ठसा – जगदीप

934

>> प्रशांत गौतम

‘शोले’ या सुपर-डुपर चित्रपटाने अनेक विक्रम केले आणि मोडले. धर्मेंद्र-अमिताभ (वीरू-जय)ची जोडी, संजीवकुमारांनी साकारलेला ठाकूर, अमजदखान यांनी साकारलेला गब्बर, सांबा अशा कितीतरी व्यक्तिरेखांनी चित्रपटरसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यातच लक्षात राहणारी एक भूमिका म्हणजे सूरमा भोपालीची विनोदी भूमिका होय. जगदीप यांनी आपल्या कसदार अभिनयाने ती साकार केली. 29 मार्च 1939 साली मध्य प्रदेशातील दतिया जिल्हय़ात जन्म झालेल्या जगदीप यांचा प्रवास वयाच्या 81व्या वर्षी थांबला. त्यांच्या निधनाने सशक्त प्रतिभेचा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सय्यद इश्तियाक अहमद जाफरी हे मूळ नाव असलेल्या जगदीप यांची खरी ओळख विनोदी अभिनेता अशीच होती. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटापासून झाली. दिल्ली अब दूर नहीं, मुन्ना, आरपार हे त्यांचे बालकलाकार म्हणून भूमिका केलेले चित्रपट. ‘हम पंछी एक डाल के’ या एका चित्रपटात जगदीप यांनी जी भूमिका साकारली, ती तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही आवडली होती. बी.आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या चित्रपटापासून त्यांची अभिनय कारकीर्द सुरू झाली, ती तब्बल सहा दशके गाजली, संस्मरणीय ठरली. जवळपास चारशे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. जगदीप गेले, मात्र त्यांची ‘सूरमा भोपाली’ ही भूमिका चित्रपटरसिकांच्या कायम स्मरणात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या