हिंदुस्थानचा कोहिनूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेटमध्ये काही पराक्रम असे असतात की, आपण आपल्या डोळ्यांवरचा विश्वासच गमावतो. आपले डोळे आपल्याशी खोटं बोलतायत असं वाटतं. वेस्ट इंडीजमधल्या पहिल्या कसोटीतल्या दुसऱया डावामधला जसप्रीत बुमराचा स्पेल तसा होता.

1938 साली स्टॅन मॅकेब या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने एका कसोटीत चार तासांत 232 धावा केल्या. (त्यावेळी टी-20 कुणाच्या स्वप्नातही नव्हतं. वनडेचा जन्म झाला नव्हता) त्यातल्या शेवटच्या 72 धावा त्याने 28 मिनिटांत कुटल्या. त्याच्या डावाच्या सुरुवातीला एकंदरीत त्याचा फॉर्म पाहून सर डॉन ब्रॅडमनने आपल्या सर्व खेळाडूंना पॅव्हेलियनच्या बाल्कनीत बोलावलं आणि सांगितलं, ‘‘इथून उठू नका. अशी खेळी तुम्ही आयुष्यात पुन्हा पाहणार नाही.’’ जसप्रीत बुमराच्या स्पेलच्या वेळी आपल्या सहकाऱयांना असं काही सांगायची वेळ कर्णधार विराट कोहलीवर आलीच नाही. ते सर्व त्याच्याबरोबर मैदानातच होते. पॅव्हेलियनमधल्या सपोर्ट स्टाफने तो स्पेल डोळय़ात प्राण आणून पाहिला असेल. मी नशीबवान एवढ्यासाठीच की, टीव्हीवर का होईना, दूर हिंदुस्थानात बसून तो पाहू शकलो आणि ऐन श्रावणात स्वयंपाकखोलीतून येणाऱ्या तळलेल्या पापलेटचा वासही मला खुर्चीवरून जेवणासाठी उठवू शकला नाही.

माझ्या पिढीच्या माणसासाठी ते एक वेगळं नेत्रसुख होतं. कारण आम्ही ज्यावेळी सजगपणे क्रिकेट पाहायला सुरू केलं तेव्हा लालचुटूक चेंडूची फक्त विटंबना पाहिलीय. पूर्वी विंडीजमध्ये एखादा वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या काठय़ा काढतोय हे दृश्य अनेकदा दिसलं होतं. चित्र तेच होतं. फक्त भूमिका बदलल्या होत्या. काठय़ा उडणारे फलंदाज हिंदुस्थानी नव्हते. ते वेस्ट इंडियन होते आणि काठय़ा काढणारा गोलंदाज चक्क हिंदुस्थानी होता.

मला मान्य आहे, बुमराच्या समोर कुणी, सोबर्स, रिचर्डस्, लारा नव्हते; पण तरीही तो स्पेल असामान्य होता. त्याची ऍक्शन, त्याचा स्विंग, त्याचा वेग आणि सर्वात महत्त्वाचं, त्याच्या चेंडूचा टप्पा आणि दिशा यातल्या अचूकतेची तुलना अर्जुनाने पक्ष्याच्या फोडलेल्या डोळय़ाशीच करता येईल. हे पाच गुण, ही अमृताची पाच बोटं होती. ती रोज एकत्र येत नाहीत. त्या दिवशी आली आणि स्पेल भन्नाट झाला. त्याला त्याची सद्वर्तनी आक्रमकता जोडा. प्रत्येक आक्रमकता सद्वर्तनी नसते. नाहीतर आर्चरचा चेंडू लागून स्टीव्ह स्मिथ पडल्यावर आर्चर तिऱहाईतासारखा दूर उभा राहिला नसता. क्रिकेटमध्ये हवीहवीशी वाटणारी आक्रमकता अशा क्षणी संपून तिथून तत्काळ मानवता सुरू व्हायला हवी. बुमरा हा त्याबाबतीत आर्चर नाही, माणूस आहे.

पण आर्चर जे वेस्ट इंडियन रक्त मिरवतो त्या रक्ताच्या महान गोलंदाजांना बुमराच्या त्या स्पेलच्या प्रेमात पडणं रोखता आलं नाही. ऍण्डी रॉबर्टस् आणि ऍम्ब्रोज या दोघांना वाटलं की, बुमरा त्यांच्या काळात जर वेस्ट इंडीजमध्ये जन्मला असता तर तो त्यांच्या खांद्याला खांदा लावून विंडीज संघात खेळला असता. यापेक्षा जास्त वेगवान गोलंदाजासाठी कौतुक काय असू शकतं! रॉबर्टस्, होल्डिंग, मार्शल, गार्नर, क्रॉफ्ट किंवा वॉल्श, ऍम्ब्रोज वगैरेच्या खांद्याला खांदा लावून खेळायची त्याची कुवत आहे असं ‘रॉबर्टस्’ हा कदाचित त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ गोलंदाज सांगतोय! यापेक्षा मोठं कौतुक फक्त देव बोलला तरच होऊ शकतं.

