
>> डॉ. मंजिरी भालेराव
इंडोनेशियामध्ये जशी हिंदू देवदेवतांची मंदिरे (चंडी) बांधली गेली, तसेच बौद्ध स्थापत्यही निर्माण झाले. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय आहे तो म्हणजे बोरोबुदूर येथील स्तूप. जगातील सर्वात मोठे बौद्ध स्मारक म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो हा स्तूप मध्य जावामधील मगेलांगजवळ आहे. जोगजाकार्ताच्या (योग्यकर्ता) उत्तरेला साधारण 25 कि.मी. अंतरावर हे स्थळ आहे.
जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह असलेल्या इंडोनेशिया या आग्नेय आशियातील देशात प्राचीन हिंदुस्थानी सांस्कृतिक प्रभावाची अनेक उदाहरणे स्पष्टपणे पाहायला मिळतात. ‘बहासा (भाषा या शब्दावरून आलेले रूप) इंडोनेशिया’ असे त्यांच्या भाषेचे नाव आहे. रामायण-महाभारत आणि पुराणे तर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या एका मोठय़ा विमान कंपनीचे नाव विष्णूच्या वाहनावरून म्हणजे ‘गरूड इंडोनेशिया’ असे आहे. आजच्या हिंदुस्थानात जशी विविधतेत एकता आहे, तशीच इंडोनेशियातसुद्धा दिसून येते. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या ‘गरूड पंचशील’मध्ये पंख पसरलेला गरूड ‘भिन्नेक तुंगल इक’ (विविधतेत एकता) अशा नावाची पट्टी घेतलेला दिसतो. ही विविधतेतील एकता तिथे अचानक नाही आली. इंडोनेशियावर काळाच्या ओघात अनेक राजवटींनी राज्य केले. त्यापैकी काही राजांनी हिंदू धर्माला आश्रय दिला, काहींनी बौद्ध धर्माला, तर काहींनी शिव आणि बुद्ध हे फारसे वेगळे नाहीत असे मानले. त्यामुळे त्यांची एकत्र उपासना करण्यास सुरुवात केली. आग्नेय आशियामध्येच अनेक देशांमध्ये हे हिंदू आणि बौद्ध धर्मांचे तादात्म्य दिसून येते .
इंडोनेशियामध्ये जशी हिंदू देवदेवतांची मंदिरे (चंडी) बांधली गेली, तसेच बौद्ध स्थापत्यही निर्माण झाले. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय आहे तो म्हणजे बोरोबुदूर येथील स्तूप. जगातील सर्वात मोठे बौद्ध स्मारक म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो हा स्तूप मध्य जावामधील मगेलांगजवळ आहे. जोगजाकार्ताच्या (योग्यकर्ता) उत्तरेला साधारण 25 कि.मी. अंतरावर हे स्थळ आहे.
जावातील शैलेंद्र घराण्याच्या काळात हा स्तूप बांधला गेला. इसवी सनाच्या 9व्या शतकात बांधलेला हा स्तूप युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे. बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान, तत्कालीन कला आणि स्थापत्य या सर्वांचे सुंदर मिश्रण या स्मारकात पाहायला मिळते. बोरोबुदूर स्तूप हा एका उंचवटय़ावर, नऊ चौथऱयांवर बांधला आहे. खालपासून वरपर्यंत प्रत्येक चौथरा छोटा छोटा होत जातो. नवव्या स्तरावर मधोमध एक घंटेच्या आकाराचा स्तूप आहे. तो खडकात कोरला आहे. त्याच्या बाजूचे स्तूप हे बांधलेले आहेत. नऊपैकी सहा स्तर हे चौकोनी आकाराचे आहेत. वरचे तीन हे गोलाकार आहेत. सर्वात खालच्या मजल्याची लांबी 120 मी. आहे, तर सर्वात वरच्या मजल्याचा व्यास 27. 50 मी. आहे. खालच्या पाच मजल्यांना आतील बाजूस भिंती असून त्यांच्यावर कठडे आहेत. त्यामुळे खालच्या मजल्याचा कठडा व वरील मजल्याची भिंत यामध्ये गॅलरीसारखी मोकळी जागा तयार झाली आहे. अशा एकूण चार गॅलऱया आहेत. वरच्या तीन मजल्यांवर छोटे जाळीदार स्तूप बांधले आहेत आणि त्यात बुद्धाची मूर्ती बसवली आहे. मुळात इथे कोनाडे आणि स्तूप मिळून 504 बुद्धमूर्ती होत्या. आज मुख्य स्तूपाच्या भोवती असलेल्या स्तूपांमध्ये एकूण 72 बुद्धाच्या मूर्ती आहेत.
