लेख – खैबर पख्तुनवाला परिषद आणि बौद्धिक दिवाळखोरी

670

>> सनत कोल्हटकर

 ‘खैबर पख्तुनवाला गुंतवणूक परिषद’. ज्या कोणाच्या सुपीक डोक्यातून बेली डान्सर्सना बोलावण्याची कल्पना अशा पद्धतीने पुढे आली आणि ज्या कोणी पाकिस्तानातील इतरांनी या कल्पनेचा पाठपुरावा केला असेल त्यातून त्या सर्वांचीबौद्धिक दिवाळखोरीसमोर तर आली. नजीकच्या भविष्यात खैबर पख्तुनवाला चेंबर ऑफ कॉमर्सला धोबीपछाड घालण्यासाठी आतासिंध चेंबर ऑफ कॉमर्सआणिपाकिस्तानी पंजाब चेंबर ऑफ कॉमर्समध्ये तीव्र स्पर्धा सुरू होण्याची शक्यता दिसते.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानच्या        खैबर पख्तुनवाला प्रांताने नुकतीच अझरबैजान या देशामधील ‘बाकु’ या तेलसमृद्ध प्रांतात ‘सरहद चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज’ मार्फत गुंतवणूक परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे वैशिष्टय़ म्हणजे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘बेली डान्सर’चा ताफाच नाचण्यासाठी भाडेतत्त्वावर आणण्यात आला होता असे सांगितले जाते. गुंतवणूक हवी आहे पाकिस्तानात आणि हे ‘बेली डान्सर्स’ परदेशातून बिदागी देऊन नाचावयास आणलेल्या. सगळाच आनंदी आनंद. विविध बेली डान्सर्सची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यामुळे जगाला या आगळ्यावेगळ्या गुंतवणूक परिषदेची माहिती मिळाली.

खरे तर ज्या देशामध्ये गुंतवणूक होणे अपेक्षित आहे त्या देशात अशी परिषद आयोजित न करता ती दुसऱ्या देशात आयोजित करणे यातूनच अनेक गोष्टी न सांगताही प्रतीत होतात. पहिली म्हणजे खैबर पख्तुनवाला येथील सामान्य जनतेला जर अशी परिषद भरवली जात असेल याची माहिती मिळाली तर तेथील झगमगाट बघून ती जनता नाराज होणार. परत गुंतवणूकदारांना पाकिस्तानमधील खरी परिस्थिती कळली तर ते गुंतवणूक करण्याचा विचार सोडून देतील अशी भीती. त्यापेक्षा सर्वात सुरक्षित म्हणजे वेगळ्याच देशामध्ये अशी परिषद आयोजित करावी असे पाकिस्तानातील आयोजकांना वाटले असावे. परत अझरबैजान देशाने या परिषदेसाठी काही सवलती दिल्या असतील तर ते जगजाहीर होणार नाही हेही खरे.

गुंतवणूकदारांना कोणत्याही देशामध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर किमान खालील पाच ते सहा गोष्टींबद्दल विश्वास असावा लागतो.

  1. पायाभूत सुविधा – यामध्ये रस्त्यांचे सुस्थितीतील जाळे, पूल 2. विजेची उपलब्धता 3. कुशल कामगारांची, कच्च्या मालाची सुलभ उपलब्धता 4. बनविल्या जाणाऱ्या मालासाठी स्थानिक बाजार 5. स्थानिक चलनाच्या विनिमयाची स्थिरता 6. सुरक्षितता

आता या गोष्टी जर गुंतवणूकदारांना दाखवायच्या तर ते नको ते प्रश्न विचारणार. त्यापेक्षा दुसऱ्या देशातच अशी परिषद आयोजित करावयाचा विचार केलेला दिसतो.

