
>> नितीन फणसे
पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या गुरू या ग्रहाची इत्थंभूत माहिती देणाऱया ‘जुनो’ या नासाच्या अंतराळयानाची तारीफ करावी तेवढी थोडीच… गेल्या काही वर्षांपासून हे यान ‘मन हे लागो गुरुचरणी’ या नेटाने गुरूचे पाय पकडून त्याच्याकडून ज्ञान मिळवतेय.
सर्वात मोठय़ा गुरू ग्रहाच्या दक्षिण भागावर सात मोठी वादळे असल्याचं नासाच्या ‘जुनो’ या अंतराळयानाने नुकत्याच पाठवलेल्या छायाचित्रांवरून उघड झालंय. अत्यंत गरम वायूने भरलेल्या या ग्रहावर याआधीही सहा वादळे नासाच्या याच यानाने दाखवली होती. जीवनात गुरू सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप धडपडावं लागतं. तेव्हा पुठे गुरू प्राप्त होतो. ‘जुनो’ अंतराळयानालाही गुरू ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल पाच वर्षे प्रवास करावा लागला. 5 ऑगस्ट 2011 रोजी लाँच झाल्यानंतर 4 जुलै 2016 या दिवशी त्याने गुरूच्या कक्षेत पाऊल ठेवलंय. तेथेच राहून तो या गॅसच्या फुग्याची सगळी माहिती आणि त्यासंबंधी आकडेवारी पाठवू लागला आहे. नासाच्या माहितीनुसार हे यान प्रत्येक 53 दिवसांनी गुरूच्या आणखी जवळ जातेय. यानाने आतापर्यंत गुरूबद्दल बरंच काही पृथ्वीवरच्या संशोधकांना कळवलं आहे. त्यातच गुरूची नेमकी रचना कशी आहे, ती तशीच का आहे, गुरूवर ढगांची रचना, त्यांचे आकार… अगदी सगळं सांगितलंय. विशेष म्हणजे ‘जुनो’ यानाने गुरूच्या गुरुत्वाकर्षणाबद्दल दिलेली माहिती तर वेगळीच होती. आजवर पृथ्वीवरील संशोधकांना ती मिळू शकलेली नव्हती. या माहितीच्या आधारे संशोधकांना गुरू या ग्रहाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
‘जुनो’ने तिकडचं वातावरण, तिथलं गुरुत्वाकर्षण, वायुमंडळ आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्राबद्दल आकडेवारी तयार करून ती पृथ्वीवर पाठवली आहे. यासोबतच यानावरील खास क@मेऱयाने गुरूची भन्नाट छायाचित्रेही धाडली आहेत. हे यान गुरूभोवती मारलेल्या प्रत्येक फेरीतून त्या ग्रहाबद्दल नवनवीन माहिती पाठवते असं या यानाच्या शोधकार्यावर विशेष लक्ष ठेवून असलेले संशोधक स्कॉट बोल्टन यांना सांगितले. ‘जुनो’ हे यान अल्प कालावधीसाठीच गुरूजवळ राहणार होते, पण आता ते थेट जुलै 2021 पर्यंत कार्यरत राहणार आहे.
गुरू या ग्रहाची रचना, तेथील वातावरण आणि एकूणच त्या तप्त वायूच्या ग्रहाचे अवलोकन करण्यासाठी नासाने ‘जुनो’ हे अंतराळयान पाठवलेले असले तरी गुरूच्या अभ्यासासाठी याआधी एकूण आठ अंतराळयाने धाडण्यात आली होती. या प्रत्येक मोहिमेतून बरीच माहिती नासाला मिळाली, पण त्या प्रत्येक यानावर एकेक विशिष्ट काम सोपवण्यात आले होते. ते ते त्यांनी पूर्ण केले. सर्वात प्रथम गुरूच्या संशोधनासाठी नासाने ‘पायोनियर-10’ हे प्रोब यान मार्च 1972 मध्ये पाठवलो. त्यावेळी गुरू ग्रहावरील अॅस्ट्रॉइड बेल्ट भेदून त्याने गुरूचे वातावरण आणि गुरूच्या बाहेरील सोलर सिस्टीम यांचा अभ्यास करण्यात आला. दीड वर्षाने म्हणजे डिसेंबर 1973 मध्ये ते गुरूजवळ पोहोचले होते. या यानाने तेव्हा गुरूच्या वातावरणात शिरून त्याच्या ढगांच्या पुढे 1 लाख 24 हजार मैल (किमान 2 लाख किलोमीटर्स) जाण्याचा विक्रमही केला. तेव्हा पहिल्यांदाच गुरूचं मोजमाप केलं गेलं. सध्या ते आपल्या सौरमालेत भटकतेय. कारण 2003 साली पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्प तुटला.
