आपला माणूस – एक झंझावात शांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

बलुचिस्तानमधील मानवाधिकारांचे दमन आणि हनन जगात आणि संयुक्त राष्ट्रांच्या उंबरठय़ापर्यंत नेणाऱया हिंदुस्थानच्या एका बलुच भगिनीने अनपेक्षित ‘एक्झिट’ घेतली. एक ‘हुंकार’ कायमचा निमाला. एक झंझावात शांत झाला. करिमा बलोच यांच्या मृत्यूने बलुचींचा लढा आणि त्यांचे जगभरातील समर्थक क्षणभर नक्कीच स्तब्ध झाले असतील

एखादा मोठा झंझावात शांत झाला की सगळीकडे भयाण अस्वस्थता अनुभवायला मिळते. सुकाणूविना जहाज जसे समुद्रामध्ये निरुद्देश हेलकावत राहते अगदी तशीच गतिमान चक्रांना अचानक खीळ बसते आणि सगळेच दिशाहीन होत जाताना दिसते. मानवाधिकार महिला कार्यकर्ती आणि स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी आपले गाऱहाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱया करिमा बलोच यांच्या गूढ मृत्यूनेही असेच झाले आहे. 35 वर्षीय करिमा 2016 पासून पाकिस्तानमधून विस्थापित होऊन पॅनडात शरणागत म्हणून आपल्या कुटुंबासह राहात होत्या. 2016 मध्ये जगभरातील अत्यंत प्रेरणादायी आणि प्रभावशाली 100 स्त्रीयांमध्ये त्यांची नोंद झाली, त्या वेळी त्या बलुची स्टुडण्टस् ऑर्गनायझेशन आझाद संघटनेच्या अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या.

विवादित बलुचिस्तान तीन भागांमध्ये विभागलेला आहे. त्यापैकी नैऋत्य विभाग हा सगळ्यात मोठा म्हणजे पाकव्याप्त भाग आहे. जो पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या 44 टक्के आहे. मात्र तेथील लोकसंख्या अत्यंत विरळ म्हणजे लोकसंख्येच्या 3.6 टक्के आहे. बलुची समाज सामाजिकदृष्टय़ा मागासलेला आणि गरिबीने गांजलेला आहे. रोजगाराच्या कोणत्याही संधी त्यांना उपलब्ध नाहीत. आर्थिक असमानता, भेदभाव, शून्य विकास, शिक्षणाचा अभाव आणि पाकिस्तानच्या सततच्या लष्करी कारवाया यामुळे या भागातील लोक अत्यंत अस्वस्थ जीवन जगतात. जगभरातील मानवाधिकार संरक्षण कार्यकर्त्यांनी वेळोवेळी ही व्यथा व्यक्त केली आहे. वास्तविक जीवन जगण्याचा, विकास करण्याचा, शिक्षणाचा अधिकार, प्रतिष्ठा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येक मानवाला जन्मतःच मिळतो. मात्र बलुची लोकांचे मानवाधिकार नेहमीच प्रश्नांकित राहिले आहेत. पाकिस्तानच्या अतिरेकी लष्करी हस्तक्षेपामुळे बलुची लोक अत्यंत दडपणाखाली वावरतात. मानवाधिकार कार्यकर्ते या भागापर्यंत पोहोचूही शकत नाहीत ही शोकांतिका आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बलुची मानवाधिकार संघटनांना तेथे सक्षमतेने काम करता येत नाही.

ब्रिटिश वसाहतीपूर्वी बलुचिस्तान स्वतंत्र देश होता. ब्रिटिशांनंतर कलोत या भागाने 227 दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगलेही आहे. 1948 नंतर याही भागाचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण झाले. बलुचिस्तान हे पूर्वीपासून एक स्वतंत्र राज्य होत़े त्यामुळे त्यांची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आग्रही आहे. बलुच स्वातंत्र्याच्या लढाईने 1970 पासून जोर धरला. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी तेथील कार्यकर्ते सातत्याने पाकिस्तानी लष्करासोबत संघर्ष करीत आहेत. करिमा बलोच त्यापैकीच एक बिनीच्या कार्यकर्त्या. प्रामुख्याने अत्याचारग्रस्त बलुची महिलांचा ‘हुंकार’ बनलेल्या करिमा या अत्यंत धाडसी आणि धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्यावरही अनेकदा प्राणघातक हल्ले झाले. तेथे राहणे अवघड झाल्यावर त्यांनी देश सोडला आणि पॅनडामध्ये ‘आश्रय’ घेतला. त्यांच्याप्रमाणेच अनेक बलुच कार्यकर्त्यांनी पाकिस्तानमधून विस्थापित होऊन इतर देशांमध्ये शरणागती पत्करली आहे आणि त्यांनी आपला लढा सुरू ठेवला आहे.

करिमा बलोच बलुच स्टुडण्ट ऑर्गनायझेशन आझाद या संघटनेच्या माध्यामातून बलुच लोकांच्या अधिकारासाठी लढत होत्या. तेथील स्त्रीया आणि मुले यांच्यावर होणाऱया अत्याचारांचे गाऱहाणे त्यांनी जागतिक पातळीवर मांडले. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशाही यांचा त्यांच्यावर राग होता. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूमागे पाकिस्तानचाच हात असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. आतापर्यंत असंख्य बलूच नेत्यांचे अशाच प्रकारे गूढ मृत्यू आणि हत्या झाल्या असल्याने करिमा यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दलही पाकिस्तानकडे अंगुली निर्देश होणे स्वाभाविक आहे. करिमा बलोच यांच्या मृत्यूमुळे बलुची लोकांवरील, प्रामुख्याने महिलांवरील अत्याचारांविरोधात उसळणारा एक झंझावात कायमचा शांत झाला. याच वर्षी साजिद हुसैन या बलूच पत्रकाराचीही हत्या झाली होती. आता करिमा यांना गूढ मरण आले. दोन दिवस बेपत्ता असलेल्या करिमा यांचा मृतदेह टोरांटो शहरात आढळून आला. 2016 मध्ये करिमा यांनी रक्षाबंधनप्रसंगी एक भावूक व्हिडीओ जारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ म्हणून मदतीचे साकडे घातले होते. अत्याचारपीडित बलुची भगिनींचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. चीन-पाकिस्तान नवमैत्री, बलुचिस्तानमधून जाणारा चीन पुरस्कृत ‘कॉरिडॉर’ या पार्श्वभूमीवर करिमा यांच्या या आवाहनाला वेगळा अर्थ प्राप्त झाला होता. बलुचिस्तानमधील मानवाधिकारांचे दमन आणि हनन जगात आणि संयुक्त राष्ट्रांच्या उंबरठय़ापर्यंत नेणाऱया हिंदुस्थानच्या एका बलुच भगिनीने अनपेक्षित ‘एक्झिट’ घेतली. एक ‘हुंकार’ कायमचा निमाला. करिमा बलोच यांच्या मृत्यूने बलुचींचा लढा आणि त्यांचे जगभरातील समर्थक क्षणभर नक्कीच स्तब्ध झाले असतील. ‘अपहरण, अनन्वित छळ आणि हत्या’ ही पाकिस्तानची दमननीती असल्याचा जाहीर आरोप करिमा बलोच सातत्याने करीत असत. आता त्यांच्यावरही हाच ‘नापाक’ प्रयोग झाला असेल का? याचे उत्तर हवे असले तरी हा प्रश्न बहुधा अनुत्तरिच राहील!