4 ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेला नाव दिले होते ‘खैबर पख्तुनवाला गुंतवणूक परिषद’. ज्या कोणाच्या सुपीक डोक्यातून बेली डान्सर्सना बोलावण्याची कल्पना अशा पद्धतीने पुढे आली आणि ज्या कोणी पाकिस्तानातील इतरांनी या कल्पनेचा पाठपुरावा केला असेल त्यातून त्या सर्वांची ‘बौद्धिक दिवाळखोरी’समोर तर आलीच, पण गमतीचा भाग म्हणजे या दुसऱ्या देशात अशा पद्धतीने परिषद आयोजित करण्याच्या कल्पनेला ‘आऊट ऑफ बॉक्स’ संबोधून / म्हणवून घेऊन पाकिस्तानातील परिषदेच्या आयोजकांनी स्वतःची पाठी थोपटून घेतल्याचे सांगण्यात येते. परिषदेचे आयोजकच बेली डान्सरची छायाचित्रे घेण्यात आघाडीवर होते असे सांगण्यात येते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची उपस्थित गुंतवणूकदारांसाठी खास संदेशाची ‘ध्वनिचित्रफीत’ही या कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आल्याचे सांगतात. या परिषदेमुळे प्रभावित होऊन किती गुंतवणूकदार पाकिस्तानमध्ये कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त झाले याचा तपशील उपलब्ध नाही.

पाकिस्तान सध्या परदेशातून गुंतवणूक मिळविण्यासाठी किती आतुर झाला आहे हेच यातून प्रतीत होते आहे. पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे ‘बोऱ्या’ वाजलेला आहे. जे कोणी मदत करणारे होते त्यांची यथाशक्ती मदत घेऊन झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही कर्ज घेऊन झाले आहे. नाणेनिधीकडून घातलेल्या अटींची अजून पूर्तता झालेली नाही. फक्त पाकिस्तानी रुपयाला अमेरिकन डॉलरसमोर गडगडण्याला अटकाव घातलेला नाही हीच काय ती एकच आतापर्यंत मान्य केलेली अट. अमेरिकन डॉलरसमोर पाकिस्तानी रुपया अजून किती गडगडणार हे माहीत नाही. नवीन ‘कर’ लादावयास अजून प्रारंभच झालेला नाही. नाणेनिधीने सरकारी महसूलवृद्धीकरिता करसंकलन वाढविण्यासाठी आणलेला दबाव पाकिस्तानी जनता सध्याच जीवनावश्यक गीष्टींच्या महागाईने आणि टंचाईने प्रचंड हैराण झालेली असल्याचे सांगतात. हे सर्व कमी म्हणून की काय, ‘एफएटीएफ’च्या आशियातील शाखेने मागील महिन्यातच पाकिस्तानला ‘काळ्या’ यादीत टाकलेले.  हैराण जनतेला ‘कश्मीर’कडे बोट दाखवावे तर तेथेही दाखविण्यासारखे आता काही शिल्लक राहिले नसल्याची जनतेतील भावना.

इम्रान खान यांनीच ‘पैसे बचाव’ मोहिमेअंतर्गत कुठे पंतप्रधानांच्या ताफ्यातील गाडय़ाच विक्रीला काढ, अमेरिकेला जाताना प्रवासी विमानाने जा, अमेरिकेत पोहाचल्यावर तेथील राजदूताच्या घरातच मुक्काम कर अशा विविध नाटकांची मोहीम आता ‘बेली डान्सर्सना’ गुंतवणूक परिषदेसाठी आमंत्रित करण्यापर्यंत तूर्तास पोहोचली आहे असे म्हणता येईल. विजेची उपलब्धता कमी आणि जीवनावश्यक गोष्टींच्या किमती तर प्रचंड वाढलेल्या. रोजगाराची भ्रांत. पेट्रोल, डिझेल, गॅसही खूप वाढलेले. नजीकच्या भविष्यात खैबर पख्तुनवाला चेंबर ऑफ कॉमर्सला धोबीपछाड घालण्यासाठी आता ‘सिंध चेंबर ऑफ कॉमर्स’ आणि ‘पाकिस्तानी पंजाब चेंबर ऑफ कॉमर्स’मध्ये तीव्र स्पर्धा सुरू होण्याची शक्यता दिसते. आता या परिषदेचे आयोजक खैबर पख्तुनवाला परिषदेच्या ‘बेली डान्सरना’ नाचविण्यापर्यंत थांबतात की अजून चार पावले पुढे जाऊ इच्छितात का, हे येणाऱ्या काळात कळेलच.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या