लेख : नाव आणि चेहरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी<<

[email protected]

कोणीतरी अचानक समोर उभा ठाकतो आणि विचारतो,

‘‘ओळखलंत?’’

…आपण ब्लँक!

काही वेळेला वाटतं, चेहरा कुठेतरी पाहिलाय, पण नाव आठवत नाही. काहीवेळा तर दोन्ही आठवत नाही. गेली 30 वर्षे खगोल संस्थेत काम करत असताना शेकडो माणसं नजरेसमोरून गेली. आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाला दरवेळी दोनचारशे माणसं येतात त्यांच्याशी तेवढय़ापुरता औटघटकेचा परिचयही होता. जितका वेळ बोलणं होतं तेही अगदी मनापासून. ‘‘आम्ही पुन्हा नक्की येऊ’’ असं कितीतरी जणांनी जाताना आवर्जून सांगितलं. त्यातले काही पुनः पुन्हा येत राहिले ते परिचित झाले. मित्र झाले. काहींना मनात असूनही यायला जमलं नसेल, पण त्या क्षणाची ओळख त्यांनी जपून ठेवली. असे अनेक भेटतात. ‘‘ओळखलं का?’’ विचारतात. सुरुवातीला गोंधळून जायचो. वाटायचं, संस्थेत भेटलोय की पत्रकारितेच्या क्षेत्रातील एखाद्या कार्यक्रमात? की आणखी कुठे? मग ती व्यक्ती ‘ओळख’ सांगायची. गेल्या पंचवीस वर्षांत असं अनेकदा घडलंय.

आपण आयुष्यभरात किती माणसं बघतो? त्यातली किती परिचित होतात? कोणी फार थोडय़ा वेळासाठी प्रवासात भेटतं. परवाचीच गोष्ट. लोकल ट्रेन बंद पडली. सहप्रवाशांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यात एक कॉलेजकुमार, एक मध्यमवयीन असे सर्व वयोगटांतले. तास दोन तास गेले. कोण काम करतं इथपासून अनेक गोष्टींवर चर्चा झाली. नंतर सारे आपापल्या मार्गाने निघून गेले. “बरं झालं, गप्पागोष्टीत छान वेळ गेला’’ म्हणत धन्यवाद देऊन झाले. आता पुन्हा तेच बाहेर भेटण्याची शक्यता नव्हती. महिनाभराने त्यातला तरुण मुलगा पुन्हा भेटला. योगायोगाने आम्ही दोघांनीही परस्परांना ओळखलं. स्वभाव गप्पिष्ट असला की, अशा ओळखी होतातच. त्यातल्या किती लक्षात राहतात ते नक्की सांगता येणं कठीण.

बऱ्याचदा आमच्याकडे शाळकरी वयात शिकून गेलेला मुलगा तरुण झाल्यावर अचानक भेटतो. “मी नेहमी यायचो. आपण खूप वेळा भेटलोय’’ असं त्याने सांगितलं तरी ‘टय़ुब’ पेटत नाही. एकतर त्याचा चेहरा-मोहरा पार बदललेला असतो. निरागस पोराचा ‘हिरो’ झालेला असतो. कदाचित नोकरीला लागलेला, लग्न झालेलाही असतो. कसं ओळखणार? ते त्यालाही समजतंच. मग मधला काळ विसरून समान भूतकाळातल्या गप्पा आणि सध्या काय चाललंय याची चर्चा होते.

प्रश्न असा की भेटलेल्या, बऱ्याचदा संपर्कात आलेल्या, पण पुनर्भेटीमध्ये बराच काळ गेलेल्या व्यक्तीचे चेहरे आठवतात की नावं? याबाबत आमच्या एका ‘सरां’ची स्मरणशक्ती अफाट होती. 1970 मध्ये एसएससी झालेले आम्ही काही जण सरांच्या ‘सहस्रचंद्र दर्शन’ कार्यक्रमाला म्हणजे त्यांच्या ऐक्याऐंशीव्या वर्षी त्यांना भेटायला गेलो. त्या वयातही त्यांची तीच तीक्ष्ण नजर आणि तल्लख स्मरणशक्ती यांचा प्रत्यय आला. आम्हाला तर त्यांनी ओळखलंच, पण बरोबर नसलेल्या आणि आम्हालाही पंचवीस-तीस वर्षांत न भेटलेल्या आमच्या वर्गातील पाच-पन्नास जणांची नावं विचारली.

हे ‘ओळखण्याचं’ तंत्र म्हणजे मेंदूतली गंमत आहे. एखाद्याचं नाव लक्षात राहणं म्हणजे स्मृतिकोषात दडलेलं नाव आठवणं, पण चेहराही लक्षात राहणं म्हणजे आपण त्या व्यक्तीला महत्त्व देण्याइतपत ओळखणं असं मानलं जातं, पण दोन्ही आठवत नसेल तर काय? याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत उदासीन असतो असा नव्हे, तर प्रत्येकाच्या स्मृतिसंग्रहाच्या क्षमतेवर ते अवलंबून असतं.

आमचे एक नातेवाईक एकदा एका प्रसिद्ध पर्यटनस्थळाला भेट देऊन आले आणि आपण कुठे गेलो होतो तेच त्यांना आठवेना. कुठे राहिलो, कसे राहिलो, तिथे नदी होती, धबधबा होता वगैरे आठवत होतं. शेवटी तिथे असलेल्या झुलत्या पुलाची ‘ओळख’ मनोमन उमटली आणि मग त्या गावाचं नावही! असोसिएशन ऑफ मेमरीजमध्ये आपण असं नकळत करतच असतो. पत्ता सांगताना “डावीकडे तो अमुक ‘मॉल’ आहे, त्याच्यापुढे चौक लागेल, तिथे उजवीकडे’’ वगैरे सांगितलं जातं… आणि सगळं लक्षात ठेवून नेमकं बिल्डिंगचं नावच आठवत नाही असंही घडतं.

‘‘हल्ली मला साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीत. कालपरवाचं विसरायला होतं’’ असं अनेक जण सांगतात. उगाचच अपल्याला डिमॅन्शिया’ झाल्या का याची भीती बाळगतात. तसं काही नसतं. आपण म्हणजे आपलं मन जेवढं जास्त व्यापात गुंतलेलं असतं आणि विविध प्रकारचे ताण-तणाव कळत-नकळत येत असतात, त्यातून प्रत्येक जण कधी ना कधी असा ‘ब्लँक’ होतोच. अर्थात तसं वारंवार होऊ लागलं (आणि तेही लक्षात राहिलं) तर डॉक्टरी सल्लाच योग्य. एरवी अनेकदा स्मरणशक्तीइतकीच ‘विस्मरणशक्ती’सुद्धा उपयोगी पडतेच. नको ते वाद, नको ते प्रसंग विस्मृतीत गेलेले काय वाईट?