दुधाचा वापर वाढवू या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विवेक हिं. क्षीरसागर

एका बाजूस शासन /एनडीडीबी दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसऱया बाजूस उत्पादित दुधाची विल्हेवाट कशी लावायची, दूध उत्पादकांना योग्य दर कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर आपल्याला शेतकऱयांचे नुकसान टाळावयाचे असेल तर आपल्याला दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढविले पाहिजे. आजच्या दुग्धदिनाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त दुधाचा वापर करण्याचा निश्चय करूया.

प्राचीन काळापासून अर्थातच यादव कालापासून दुग्ध व्यवसाय चालू असल्याचे आपल्या वाचनात येते आणि तो पुढे चालत आलेला आहे. जशी जशी मानवाची उक्रांती होत गेली त्या त्या प्रमाणे व्यवसायामध्ये सुधारणा होत गेलेली आहे. म्हणजेच शेतीला पूरक व्यवसाय निर्माण करून त्यामधूनच मानवाची प्रगती होऊ शकते अशी शिकवण श्रीकृष्णाची होती की काय असे वाटते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने आहारातील दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होण्यासाठी 2001 पासून दरवर्षी 1 जून जागतिक दुग्धदिन साजरा केला जात आहे.

दूध हे पूर्णान्न असून त्यात मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी पोषणमूल्य असल्याने जनतेने फास्ट फूड खाण्याचे टाळून दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. लहान मुले व सर्व आबालवृद्धांनी आपल्या सुदृढ आरोग्यासाठी दिवसाची सुरुवात दुधानेच करावी. आजकाल सॉफ्ट ड्रिंक्स / हार्ड ड्रिंक्सला मोठी मागणी आहे. बार/रेस्टॉरंटमध्ये गर्दी असते अशीच गर्दी मिल्क पार्लरवर व्हायला पाहिजे. दुधाचा वापर वाढविणे म्हणजे एक प्रकारे शेतकऱयांना मदत करणे आहे. आजच्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहराकडून खेडय़ाकडे गेलेला व निघालेले सर्वसामान्य लोकांचे लोंढे, उद्या त्यांना आपण काय काम देणार आहोत याचा गंभीरपणे विचार केला तर दुग्धव्यवसाय हा एक प्रबळ दावेदार होऊ शकतो, जो शेतीला परस्परपूरक आहे. प्रत्येकाने 150 मिलि दुधामध्ये हळद टाकून त्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढून कोरोनापासून बचाव होऊ शकतो. शासनानेदेखील दुग्धव्यवसायाच्या सबलीकरणाकरिता लक्ष घालून योग्य ते धोरण आखून दूध खरेदी /विक्रीच्या दराचे नियमन करणे आवश्यक आहे. दुधाचा वापर वाढण्याकरिता जसे ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ हे जसे आपल्या मनावर बिंबविले जाते त्याचप्रमाणे ‘मंगल हो या बुध, रोज पियो दूध’ असे जाहिरातीचे माध्यमही वापरायला हवे. शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करावा. सध्या शाळा बंद आहेत. तथापि शाळा सुरू झाल्यानंतर याचा निश्चितच फायदा होईल. याबरोबरच गोवंश हत्याबंदीमुळे शेतकऱयांना निरुपयोगी जनावरे सांभाळावी लागतात याबाबतदेखील शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

हिंदुस्थान हा जगातील नंबर 1 चा दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. हिंदुस्थान जरी दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी प्रति जनावर दुधाची उत्पादकता कमी असल्याने हिंदुस्थानातील दुग्धव्यवसाय किफायतशीर होत नाही. सन 2018-19च्या उपलब्ध आकडेवारीनुसार हिंदुस्थानातील दुधाचे वार्षिक उत्पादन 18.78 कोटी टन होते, तर महाराष्ट्राचे वार्षिक उत्पादन 1.16 कोटी टन होते. याच आकडेवारीनुसार हिंदुस्थानातील प्रति माणशी प्रतिदिन दुधाची उपलब्धता 394 ग्रॅम तर महाराष्ट्रातील प्रती माणशी प्रतिदिन दुधाची उपलब्धता 266 ग्रॅम होती. देशात दूध उत्पादनात महाराष्ट्राचा क्र. 7 वा आहे तर प्रति माणशी प्रतिदिन दुधाच्या उपलब्धतेत 17 वा क्रमांक आहे. आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 68 टक्के दूध संकलन हे खासगी डेअरींकडून केले जाते. सहकारी दूध संघामार्फत सुमारे 31 टक्के दूध संकलित होते, तर शासनाचा दूध व्यवसायातील सहभाग (संकलन) हे 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गेले सुमारे वर्षभरापासून राज्यातील दुग्धव्यवसाय अडचणीत आलेला आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीत घट झालेली असल्याने दूध अतिरिक्त झाले आहे. या दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी अतिरित्त दुधाची पावडर व बटर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तथापि दूध पावडर व बटरला मागणी नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पावडर व बटरचा साठा पडून आहे. परिणामी दूध पावडर उत्पादकांनी दुधाची खरेदी कमी केलेली असून दूध खरेदीचे दर देखील कमी केलेले आहेत. सहकारी दूध संघांना शासनाने प्रती लिटर किमान 25 रुपये खरेदी दर देण्याचे बंधन घातल्याने सहकारी दूध संघांची आर्थिक अडचण झालेली आहे. पर्यायाने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. आजच्या दुग्धदिनाला ही कटू किनार आहे.

एका बाजूस शासन /एनडीडीबी दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱया बाजूस उत्पादित दुधाची विल्हेवाट कशी लावायची, दूध उत्पादकांना योग्य दर कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर आपल्याला शेतकऱयांचे नुकसान टाळावयाचे असेल तर आपल्याला दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढविले पाहिजे. आजच्या दुग्धदिनाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त दुधाचा वापर करण्याचा निश्चय करूया.