर ‘वसाहत’ करायची झाल्यास मानवापुढे कोणत्या अडचणी उभ्या राहतील आणि त्याचं निराकरण कसे करायचे यासाठी ते सगळे प्रयत्न आहेत.

इलॉन मस्कसारखे उद्योजक आताच मंगळ मोहिमांची आखणी करू लागले असून जगातले अनेक जण ‘मंगळ प्रवासासाठी’ उत्सुक आहेत. सर्वसामान्यांना या ग्रहावर नेण्यापूर्वी तिथल्या सुरक्षेची काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे. मंगळ माणसासाठी वसाहतयोग्य करता येईल का याची खात्री पटल्यावरच पुढचे पाऊल टाकता येईल. उणे 90 अंश तापमानात ‘इंजेन्युईटी’चे उड्डाण 31 दिवस व्हावे अशी अपेक्षा आहे. ते यशस्वी झाले तर उद्याच्या मंगळ मोहिमांना मोठाच दिलासा मिळेल.

‘पर्सिव्हरन्स’च्या उड्डाणात ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली त्या वैज्ञानिकांत  हिंदुस्थानी असलेल्या स्वाती मोहन यांचाही समावेश आहे. मूळच्या कर्नाटकच्या असलेल्या स्वाती या नासासाठी काम करतात. ‘पर्सिव्हरन्स’ मंगळपृष्ठावर उतरत असतानाच्या काळात त्याचं नियंत्रण आणि मार्गदर्शन स्वाती मोहन यांनी केले. त्याबद्दल त्यांचे जगभरातून कौतुक झाले. ‘पर्सिव्हरन्स’ मंगळावर उतरताच अमेरिकन चॅनेलवरची स्वाती मोहन यांची छोटीशी मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी मंगळावरचे संदेश काही मिनिटांनी आपल्यापर्यंत कसे पोचतात ते सोप्या शब्दांत सांगितले. अशा संशोधकांच्या अथक आणि चिकाटीच्या प्रयत्नांतून, उत्साहातूनच वैज्ञानिक प्रगती होते आणि त्याची फळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कालांतराने मिळतात. अशा संशोधक वृत्तीच्या मंडळींविषयी आपण कृतज्ञ असायला हवे आणि मंगळाबद्दलची ‘धास्ती’ घालवायला हवी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या