
>> सुजाता बाबर
21 डिसेंबर 2020 रोजी गुरू आणि शनी त्यांच्या भ्रमणकक्षेत फिरत असताना एकमेकांच्या जवळ आल्यासारखे दृश्य आपल्याला दिसणार आहे. तब्बल 800 वर्षांनी दिसणाऱया या दुर्मिळ घटनेकडे सर्व खगोलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीची शनी व गुरू ग्रहांची युती 31 मे 2000 रोजी दिसली होती. ती मेष तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर होती व दिवसा असल्याने ती आपण पाहू शकलो नाही. परंतु 21 डिसेंबर रोजी दिसणारी युती सायंकाळी दिसणार आहे. ही युती मकर तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर दिसेल. सूर्यास्तानंतर काही वेळ ती आपण पाहू शकतो. आजकाल अंधार लवकर पडत असल्याने निरभ्र आकाश असल्यास आपण साधारण संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही महायुती पाहू शकू. अर्थातच त्यासाठी उंच ठिकाणी किंवा इमारतीच्या गच्चीवर जाऊन पाहावे लागेल. नैऋत्य (Southwest) दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला किंचित दक्षिणेकडे हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ दिसतील. आपले डोळे जर निरोगी असतील तर नुसत्या डोळय़ांनादेखील ही युती दिसू शकेल. आकाशातील द्वैती तारे जसे दिसतात तसे हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ दिसतील. उदा. उत्तरेकडे दिसणाऱया सप्तर्षी तारकासमूहातील वसिष्ठ व अरुंधती ज्याप्रमाणे एकमेकांजवळ दिसतात त्याप्रमाणे दृश्य दिसेल. द्विनेत्री (Binoculars) किंवा दूरदर्शी (Telescope) असेल तर त्यातूनही हे सुंदर दृश्य पाहू शकता. खगोलीय छायाचित्रकारांना तर उत्तम संधी आहे. दूरदर्शीमधून गुरूचे चारही गॅलेलियन उपग्रह, आयो, युरोपा, गॅनीमेड व कॅलिस्टो दिसतील. तसेच शक्तिशाली दूरदर्शीमधून शनीचे रिहा, एन्सेलेडस, टायटन, मिमास हे उपग्रह दिसू शकतील.
सर्व अवकाशस्थ वस्तू म्हणजे ग्रह, तारे, दीर्घिका, तेजोमेघ, दीर्घिकांचे समूह हे सगळे आपापल्या गतीने फिरत असतात. अवकाशातल्या प्रत्येक वस्तूला स्वतःची गती आहे. सौरमालेतील सगळे ग्रहदेखील स्वतःच्या गतीने सूर्याभोवती फिरत आहेत. त्यातील सुंदर आणि महाकाय ग्रह म्हणजे गुरू आणि शनी. गुरू हा सौरमालेतील पाचवा ग्रह. आकाराने अवाढव्य आणि वायुमय.
शनी हा ग्रह त्याच्याभोवती असणाऱया आणि दुर्बिणीतून दिसणाऱया कडय़ांमुळे एक सुंदर व आकर्षक ग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. शनीदेखील सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. तो जेव्हा सूर्याच्या सर्वात जवळ असतो तेव्हा 10.14 खगोलीय एकक अंतरावर असतो. तसेच तो सूर्यापासून जेव्हा सर्वात दूर असतो तेव्हा 9.04 खगोलीय एकक अंतरावर असतो. म्हणजे सरासरी 9.6 खगोलीय एकक अंतरावर असतो. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी शनीला 29.46 पृथ्वी वर्षे लागतात, म्हणजेच साधारण 30 पृथ्वी वर्षे! म्हणजेच, गुरू व शनी यातील अंतर हे साधारण 9.6 – 5.2 = 4.4. आपण ते 5 खगोलीय एकक मानूया. कारण हे आहे सरासरी अंतर. अर्थातच हे त्यांच्या गतीमुळे आणि स्थानामुळे कमीजास्त होत असते.