‘पायोनियर-10’ हे प्रोब यान कार्यरत असतानाच नासाने एप्रिल 1973 मध्ये ‘पायोनियर-11’ लाँच केले. गुरू ग्रहाचे अॅस्ट्रॉइड बेल्ट भेदून डिसेंबर 1974 मध्ये आतल्या वातावरणात शिरणारे हे दुसरेच यान ठरले. त्याने गुरू ग्रहाची अनेक छायाचित्रे धाडली. या लाल ग्रहाचे पोल्स मोजले आणि गुरूच्या ‘क@सिस्टो’ या चंद्राचाही अभ्यास करून त्याचेही मोजमाप केले. पुढे जुलै 1979 मध्ये शनी ग्रहाचे अवलोकन करणारे ते पहिले यान ठरले. या यानाशी 1995 साली संपर्प तुटला. नासानेच मग सप्टेंबर 1977 मध्ये ‘व्हॉयेजर-1’ हे यान गुरू मोहिमेवर पाठवले. गुरूच्या कक्षेत ते मार्च 1979 मध्ये पोहोचले. त्यानेही वायू भरलेल्या या ग्रहाची माहिती आणि छायाचित्रे पाठवली. गुरूपासून हे यान 2 लाख 17 हजार मैल अंतरापर्यंत गेले. या यानाने प्रथमच गुरू ग्रहावर वादळ असल्याचं शोधून काढलं.
‘व्हॉयेजर-1’ अजून गुरूपर्यंत पोहोचलेही नव्हते, तेवढय़ातच नासाने ऑगस्ट 1977 मध्ये ‘व्हॉयेजर-2’देखील लाँच केले. ते नंतर म्हणजे एप्रिल 1979 मध्ये गुरूजवळ पोहोचले. या यानाने गुरूजवळ त्याचे तीन चंद्र असल्याचं शोधून काढलं. या चंद्रांचा शोध लागल्यावर नासाने फक्त या चंद्रांचाच वेध घेण्यासाठी ‘गॅलिलिओ’ हे आपले प्रोब यान ऑक्टोबर 1989 मध्ये पाठवले. त्याने आपले काम चोख बजावत गुरूच्या या उपग्रहांची पुरेपूर माहिती पाठवली. युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो या तीन चंद्रांपैकी युरोपाच्या पृष्ठभागावर समुद्राच्या रूपात पाण्याचा प्रचंड साठा असल्याचा शोध लावला. गॅनिमेड उपग्रहाचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र असल्याचंही या यानाने उघड केलं. 2003 पर्यंत या यानाने काम केलं. नंतर त्याची मर्यादा संपली तेव्हा नासाने त्या यानाला गुरू ग्रहावर जाण्याचा आदेश देत त्याचा विनाशच केला.
ऑक्टोबर 1990 साली नासाने युरोपियन स्पेस एजन्सीच्या साथीने गुरू ग्रहाच्या संशोधनासाठी ‘युलिसिस’ ही नवी मोहीम सुरू केली. यात नासाने गुरूच्या गुरुत्वाकर्षणाबाबत माहिती मिळवली. सूर्याचा गुरूच्या गुरुत्वाकर्षणावर कितपत प्रभाव पडतो तेही नासाने ‘युलिसिस’ मोहिमेत जाणून घेतले. याशिवाय या यानाने गुरूचे चुंबकत्व आणि रेडिएशनबाबतची आकडेवारीही दिली. ही मोहीम जून 2009 मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर नासाने इटालियन स्पेस एजन्सीच्या मदतीने गुरूसाठीच ‘कॅसिनी-हायजिन्स’ मोहीम शनीच्या अभ्यासासाठी 1997 साली सुरू केली. शनीकडे जाताना तीन वर्षांनी डिसेंबर 2000 मध्ये वाटेत त्यांना गुरू ग्रह भेटला. त्याच्याजवळून जाताना महिनाभराच्या प्रवासात त्याने गुरूची हाय रिझोल्युशनची अनेक छायाचित्रे पाठवली. या फोटोंचा उपयोगही संशोधकांना या लाल ग्रहाचा अभ्यास करताना झालाच आहे.
‘जुनो’ने काही काळ घाबरवले
उड्डाणानंतर व्यवस्थित काम करणाऱया ‘जुनो’ या अंतराळयानाने अलीकडेच 3 नोव्हेंबरला संशोधकांना थोडं घाबरवलं होतं. कारण केवळ 12 तासांसाठीच का असेना, पण ते गुरूच्या सावलीत गेल्यामुळे त्याची सोलर पॉवर सिस्टीम काम करेनाशी झाली. त्यामुळे गुरूपर्यंत जाण्याचा त्याचा प्रवास मध्येच थांबवावा लागतोय की काय ही भीती निर्माण झाली होती. पण नासाची नेव्हिगेशन टीम लगेच कामाला लागली आणि हे यान गुरूच्या सावलीत लपून बसल्याचं समोर आलं. त्यानंतर सर्व सुरळीत होऊन यान आपल्या मोहिमेवर पुढे सरसावले. तेव्हापासून या यानाने पाठवलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण संशोधक करत आहेत.




























