बोरोबुदूरच्या या स्तूपाच्या खालच्या स्तरावरील जोत्यावर मोठय़ा प्रमाणावर कथनशिल्पे कोरलेली आहेत. ती एकूण 2,672 आहेत. त्यात बुद्धजीवनातील प्रसंग चित्रित केलेले आहेत. स्तूपाच्या सर्वात खालच्या चौथऱयावर नरकातील यातना आणि स्वर्गातील सुखे दाखविणारी शिल्पे आहेत. यावरच्या चौथऱयावर प्रत्येक दर्शनी बाजूवर कोनाडय़ात बसविलेल्या बूद्धमूर्ती आहेत. पूर्वेस अक्षोभ्य, दक्षिणेस रत्नसंभव, पश्चिमेस अमिताभ आणि उत्तरेस अमोघसिद्धी या पाचपैकी चार ध्यानी बुद्धांच्या (म्हणजेच पंचतथागत) मूर्ती आहेत. त्याच्यावर असलेल्या चौथऱयाच्या कोनाडय़ात पाचवा बुद्ध वैरोचन याच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. यावरच्या चौथऱयावर बुद्धाच्या जीवनातील प्रसंग तसेच जातक आणि अवदानातील कथा शिल्पित केलेल्या आहेत. ललित विस्तर या बौद्ध ग्रंथामध्ये आलेल्या बुद्ध जीवनातील बऱयाच कथा इथे शिल्पांकित केल्या आहेत.
या स्तूपाची एकूण रचना ही बौद्ध धर्मामध्ये असलेल्या विश्वाच्या कल्पनेशी मिळती जुळती आहे. यामध्ये विश्वाच्या कल्पनेत तीन प्रकारचे लोक किंवा धातू (म्हणजे जग) असतात असे मानले आहे. सर्वात खाली कामधातू ज्यामध्ये इच्छा, मोह हे जास्त प्रभावी असतात, त्यानंतर रूपधातू, ज्यामध्ये इच्छा, काम, राग जरी गेले असले तरी रूप म्हणजे शरीर बाकी असते. शेवटी अरूपधातू ज्यामध्ये शरीर गेलेले असते आणि फक्त चित्ताने व्यवहार चालतो. अशा प्रकारच्या विश्वकल्पनेचे प्रत्यक्ष स्वरूप स्थापत्यामध्ये तयार करणे आणि त्यांना त्या त्या स्तरासाठी योग्य शिल्पांनी सजवणे हे एक फार मोठे स्वप्न त्या स्थापतींनी आणि बौद्ध आचार्यांनी पाहिले आणि ते पूर्ण करून दाखवले. तत्कालीन सुप्रसिद्ध कवी, आचार्य आणि स्थपती गुणधर्म याने या स्तूपाची रचना केली असे मानले जाते. ही रचना करत असताना पायथा हे कामधातू, पुढचे पाच मजले हे रूपधातू आणि त्यावरचे तीन गोल मजले तसेच मध्यभागी असलेला स्तूप हे अरूपधातू यांचे निदर्शक आहेत. जे लोक या ठरवून दिलेल्या मार्गावरून या स्थळाला भेट देतात, त्यांना प्रत्येक मजल्यावर प्रदक्षिणा घालून वर जावे लागेल अशी योजना केली आहे.
असे हे बोरोबुदूरसारखे आकाराने अतिशय भव्य आणि संकल्पनेने दिव्य, एकमेवाद्वितीय बौद्ध मंदिर लोकांसाठी तीर्थक्षेत्र न झाले तरच नवल, पण हे स्थळ लोकप्रिय होण्याच्या आधी, किंबहुना बांधून झाल्यावर काही शतकांतच काळाच्या पडद्याआड लपून गेले. इंडोनेशियातील ज्वालामुखीची राख आणि त्यावर वाढलेले जंगल ही त्याची प्रमुख करणे होत. ते पुढे 1814 मध्ये ब्रिटिश जनरल थॉमस रॅमफोर्ड राफेल याने जगासमोर आणले असे मानले जाते, पण प्रत्यक्षात हेर्मान कोर्नेलिओस या डच अधिकाऱयाने आणि त्याच्या 200 लोकांच्या चमूने दोन महिने अविरत कष्ट करून ते जंगल साफ केले. तेव्हा ते खऱया अर्थाने जगापुढे आले आणि हे महत्त्वाचे पर्यटन तसेच तीर्थक्षेत्र उदयाला आले. आज हे जगातील सर्वात मोठे बौद्ध स्मारक म्हणून जगप्रसिद्ध आहे. देशोदेशीचे बौद्ध भक्त आणि अ-बौद्ध प्रवासी, या स्थळाला मोठय़ा संख्येने भेट देतात. हिंदुस्थानातून बाहेर पडून हिंदुस्थानी धर्मांनी आपापल्या धार्मिक परंपरांची लावलेली रोपटी पुढे महाकाय वृक्षाच्या रूपात दक्षिण आशियात मोठय़ा स्वरूपात पाहायला मिळतात. त्या धार्मिक परंपरांना स्थानिकांनी आपलेसे करून विशाल (बऱयाचदा हिंदुस्थानातील स्थापत्याच्या आकारापेक्षा जास्त मोठय़ा आकाराच्या) स्थापत्य वैभवाची निर्मिती केली यात शंका नाही.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
– [email protected]





























































