ठसा – वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

एखादे कलाक्षेत्र एखाद्या कलावंताच्या नावावर ओळखले जाते तेव्हा त्या कलावंताला लिजेंन्डरी कलावंत म्हणून संबोधण्यात येते. तमाशा कलाक्षेत्राच्या नभांगणात अशा दोन चंद्रिका नावारूपाला आल्या. तमाशा सम्राज्ञी विठाबाई आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर. या दोन महान कलावंतांशी सुमारे 40 वर्षांचा माझा स्नेहबंध होता. कांताबाईंचे मंगळवार, 25 मे रोजी निधन झाले. कोरोनातून थोडय़ाशा सावरल्या अन् त्वरित काळाने झडप घातली. 82 वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभलेल्या कांताबाईंच्या वयाच्या नवव्या वर्षापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ध्यास होता केवळ तमाशाचा. कांताबाई सातारकर सर्वार्थाने लिजेंन्डरी तमाशा कलावंत होत्या. कारण त्या बहुआयामी होत्या. उत्तम गायिका, उत्तम वगनाटय़ दिग्दर्शिका, उत्तम अभिनयसंपन्न कलावती, उत्तम तमाशा व्यवस्थापिका किंबहुना तमाशातले उत्तम आणि श्रेयस, प्रेयस म्हणजे कांताबाई सातारकर. भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत म्हणत, ‘तुम्ही मला भेटायला या. आम्हा तमाशा कलावंतांसाठी आजवर तुम्ही खूप कष्ट घेतलेत. आताच्या काळात आमच्या अडचणी समजून घ्या,’ असे त्या सांगत. संगमनेरमध्ये त्यांचा सहस्रचंद्रदर्शन गौरव सोहळा मोठय़ा थाटात पार पडला. मला जाता आले नाही. त्यांनी आवर्जून फोन केला. ‘तुम्ही का आला नाहीत? तुमची आई तुमच्यावर रागावलीय.’ कांताबाईंच्या हक्काच्या प्रेमापासून, लटक्या रुसव्यापासून माझ्यासारखे अनेक पारखे झाले असतील. ‘माझ्या रघूकडे लक्ष असू द्या’ हे त्यांचे आर्जव आजही आठवतेय.

कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात आपले स्थान अढळ ध्रुवासारखे निर्माण केले. त्यांना तमाशाचा पिढीजात वारसा नव्हता. गुजरातमधील बडोदा जिह्यातल्या टींबा या छोटय़ाशा गावी साहेबराव, चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी 1939 साली कांताबाईंचा जन्म झाला. बडोद्याहून आईवडील सातारा या मूळगावी आले. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरात जनजागृतीपर मेळे सादर होत. कांताबाईंचे चरित्रलेखन करणारे तमाशाचे अभ्यासक डॉ. संतोष खेडलेकर यांनी एक आठवण सांगितली. ‘कांताबाईंना साताऱयातील मेळ्यांचे आकर्षण बालपणीच वाटले. त्या घुंगरांऐवजी सुतळीत बाभळीच्या वाळलेल्या शेंगा घुंगुर म्हणून बांधीत व नृत्य करीत.’ वयाच्या नवव्या वर्षी साताऱयातील नवझंकार मेळय़ात त्यांना नृत्याची संधी प्राप्त झाली. तमाशा कलेचा स्वीकार कांताबाईंना उदरनिर्वाहासाठी करावा लागला. सर्जेराव अहिरवाडीकर तमाशात त्या काम करू लागल्या. तेथून त्यांचे नाव गाजले. बाबुराव पुणेकरांच्या तमाशात काम करताना त्यांना मुंबईच्या न्यू हनुमान थिएटरचे आकर्षण वाटले. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्या काम करू लागल्या. त्यासाठी त्यांनी न्यू हनुमान थिएटर गाठले . तेथेच तुकाराम खेडकर या तमाशा कलावंत फडमालकाची त्यांची भेट झाली. तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करतानाच दोघांचे मनोमिलन झाले. तमाशाचा संसार, प्रत्यक्ष संसार सुरू झाला. कांताबाई वगसम्राज्ञी होत्या, कारण अनेक शिवकालावर आधारित वगांमध्ये त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या. ‘रायगडची राणी’मधील सोयराबाई, ‘डोम्या नाग’मधील बायजा, ‘असे पुढारी आमचे वैरी’मधील गजरा, ‘कोर्टादारी फुटला चुडा’मधील सगुणा, ‘हरिश्चंद्र-तारामती’मधील तारामती अशा अनेक भूमिका त्यांनी वगनाटय़ात सादर करताना फेटा बांधून कांताबाई बोर्डावर उभ्या राहत.

तुकाराम खेडकर यांच्या 1964 च्या अकाली निधनाने कांताबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपली मुले अनिता, अलका, रघुवीर, मंदाराणी यांच्यासह 1969 साली त्यांनी नव्या जोमाने ‘कांताबाई सातारकरसह मास्टर रघुवीर खेडकर’ तमाशा उभा केला. कांताबाई आर्थिक ओढाताण, पतीचे निधन यामुळे कधी खचल्या नाहीत. त्यांचा संपूर्ण परिवार तमाशाला वाहिलेला आहे. त्यांचे चिंरजीव रघुवीर खेडकर यांनी कांताबाईंचा वारसा समर्थपणे सांभाळला आहे. कांताबाईंच्या मुली, जावई, नात-नातू, नातसुना हे सर्व तमाशाची परंपरा सांभाळीत आहेत. तमाशा सृष्टीतील कांताबाईंच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने पहिला तमाशा सम्राज्ञी विठाबाई पुरस्कार नारायणगाव येथे सन्मानपूर्वक कांताबाई सातारकर यांना प्रदान केला. नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी मी पार पाडली तेव्हा कांताबाई आणि रघुवीर खेडकर यांनी पारंपरिक तमाशाचे दर्शन या महोत्सवात देशाच्या राजधानीत घडविले होते.