अवकाशात सर्व तारे, ग्रह हे स्वतःच्या गतीने फिरत असल्याने ते एकमेकांना अनेकदा ग्रहणे लावतात. निरीक्षक आणि मोठी दिसणारी अवकाशस्थ वस्तू यामध्ये लहान दिसणारी अवकाशस्थ वस्तू येते तेव्हा आपण त्याला अधिक्रमण (Transit) म्हणतो. उदा. 9 मे 2016 रोजी बुध ग्रहाचे सूर्यावरून अधिक्रमण दिसले होते. तसेच एखाद्या मोठय़ा दिसणाऱया अवकाशस्थ वस्तूच्या मागे दुसरी लहान दिसणारी अवकाशस्थ वस्तू जाते तेव्हा आपण त्याला पिधान (Occultation) असे म्हणतो. उदा. 28 नोव्हेंबर 2019 रोजी गुरू ग्रह चंद्राच्या मागे गेला होता तेव्हा गुरू-चंद्राचे पिधान दिसले होते. अशाच प्रकारे ग्रहदेखील एकमेकांसमोर येऊ शकतात, एकमेकांच्या अत्यंत जवळ दिसू शकतात. याला आपण युती (Conjunction) असे म्हणतो. या सर्व नैसर्गिक खगोलीय घटना आहेत.
21 डिसेंबर 2020 रोजी गुरू आणि शनी त्यांच्या भ्रमणकक्षेत फिरत असताना एकमेकांच्या जवळ आल्यासारखे दृश्य आपल्याला दिसणार आहेत. या दिवशी त्यांच्यातील अंतर 72,42,04,800 कि.मी. म्हणजेच 4.84 खगोलीय एकक असेल. म्हणजेच प्रत्यक्षात ते जवळ येणार नाहीत, तर केवळ भासमान जवळ असतील. शनी ग्रह जेव्हा आपली एक सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा गुरू ग्रहाच्या साधारण अडीच सूर्य प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येण्याचा आणि आपल्याला दिसण्याचा योग कमी वेळा येतो. साधारण 20 वर्षांच्या कालावधीनंतर ते एकमेकांच्या जवळ दिसतात. असे का? तर प्रत्येक वर्षी शनी सूर्याभोवती 12 अंश अंतर कापतो, तर गुरू 30 अंश अंतर कापतो. म्हणजे एका वर्षात गुरू व शनी यातील अंतर दर वर्षी 18 (30–12) अंशाने कमी होते. म्हणजेच गुरू व शनी यांच्यातील अंतर 360 अंश होण्यासाठी 20 वर्षे लागतात. 360 अंश अंतर म्हणजेच एकमेकांच्या सर्वात जवळ!
ही तशी सामान्य खगोलीय घटना असली तरी खूपच विशेष आहे. कारण यापूर्वी अशी महायुती 16 जुलै 1623 रोजी दिसली होती. परंतु दोन्ही ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने सूर्यप्रकाशात ते दिसू शकले नव्हते. त्यापूर्वी 4 मार्च 1226 रोजी ही महायुती उत्तम रीतीने दिसली होती. जवळपास 800 वर्षांनी हा योग आल्याने ही युती खास आहे. यानंतर दर 20 वर्षांनी म्हणजे 5 नोव्हेंबर 2040, 10 एप्रिल 2060 रोजी गुरू व शनीच्या युती असल्या तरी महायुती 15 मार्च 2080 दिसणार आहे! ही महायुतीदेखील मकर तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर पहाटे 5 च्या दरम्यान पूर्वेला दिसेल. पहाटेची वेळ असल्याने थोडाच वेळ दिसेल. शिवाय आणि त्यानंतर अशी महायुती 2417 व 2477 मध्ये दिसतील! त्यामुळे 21 डिसेंबर 2020 रोजी दिसणारी दुर्मिळ महायुती पाहण्यास विसरू नका!





























