इंग्लंडच्या पिटर्सनने तर फलंदाजांना सल्ला दिलाय, अगदी वर्ल्डकपपासून की, ‘‘बुमराला खेळताना, चटकन ऑफ स्टम्पवर या आणि लेगसाइडला खेळा. ऑफसाइड विसरून जा.’’
बुमराचं वेगळेपण आणि महानपण विविध गोष्टींत दडलंय.
पहिली गोष्ट म्हणजे, बुमराची गोलंदाजी पाहताना कोचिंग मॅन्युअल आउटडेटेड वाटतं. त्यातला तो हरणाच्या पावलासारखा रनअप, ती चेंडू टाकतानाची उडी, साइड-ऑन ऍक्शन, सरळ हात, कार्टव्हील ऍक्शन वगैरे शिकवलेले धडे हे थोतांड होतं का? ज्यांच्या मुखातून क्रिकेटचं तंत्र धबधब्यासारखं वाहायचं ते कै. वसंत अमलाडी गोलंदाजासाठी कार्टव्हील ऍक्शन किती महत्त्वाची आहे ते नेहमी सांगत. पण देवाला कधी कधी शास्त्रशुद्धतेची फिरकी घ्यायची लहर येते. मग तो एखादा बुमरा तयार करून पृथ्वीवर पाठवतो. त्याचा रनअप फार वेगवान नाही, त्यात त्याचा तो ट्रॅफिक पोलीससारखा हात, त्यामुळे फलंदाजाला चेंडूची जजमेंट घ्यायला ‘फ्रॅक्शन ऑफ सेकंद’ वेळ लागतो. त्याच्या ऍक्शनचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणाऱ्या एका ‘फैसो’ नावाच्या नावाच्या ऑस्ट्रेलियन डॉक्टरचं मत आहे की, त्याच्या त्या ऍक्शनमुळे त्याला यॉर्कर अचूकतेने टाकता येतो. पण त्या ऍक्शनमुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला त्रास होऊ शकतो.

कपिल देवला फिटनेसचा त्रास कधीच जाणवला नाही. कारण त्याची ऍक्शन जवळपास कोचिंग मॅन्युअलसारखी होती. हा महत्त्वाचा फरक आहे. कोचिंग मॅन्युअलची प्रतारणा करण्याने फायदा होतो तसा तोटाही होऊ शकतो. त्याच्या त्या स्पेलचं एक वैशिष्टय़ होतं की, त्याने आऊटस्विंग अफलातून टाकले. बुमराच्या ऍक्शनला इनस्विंग जास्त जवळचा आहे. पण त्या दिवशी चेंडूचा टप्पा खोलवर ठेवून त्याने स्टम्पपासून थोडं दुरून चेंडू टाकला आणि तरीही त्याने चेंडू बाहेर काढला. त्याचा वेग हे त्याच्या गोलंदाजीचं एक महत्त्वाचं आभूषण आहे. अलीकडे क्रिकव्हिज साइट वेगवेगळी आकडेवारी देते. त्या आकडेवारीप्रमाणे 2018 साली कसोटीत बुमराने चक्क 50 चेंडू ताशी 150 किलोमीटर्सच्या वेगाने टाकले आहेत. हा गोलंदाजीसाठी भन्नाट वेग आहे. ताशी 140च्या किलोमीटर्सच्या वेगाने तर तो चेंडू झोपून उठल्या उठल्याही टाकू शकतो. किंबहुना आपले आजचे वेगवान गोलंदाज चेंडू टाकल्याबरोबर स्पीडगनच्या आकडय़ाकडे पाहतात. मुख्य म्हणजे शमी, बुमरा, इशांत वगैरे वेगाच्या बाबतीत सशक्त अशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात. तो उजव्या हाताच्या फलंदाजांना 86 टक्के चेंडू स्टम्पपासून दूर जाऊन टाकतो तर डावखुऱया फलंदाजांना 64 टक्के चेंडू स्टम्पच्या जवळ जाऊन टाकतो. जी टक्केवारी इतर गोलंदाजांसाठी अनुक्रमे 12 आणि 28 टक्के असते. त्याचा तो हात, त्याच्या गोलंदाजीचा कोन आणि ही टक्केवारी एकत्रितपणे जेव्हा काम करते, तेव्हा त्याच्या चेंडूच्या रेषेचा अंदाज घेणं कठीण जातं. म्हणून त्याला ठोकून काढता येत नाही.

हे जरा जास्तच तांत्रिक झालं खरं, पण हे वेगळेपण दाखवायला फार महत्त्वाचं आहे.
1932 साली आपल्या पहिल्या कसोटीत खेळलेला महमद निस्सार त्यावेळी जगातला सर्वात वेगवान गोलंदाज होता. त्याला साथ होती अमरसिंगची. त्यानंतर आपल्याकडे वेगवान गोलंदाजी गोडाऊनमध्ये फेकली गेली. फक्त फिरकी गोलंदाज शोकेसमध्ये असतो. कधी तरी एखादा दत्तू फडकर, रमाकांत देसाई, काही काळ शोकेसमध्ये वास्तव्य करायचा. कपिल देवनंतर हे चित्र बदललं. आता वेगवान गोलंदाजी शोकेसमध्ये आहे. त्यातला बुमरा हा कोहिनूर आहे. काळाने किती कूस बदलली पहा.