मुद्दा – हिंदुस्थानकडून अपेक्षा वाढल्या

796

>> संजय गंगाराम साळगांवकर

आज जागतिक स्तरावर कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वच देशात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच Covid-19 या साथीचा आजारला वैश्विक महामारी म्हणून घोषित केले आहे. चीनच्या वुहान प्रांतातून हा आजार जगभर पसरला आहे. युरोपियन देशांसह अमेरिका, रशियासारख्या देशातही त्याने थैमान घातले आहे. हिंदुस्थानातही हीच स्थिती आहे. जवळपास 194 सदस्य असलेली जागतिक आरोग्य संघटना विविध देशांतील साथीच्या आजारांची माहिती घेणे, इतर देशांना ती माहिती प्रदान करणे, लस विकसित करणे, वैद्यकीय माहितीची देवाणघेवाण, उपचारावर संशोधन करणे, त्या संशोधनाकरिता निधी गोळा करणे इत्यादी प्रमुख कार्य करीत असते. या संघटनेचे जीनिव्हा येथे मुख्य कार्यालय आहे. तसेच इतर सहा देशांत कार्यालये आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी या संघटनेकडून वैद्यकीय उपचारांसंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन तथा सूचना दिल्या जात आहेत. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो आणि नेमक्या या काळातच जागतिक स्तरावर या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. ठोस वैद्यकीय इलाज उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षित अंतर राखा, मास्कचा वापर करा असे सांगत घरीच रहा, सुरक्षित रहा, गर्दी टाळा व प्रशासनाला सहकार्य करा असे घोषवाक्य या संघटनेने जगाला यावर्षी दिले आहे.

कोरोना विषाणूमुळे जगात आजपर्यंत तीन लाखांवर मृत्यू झाले आहेत. हिंदुस्थानात कोरोनबाधितांचा आकडा दीड लाखावर गेला आहे. हिंदुस्थानने सुरुवातीपासूनच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे,  क्वारंटाईन, विलगीकरणासह लॉक डाऊन, जनता कर्फ्यू,  संचारबंदी इत्यादी कठोर उपाययोजना केल्या. प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने परिास्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हिंदुस्थानचे कौतुक केले. हिंदुस्थानने डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्गांचे कौतुक करीत त्यांना या लढ्यातील योद्धे असे  संबोधले. तसेच या कठीणप्रसंगी हिंदुस्थानने शेजारील देशांसह अमेरिकेलाही औषध पुरवठा तत्काळ केला. माणुसकीचे दर्शन घडविले. शिवाय ‘वंदे भारत’सारख्या अभियानातून जगभरात अडकलेल्या हिंदुस्थानींना सुरक्षित मायदेशी आणले. या सर्व गोष्टींमुळे परराष्ट्र धोरणाबाबतही संयुक्त राष्ट्रातही हिंदुस्थानची प्रतिमा आणि भूमिका वजनदार राहिली. कोरोनाच्या लस संशोधन प्रक्रियेतील महत्त्वाची माहिती चीन लपवित असून त्या देशाकडून याबाबत सहकार्य मिळत नसल्याचा आरोप अमेरिका सातत्याने करीत आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचेही लक्ष वेधत आहे.  तथापि संघटनेच्या महासंचालकांची चीनबाबतची भूमिका ही नेहमी दुटप्पीपणाची राहिली आहे. त्यामागे चीनचा दबाव असल्याचे बोलले जात आहे. स्वाईन फ्लू, इबोला आदी साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवतानाही या संघटनेच्या महासंचालकांची भूमिका वादातीत नव्हती. कोरोना प्रकरणात युरोपीयन देश व अमेरिका यांनी चीनविरोधी आघाडी उघडली आहे. हिंदुस्थाननेसुद्धा अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. हिंदुस्थानी सीमेलगत चीनच्या संशयास्पद हालचाली वाढल्या आहेत. यापूर्वी चीनने आपल्यावर आक्रमण केले आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेतील सर्वच देशांनी या संघटनेच्या कार्याध्यक्षपदासाठी हिंदुस्थानची निवड करणे याला अनेक दृष्टीकोनातून महत्व आहे. आता या पदावर आपले प्रतिनिधित्व केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नेमणूक झाली आहे. हिंदुस्थानसाठीच नक्कीच ही कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे. हिंदुस्थानात  कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्रातही ही संख्या कमी होताना दिसत नाही. मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी स्थानिक खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने शासन कोरोनावरील नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील कोरोना योद्ध्यांच्या या मेहनतीची नोंद घेत आहे. नजीकच्या काळात कोरोनाचे लस संशोधन प्रगतीपथावर असेल आणि परिास्थिती आटोक्यात आणता येईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद आता हिंदुस्थानकडे आहे. यापूर्वी हे पद जपानकडे होते. जागतिक स्तरावर आरोग्याविषयी चिंता वाढल्या आहेत. अशा प्रतिकूल परिास्थितीत हे पद आपल्याकडे आले आहे. हिंदुस्थानकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि त्या पूर्ण होतील अशी आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या