मुद्दा – आत्मनिर्भर महाराष्ट्र होण्यासाठी… 

433

>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर 

आजवर देशावर आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री नेहमीच धावला आहे. सध्या कोरोना या रोगाचे संकट महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात घोंघावते आहे. सरकार आणि प्रशासन आपल्यापरीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न करीत आहेतच. महाराष्ट्र कोरोनावर विजय मिळवून नक्कीच भरारी घेईल. आज जवळपास चार महिने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यामुळे आणि ‘मिशन बिगिन अगेन’ या मोहिमेंतर्गत आता राज्यातील काही औद्योगिक क्षेत्रेसुद्धा नियम व निकषांनुसार पूर्ववत सुरू करण्यात आली आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळावी व राज्याचा महसूल वाढावा या दृष्टिकोनातून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. रोजगार व उद्योग या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्याचे औद्योगिक क्षेत्र व रोजगार याबाबत नुकतीच अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरी अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या ‘एमओयू’वर स्वाक्षऱ्य़ादेखील केल्या. त्यामुळे राज्यातील औद्योगिक चक्राला चालना मिळून रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील.

उत्पादन क्षेत्रे विकसित झाली की, महसुलातदेखील मोठय़ा प्रमाणावर भर पडेल आणि अर्थव्यवस्था नक्कीच उभारी घेईल. त्याशिवाय सेवा क्षेत्रंदेखील अधिक व्यापक होऊन त्यालाही चालना मिळेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे लक्षात घेता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती व चालना कशी मिळेल या दृष्टिकोनातून आवश्यक ती ध्येय व धोरणे आखली जात आहेत. सध्या संपूर्ण जगात उसळलेल्या कोरोना संकटाचे उगमस्थान चीन असल्यामुळे या देशातून अनेक लघू, सूक्ष्म व मोठे उद्योग बाहेर पडू लागले आहेत. तेव्हा कोरोनाचे आलेले संकट आपण इष्टापत्ती म्हणून घेतले पाहिजे. येणारे प्रत्येक संकट हे काही ना काही संधी घेऊनच येत असते. त्यामुळे या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वापार चालत आलेले जाती, धर्म, पंथ, परंपरा यात ज्याप्रमाणे आपण काळानुसार बदल करायला हवेत, त्याप्रमाणे काही उद्योग-व्यवसाय हे जागतिकीकरणाच्या प्रवाहात कालबाह्य झाले तर काहींमध्ये आमूलाग्र बदल झालेले आपण अनुभवतोय. 1990पासून जेव्हा ग्लोबलायझेशन प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून महाराष्ट्राने उद्योग, व्यवसाय क्षेत्रात आपली घोडदौड सुरू ठेवली आहे, पण आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे.

आज माहिती आणि तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी, कॅटरिंग, इव्हेंट, मॉल्स, सुरक्षा सेवा आदी सेवा क्षेत्रे महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर विकसित होत आहेत. सध्या आलेले कोरोना संकट तर संपूर्ण जगावर कोसळलेले आहे. त्यावर अजून नेमके औषधसुद्धा सापडलेले नाही, पण आपला देश – महाराष्ट्र यातून नक्कीच सावरेल. आधुनिकीकरण अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामामधील सुलभता वाढवली जाईल. कमीत कमी मनुष्यबळाचा वापर केला जाईल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल, पण त्यासाठी काही कालावधी जावा लागेल. आर्थिक निकषांसाठी काही निर्बंध पाळावे लागतील. आपल्या राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे चीनमधून येणाऱ्य़ा संभाव्य उद्योगांना चांगले औद्योगिक वातावरण उपलब्ध होईल. राज्यातील तरुणांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मुंबई, ठाणे, नाशिक यांसारख्या शहरांमधून उद्योगांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. संशोधन, उत्पादन, वितरण, सेवा आदी क्षेत्रांत भरपूर संधी उपलब्ध होतील. स्थानिकांना रोजगार व स्वतःचे लघुउद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होईल. तसे झाले की, महाराष्ट्र खऱ्य़ा अर्थाने स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या